कॉकेशसचे उत्तरेकडून दक्षिणेकडे सामान्यतः पुढीलप्रमाणे विभाग पडतात : सिसकॉकेशस, ग्रेटर कॉकेशस, रीओनी-कूरा नदीखोऱ्यांचा प्रदेश व लेसर कॉकेशस. नदीखोरी आणि लेसर कॉकेशस या दोहोंनी मिळून बनलेल्या प्रदेशास ट्रान्स कॉकेशस असेही म्हटले जाते.
सिसकॉकेशसच्या मध्यभागी स्टाव्ह्रोपल हा सु. ८०० मी. उंचीचा पठारीप्रदेश असून येथून पश्चिमेकडे काळा समुद्र व पूर्वेकडे कॅस्पियन यांना मिळणाऱ्या अनेक नद्या वाहतात. स्टाव्ह्रोपलच्या पश्चिमेस कुबान नदीखोरे असून पूर्वेस कम-टेरेक नदीखोरी आहेत; पुरेसा पाऊस खंडांतर्गत दमट हवामान, काही भागांत उत्तम मृदा आणि मोठ्या प्रमाणावर खनिजसंपत्ती, विशेषतः खनिज तेल, असल्याने पश्चिम खोरे समृद्ध आहे तर निकस जमीन, अपुरा पाऊस इत्यादींमुळे पूर्वेकडील खोऱ्यांचा बराच भाग रुक्ष आहे.
ग्रेटर कॉकेशस सु. १,२०० किमी. लांब व १६० किमी, रुंद आहे. अल्याइन घडामोडींमध्ये उत्थान पावलेली आणि नंतर क्षरण झालेली ही घड्यांची पर्वतश्रेणी ग्रॅनाईट, नाइस, चुनखडी यांनी युक्त असून पूर्वी वारंवार झालेल्या ज्वालामुखींचा लाव्हा त्यावर विपुल प्रमाणात आढळतो. आता कॉकेशसमध्ये एकही जिवंत ज्वालामुखी नसला तरी दक्षिण भागात भूकंप होतात. ग्रेटर कॉकेशसचे पूर्वपश्चिम तीन भाग पडतात.
ॲझॉव्ह समुद्रापासून एल्ब्रुसपर्यंत ४०० किमी. पसरलेल्या पश्चिम भागाची उंची किनाऱ्यापासून पूर्वेकडे ९०० मी. पासून ३,५०० मी. पर्यंत वाढत जाते. घनदाट अरण्ये तसेच बर्फप्रदेश, हिमनद्या व हिमोढ यांनी हा भाग व्यापलेला आहे. २,८२५ मी. वरील क्लूकॉरी खिंडीतील एक लष्करी वाहतुकीचा रस्ता आणि काळ्या समुद्रावरील पेट्रोलियम बंदर तूआप्से ते मायकॉप हा उतारभागातील रेल्वेरस्ता यांशिवाय या भागात वाहतुकीसाठी मार्ग नाहीत एल्ब्रुस ते काझबेक शिखर हा २०० किमी. लांबीचा पट्टा ग्रेटर कॉकेशसचा मध्यभाग असून याच्या दोन समांतर रांगा आहेत.
दक्षिणेकडील रांगा उत्तरेकडील रांगेपेक्षा कमी उंच असूनही अनेक नद्यांची उगमस्थाने या रांगेत आहेत; उत्तर रांगेतील नद्यांनी खोल घळ्या केल्यामुळे त्यांचाही उगमप्रवाह दक्षिणेकडून आला आहे. ५,६३३ मी. उंचीचे एल्ब्रुस हे कॉकेशसमधील व यूरोपमधील सर्वोच्च शिखर आहे; एल्ब्रुस मृत ज्वालामुखी आहे. याशिवाय उष्बा (४,६९५ मी.), दिखतौ (५,२०३ मी.), शकारातौ (५,०५८ मी.), काझबेक (५,०४९ मी.) इ. शिखरे या भागात असून येथील वीस शिखरे माँट ब्लांकपेक्षा उंच व चढण्यास कठीण आहेत. थोडी सरोवरे, उंच कडेकपारी व नेहमी बर्फाच्छादित प्रदेश यांमुळे हा भाग अतिशय भयानक वाटतो. या भागातून १,४०० वर हिमनद्यांचा उगम होतो; दिखतौ ही १५ किमी. लांब हिमनदी सर्वांत लांब समजली जाते.
जॉर्जिया राज्यातील टेरेक नदीने बनविलेली क्रिस्तोवी खिंड (पूर्वीची डॅरिएल खिंड अथवा कॉकेशियन-आयबेरियन गेट) आणि आर्डॉन-रीओनी नदीखोऱ्यांना जोडणारी अतिशय अवघड मॉम्यिझॉन खिंड हे दोनच या भागातून जाणारे मार्ग होत. ग्रेटर कॉकेशसचा दक्षिण उतार तीव्र असून उत्तरेकडे पायऱ्यापायऱ्यांचा उतार आणि खोल घळया आहेत. ग्रेटर कॉकेशसचा पूर्वेकडील भाग कखेत्यीअ व कार्तली या शाखांनी व्यापला असून त्यांची उंची पूर्वेकडे कमीकमी होत जाते. या भागाचाच उत्तरेकडील प्रदेश म्हणजे डागेस्तान असून तो सरासरी १,५०० मी. उंचीचा चुनखडीयुक्त रुक्ष प्रदेश आहे.
