অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

माझा महाराष्ट्र, मस्त महाराष्ट्र (भाग-तीन)

माझा महाराष्ट्र, मस्त महाराष्ट्र (भाग-तीन)

महाराष्ट्रात अनेक श्रेष्ठ दर्जाची पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांना मोठ्या प्रमाणावर देश-विदेशातील पर्यटक भेट देत असतात. यापैकी काही महत्त्वाच्या पर्यटनस्थळांची माहिती या लेखात करून देण्यात आली आहे. महाराष्ट्राचा पर्यटन दौरा आखण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरेल. नाशिक : त्र्यंबकेश्वर सह्याद्रीच्या डोंगररांगाचे सौंदर्य स्वत:भोवती लपेटून असलेली त्र्यंबकेश्वराची पावनभूमी अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नाशिकच्या पश्चिमेला 30 किलोमीटर अंतरावर सह्याद्री रांगेतील ब्रह्मगिरी डोंगराच्या पायथ्याशी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर विसावलेले आहे. देशातील बारा ज्योर्तिलिंगापैकी त्र्यंबकेश्वर एक आहे. गोदावरीचे उगमस्थान आणि संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ यांची समाधी त्र्यंबकेश्वर येथे आहे. दर बारा वर्षांनी येणारे सिंहस्थ कुंभपर्व अनुभवण्यासाठी देशभरातील भाविक कुशावर्तात पवित्र स्नान करण्यासाठी येतात.

त्र्यंबकेश्वरलगतच अंजनेरी मंदिर व पर्वत आहे. हे स्थळ हनुमान जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. कसे पोहोचाल? नाशिक येथे पोहोचण्यासाठी रेल्वे तसेच एस.टी बसेस मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्र्यंबकेश्वर नाशिकपासून 28 कि.मी आहे. श्री क्षेत्र सप्तशृंगगड राज्यातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी श्री सप्तशृंगी हे आद्य स्वयंभू शक्तिपीठ आहे. एकूण 18 हातात विविध अस्त्र धारण केलेली भगवती ही महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकालीचे त्रिगुणात्मक स्वरूप आहे. देवीची मूर्ती 11 फूट उंच असून पूर्वमुखी व डाव्या बाजूस जराशी झुकलेली मान स्वरूपातील अतिसुंदर मूर्ती आहे. गडाचा परिसर अतिशय सुंदर आहे. कसे पोहोचाल? नाशिक येथून दिंडोरीमार्गे 65 किमी अंतरावर नांदुरी येथे येऊन गुजरात राज्यातून सापुतारा-कनाशी-अभोणामार्गे (सापुतारा- नांदुरी 36 किमी) मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव येथून (धुळे-नांदुरी 130 किमी) एस.टी.बसेस थेट गडापर्यंत जातात.

जळगाव : पाल सातपुडा पर्वताच्या एका पठारावर रावेर तालुक्यात पाल हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण वसलेले आहे. हे निसर्गरम्य पर्यटनस्थळ रावेरच्या 22.4 किमी पश्चिमेस आहे. पाल येथील जुन्या किल्ल्याचे बुरूज, तट व इतर अवशेष या स्थळाची प्राचीनता दर्शवतात. आभीर अधिपतींचे राज्य असताना येथे त्यांचे स्थानिक मुख्यालय होते. पुढे सत्तेत आलेल्या फारुकीचे देखील येथे ठाणे असावे. गावाजवळील टेकडीवर पाल ऋषींचे स्मारक आहे. कसे पोहोचाल? जळगाव ते रावेर 65 कि.मी. रावेर ते पाल 26 कि.मी.अंतर असून एसटी बसेस उपलब्ध आहेत. गांधी तीर्थ, जळगाव गांधीवादी विचारवंत व उद्योजक भंवरलालजी जैन यांनी जैन हिल्स परिसरात ‘गांधी तीर्थ’ साकारले आहे.

निसर्गरम्य परिसरात महात्मा गांधी यांचे जीवनचरित्र, साहित्य, घडामोडी, त्यांची अहिंसा मार्गाची चळवळ, देश-विदेशातील त्यांच्या चळवळींची आठवण करून देणारे हे तीर्थ म्हणजे एक विद्यापीठच ठरले आहे. महात्मा गांधींच्या जीवनावर आधारित एक विशाल संग्रहालय म्हणून गांधीतीर्थाकडे पाहता येईल. जैन हिल्स परिसरातील निसर्गरम्य अशा आमराई असलेल्या भागात चार एकर क्षेत्रात सुमारे 65 हजार चौरस फूट परिसरात गांधी तीर्थ साकारले आहे. या विशाल भवनात ग्रंथालय, वाचनालय, संग्रहालय, अभिलेखागार, सभागृह आहेत. कसे पोहोचाल? जळगाव येथे रेल्वेने अथवा एस.टी.बसने पोहोचता येते. जळगाव शहरापासून चार किमी अंतरावर शिरसोली रोडवर (जळगाव- पाचोरा) हे ठिकाण आहे.

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 7/28/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate