অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अ‍ॅपालॅचिअन पर्वत

अ‍ॅपालॅचिअन पर्वत

अ‍ॅपालॅचिअन पर्वत

उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावरील पर्वतश्रेणी. सु. २,५७५ किमी. ईशान्य--नैर्ऋत्य पसरलेली व निरनिराळ्या रांगांनी युक्त अशी ही पर्वतश्रेणी, कॅनडाच्या पूर्व किनार्‍यावरील क्वेबेकमधील सेंट लॉरेन्सपासून ते गल्फ किनार्‍यावरील मध्यअ‍ॅलाबॅमामधील मैदानी प्रदेशापर्यंत पसरलेली आहे.सर्वसाधारणपणे ९०० मी. उंचीच्या या पर्वतात, ब्‍लॅक मौंटन प्रदेशातील मौंट मिचेल (२,०३७ मी.) व व्हाइट मौंटन प्रदेशातील मौंट वॉशिंग्टन (१,९१७ मी.) या उंचीची शिखरे आढळतात. १८ व्या शतकात प्रथमतः अमेरिकन लोकांनी या प्रदेशात वसाहती केल्या.

२०० वर्षांनंतर आज मात्र या पूर्वीच्या रानटी प्रदेशात अ‍ॅलाबॅमा, टेनेसी, केंटकी, जॉर्जिया, कॅरोलायना, उत्तर व दक्षिण व्हर्जिनिया, पूर्व व पश्चिम पेनसिल्व्हेनिया, न्यूयॉर्क वगैरेंसारखे प्रगत प्रदेश आढळतात.

अ‍ॅपालॅचियन पर्वताचे तीन प्रमुख विभाग आहेत. उंच शिखरे असलेली पूर्वेकडील पुरातन अ‍ॅपालॅचिअन रांग, घड्यांची किंवा नूतन मध्य अ‍ॅपालॅचिअन रांग आणि कॅटरिकल, अ‍ॅलेगेनी व कंबर्लंड पर्वतश्रेणीयुक्त पश्चिमेकडील पठारी प्रदेश.

पूर्वेकडील भाग हा तीव्र घड्यांचा असून रूपांतरित पुराजीवकालीन दगडांचा बनलेला आहे. अधूनमधून ग्रॅनाइट व इतर अग्निजन्य खडकांचे भाग आढळतात. कॅनडातील अ‍ॅकडियन उन्नत प्रदेश ही त्याची सीमा असून शिकशॉक व नोत्रदाम हे पर्वत या भागात प्रसिद्ध आहेत. त्यांची सरासरी उंची ९०० ते १,२०० मी. आहे. ईशान्येकडील अमेरिकेच्या प्रदेशात न्यू इंग्‍लंडच्या उन्नत प्रदेशाचा समावेश होतो.

व्हाइट मौंटन, ग्रीन मौंटन व टॅकॉनिक मौंटनचा ९०० ते १,२०० मीटर उंचीचा हा प्रदेश आहे. बर्कशार टेकड्या याच विभागात मोडतात. याच प्रदेशातून न्यू जर्सी व न्यूयॉर्ककडे दोन रांगा जातात. त्या पुढे ब्ल्यूरिजला मिळतात. ब्ल्यूरिजमध्ये पूर्व अमेरिकेतील अत्युच्च शिखरे आढळतात. ब्ल्यूरिजच्या पूर्वेस पीडमाँटचे पठार असून त्याच्या पूर्वेस किनारी मैदाने लागतात.

ग्रेट अ‍ॅपालॅचिअन व्हॅली ही घड्यांच्या नूतन प्रदेशात समाविष्ट आहे. तिच्यात उत्तरेकडे सेंट लॉरेन्स, शॅप्लेन सरोवरीय सखल प्रदेश आणि हडसन नदीखोऱ्याचा समावेश होतो. हडसनपासून पुढे अ‍ॅसाबॅमापर्यंत किनार्‍याला समांतर खोऱ्यांची रांगच गेली असून त्यांपैकी शेनँडोआ खोरे अत्यंत रमणीय आहे.

