नैर्ऋत्य इराणमधील जुरासिक काळातील पर्वतश्रेणी. ती वायव्य-आग्येय दिशेने इराणच्या आखातापर्यंत १,४०७ किमी. पसरलेली असून तिची रुंदी १६० किमी. ते ३२१ किमी.पर्यंत आहे. हिच्यातील शिखराची उंची ३,०४८ मी. ते ४,५७२ मी.पर्यंत आहे. झार्द कुह ह्या सर्वोच्च शिखरांची उंची ४,५७२ मी. तर दिनार कुह आणि कुह-इ-रांग या शिखरांची उंची ४,२६८ मी. पर्यंत आहे. झॅग्रॉस मूलतः कॅल्शियमी असून मध्य व दक्षिणेकडील रांगा मुख्यतः वलीकृत तर उत्तरेकडील विभंगरांगा आहेत. या विभंगरांगांत अनेक ज्वालामुखे आढळतात.
कमी उंचीच्या पर्वतश्रेणींमध्ये ओक व पानझडी वृक्षांची विरळ अरण्ये आढळतात. हिवाळ्यात उंच शिखरे बर्फाच्छादित असतात. पर्वतश्रेणीच्या मध्यभागी आढळणारे लवणक्षाराचे सु. १,५२४ मी.उंचीचे घुमट वैशिष्ट्यपूर्ण आहेत. येथील सरासरी वार्षिक पर्जन्यमान सु. १०१ सेंमी. असून नद्या बारमाही पाणी देणाऱ्या आहेत.
झॅग्रॉसची पर्वतशिखरे आणि खिंडी यांमध्ये सुपीक पठारी प्रदेश आहेत. त्यांत द्राक्षबागा आढळतात. दिझफूल शहराजवळ मोठ्या प्रमाणावर तेलसाठे सापडले आहेत. ट्रान्स–इराणियन लोहमार्ग झॅग्रॉसमधूनच जातो.
बख्तियारी टोळ्यांच्या वास्तव्यावरून नाव पडलेला झॅग्रॉसचा बख्तियारी श्रेणी हा सर्वांत उंच व भव्य भाग असून तो आग्नेयीकडे सु. २४१ किमी.पर्यंत पसरला आहे. त्यामध्ये कारून व तिच्या उपनद्या उगम पावतात.
झॅग्रॉसमध्ये गतकालीन साम्राज्यांचे अवशेष पहावयास मिळतात. केरमानशाहजवळील बेहिस्तून येथे डरायसकालीन क्यूनिफॉर्म लिपीतील शिलालेख आढळतात. या पर्वतश्रेणींच्या परिसरात ज्याप्रमाणे प्राचीन संस्कृत्यांचा उदय झाला, त्याचप्रमाणे कुर्द, लूर, बख्तियारी व काशकाई यांसारख्या बंडखोर टोळ्या व जमाती यांनाही सुरक्षित आश्रय लाभला.
सु. १३३० मध्ये इब्न बतूताने या टोळ्यांच्या निवासस्थानांना भेटी देऊन त्यांच्या चालीरीती व शासनव्यवस्था यांचे वर्णन केलेले आहे.
गद्रे, वि. रा.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 9/6/2019
खांगाई : मंगोलिया प्रजासत्ताकाच्या पश्चिममध्य भागा...
चलेन : नॉर्वे व स्वीडन यांच्या सीमेवरील पर्वतश्रेण...
अॅपालॅचिअन पर्वत : उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनार्...
कॉकेशस : यूरोप व आशिया खंडांमधील पारंपारिक नैसर्गि...