कमी पाऊस व उष्ण हवामान यांमुळे विदारण झाल्याने येथे अनेक उंच अवघड सुळके आणि खोल, निरुंद दऱ्या बनल्या आहेत. त्यामुळे हा भाग दुर्गम बनला असून अनेक भटक्या व ठग जमातींचे ते आश्रयस्थान आहे. कॅस्पियन किनाऱ्यावरील डेर्बेंट शहराजवळ ग्रेटर कॉकेशसच्या या पूर्व भागातील एक खिंड असून ती ‘आयर्न गेट’ म्हणून प्रसिद्ध आहे.
ग्रेटर कॉकेशसच्या दक्षिणेस रीओनी-कूरा नद्यांनी घडविलेला कमी उंचीचा प्रदेश आहे. याच्या मध्यभागी ग्रेटर कॉकेशस व लेसर कॉकेशस यांना जोडणारा सूरामी हा जलविभाजक आहे. सूरामीच्या पश्चिमेकडे रीओनी व तिच्या उपनद्यांनी बनविलेले कोलखिडा अथवा कोल्चीस हे दलदलयुक्त खोरे असून पूर्वेकडे कूरा-आरास नद्यांची खोरी आहेत. कमी पर्जन्य आणि तीव्र उन्हाळे यांमुळे कूरा-आरास खोरी ओसाड आहेत.
लेसर कॉकेशस हा कॉकेशस पर्वतश्रेणीचा सर्वांत दक्षिणेकडील भाग असून तुर्कस्तानमध्ये पसरलेले आर्मेनियम पठार व इराणमधील एल्बर्झ पर्वत यांना लागूच तो असल्याने त्याचे वेगळे असे वैशिष्ट्य जाणवत नाही. २,४०० ते ३,०४८ मी. उंचीच्या या रांगा असून आरागात्स हे ४,०९० मी. उंचीचे लेसर कॉकेशसमधील सर्वोच्च शिखर आहे. आर्मेनिया राज्यातील सॅव्हान सरोवर आणि आरास नदीउगम या भागातच आहे.
फार प्राचीन काळापासून मानवाने कॉकेशसमधील मार्गांचा उपयोग केल्याचे दाखले मिळतात. आजही कॉकेशस भाग हा लोक व भाषा यांचे संग्रहालय समजला जातो. जॉर्जियामधील आयबेरियन संस्कृती व आर्मेनिया-तुर्कस्तान यांमधील आर्मेनियन संस्कृती या कॉकेशस परिसरात इ. स. पूर्वीच उदयास आल्या आणि नष्ट झाल्या. रोमन-पार्थियन, बायझंटिन-अरब, ऑटोमन, पर्शियन-रशियन यांच्यामधील अडसर म्हणून कॉकेशसची प्रसिद्धी होती. ग्रीक, रोमन, अरब वर्चस्वानंतर हा बहुतेक भाग एकोणिसाव्या शतकात रशियाच्या आधिपत्याखाली आला.
सोने, चांदी, मॅंगेनीज, जस्त, तांबे, टंगस्टन, मॉलिब्डेनम, कोळसा, पेट्रोलियम ही कॉकेशसमधील खनिजसंपत्ती होय. उत्तम मॅंगॅनीजचा जगातील सर्वांत मोठा साठा जॉर्जिया राज्यात आढळतो. यांशिवाय कॉकेशसमधये असंख्य औषधी पाण्याचे झरे आढळतात. यूरोपातील थंड हवामान रोखून धरणारा हा भिंतीसारखा पर्वत असून हवामानातील विविधता हे कॉकेशसचे वैशिष्ट्य होय. वाळवंटी हवामानापासून थंड हवामानापर्यंत सर्व प्रकार यामध्ये आढळतात.
हवामानाप्रमाणेच येथील वनस्पती व प्राणिजीवन विविध असून विपुल आहे. रशियातील सर्वांत मोठी जंगलसंपत्ती ग्रेटर कॉकेशसमध्ये आढळते, तर डागेस्तानमधील मोठा भाग संपूर्ण वृक्षविरहित आहे. उत्तरेकडील स्टेप भागात व उंच भागात गवत, कोल्चीसमध्ये दलदली कच्छ वनश्री तर हवामानानुसार निरनिराळ्या भागांत अॅश, बर्च, जूनिपर, फर, स्प्रूस, बीच, अॅस्पेन इ. वनस्पती आढळतात. कॉकेशसमधील जंगलात अस्वल, एल्क, खोकड, मार्टीन, बॅजर, लिंक्स, लांडगा, हरिण, चित्ता, रानमेंढा हे प्राणी आढळतात.
ट्रान्स कॉकेशिया राज्यांनी जलविद्युत् व इतर योजनांद्वारा कॉकेशसचा बराच भाग उपयुक्त बनविला असून बाकू, टिफ्लिस, येरेव्हान, बाटुमी, किरोव्हाबाद,लेनिनाबाद ही कॉकेशस भागातील महत्त्वाची शहरे होत. जगातील सर्वांत मोठा दूरदर्शक (५९५ सेंमी. व्यासाचा) कॉकेशसमधील झेलेन-चुक्सकाया येथे १९६७ साली उभारण्यात आला आहे. निसर्गातील अनेक विविध प्रकारांचे कॉकेशसमध्ये एकत्रीकरण झाले असले, तरी कॉकेशसचे रौद्र स्वरूप मानवाला अद्याप कमी करता आलेले नाही.
शाह, र. रू.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/31/2020
कार्पेथियन : मध्य व पूर्व यूरोपातील पर्वतश्रेणी. ह...
अॅपालॅचिअन पर्वत : उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनार्...
खांगाई : मंगोलिया प्रजासत्ताकाच्या पश्चिममध्य भागा...
झॅग्रॉस पर्वत : नैर्ऋत्य इराणमधील जुरासिक काळातील ...