याच्या पश्चिमेला समान उंचीचा कटक आहे. हा उन्नत प्रदेश वलीपर्वताचा उत्तम नमुना आहे. अतिपश्चिमेकडील प्रदेश हा उत्तरेकडील मोहॉक नदीखोऱ्यापासून सुरू होऊन बर्मिंगहॅम- (अ‍ॅलाबॅमा)पर्यंत विस्तारलेला आहे. सर्वसाधारणपणे हा पठारी प्रदेश खडकाळ आणि पश्चिम उताराचा आहे. पूर्वेकडील उतार तीव्र असून तो मध्यभागीच्या वलीपर्वतरांगांकडे जातो.

त्तरेकडील अ‍ॅलेगेनी पठारी, प्रदेश, पूर्व सीमेवर न्यूयॉर्कमधील कॅट्‌स्किल्स उन्नत प्रदेशात तसेच पेनसिल्व्हेनिया व व्हर्जिनिया प्रदेशात अ‍ॅलेगेनी पर्वत म्हणून ओळखला जातो. नैर्ऋत्येकडे मात्र सर्वच प्रदेश कंबर्लंड पठार म्हणून ओळखला जातो. कॅनडा व न्यू इंग्‍लंडमधील अ‍ॅपालॅचिअन व उत्तर अ‍ॅलेगेनी पठाराचा भागच काय तो हिमानीक्रिया झालेला आहे.

अ‍ॅपालॅचिअनच्या मध्य भागातील नद्यांनी आपले प्रवाह अत्यंत खोल दऱ्या कोरून काढले असून पर्वत-रांगांमध्ये पाणखिंडी निर्माण केल्या आहेत. या नद्या आग्नेय दिशेने वाहतात व पुढे अटलांटिक महासागराला मिळतात. काही नद्या कंबर्लंड पठारावरून वाहत जाऊन मेक्सिकोच्या आखाताला मिळतात.

अठराव्या शतकात हा पर्वत म्हणजे सर्व दृष्टींनी एक अडथळाच वाटत असे. डॅन्येल बून याने प्रथमच १७३४ ते १८२० मध्ये येथे वसाहतीचा प्रयत्‍न केला. कंबर्लंडमधील खिंडीचा उपयोग केल्यामुळे पुढील काळात पश्चिम अमेरिकेचे द्वार सर्वांना खुले झाले. या संपूर्ण प्रदेशात उत्तम लागवडी, शेती व बागायती केल्यामुळे हा प्रदेश आज समृद्ध झाला आहे. अनेक प्रगत शहरे या भागात सध्या आहेत. फक्त दक्षिण अ‍ॅपालॅचिअन भागात तुरळक अप्रगत वसाहती आढळतात. या वसाहती विशेषतः स्कॉटिश व आयरिश लोकांच्या आहेत.

निज द्रव्याचा विपुल साठा या प्रदेशात आहे. अँथ्रॅसाइट व बिट्युमेनस कोळशाच्या खाणींसाठी पूर्व पेनसिल्व्हेनिया व पश्चिम व्हर्जिनिया तर लोखंडासाठी अ‍ॅलाबॅमा प्रसिद्ध आहे. याव्यतिरिक्त या प्रदेशात पेट्रोलिअम, नैसर्गिक वायू, मीठ, बॉक्साइट, माती, टाल्क, अभ्रक, सिलिका, फ्लक्सिंगस्टोन वगैर खनिज द्रव्ये आढळतात. पिट्सबर्ग उद्योगसमूह याच प्रदेशात मोडतो.

या भागात सर्वत्र मिश्र प्रकारची वनसंपत्ती आहे. फक्त कॅनडा व न्यू इंग्‍लंडमध्ये सूपचिर्णी वृक्ष विशेष आढळतात. दक्षिण पर्वतप्रदेशात टेनेसी नदीप्रकल्पामुळे आर्थिक उन्नती साधण्याचा प्रयत्‍न चालू आहे. निसर्गरम्य वातावरणाच्या या प्रदेशाचे व धूसर पर्वतश्रेणींचे आकर्षण सर्वच लोकांना वाटावे यात नवल नाही; म्हणूनच उन्हाळ्यात व हिवाळ्यात येथे प्रवासी लोक मोठ्या संख्येने येतात.


संदर्भ : Huxley, A., Ed. Standard Encyclopeadia of World Mountains, London, 1964.

खातु, कृ. का.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate