অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ताम्हिणी अभयारण्य

डोंगर कड्यांवर ओथंबून आलेली ढगांची गर्दी, दाटलेलं धुकं आणि सरींवर सरी... घेऊन कोसळणाऱ्या पावसाशी झिंगडझुम्मा करायचा असेल तर तुमच्या-माझ्या सारख्यांची पाऊलं आपणहूनच ताम्हिणी घाटाकडे वळतात. पावसाच्या अलौकिक स्पर्शानं दाटीवाटीने फुलून आलेला निसर्ग आणि आपला ताठरपणा बाजूला ठेवत अंगाखांद्यावर वृक्ष वेलींना आणि कोसळणाऱ्या धबधब्यांना घेऊन मायाळू झालेल्या डोंगररांगा यांचं वर्णन कसं करावं ? त्यासाठी शब्दही अपुरे पडतात. त्यामुळेच वर्षा सहलीसाठी आलेल्या पर्यटकांनी इथल्या डोंगररांगा आणि घाट रस्ता फुलून जातो. मुळशी धरणाचा नयनरम्य देखावा मन प्रसन्न करतो.

पुण्यापासून 70 कि.मी अंतरावर असलेल्या या घाटाचं निसर्गसौंदर्य मनाला भूरळ पाडणार आहे. मुंबई-गोवा मार्गाने कोलाडपर्यंत गेले की पुढे कुंडलिका नदी लागते. तिच्यावरचा पूल ओलांडला की डाव्या बाजूने मुळशी धरणावरून पुढे पुण्याला जाता येते. कोलाड आणि मुळशी धरणाच्या मधल्या भागात ताम्हिणी घाट आहे या घाटात ताम्हिणी वन्यजीव अभयारण्य वसलेलं आहे. 3 मे 2013 रोजी या अभयारण्याची घोषणा करण्यात आली. प्रामुख्याने पुणे आणि अंशत: रायगड जिल्ह्यात 49.62 चौ.कि.मी.च हे क्षेत्र अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आल. कडेकपाऱ्या, ऊंच कडे, खोल दऱ्यांमधील हे अभयारण्य सदाहरित व निमसदाहरित वनांनी वेढलेलं आहे. अभयारण्याची समुद्रसपाटीपासूनची ऊंची 550 ते 1050 मीटर एवढी आहे.

प्राणी व वनस्पती प्रजाती

शांतपणे जागोजाग खळाळणारे निर्झर, थेट डोंगरकड्यावरून उडी मारणारे भले मोठे धबधबे आणि खाच-खळग्यातून वाट काढत धावणारे पाणी हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. कोसळणारं पाणी अंगावर घेत चिंब भिजण्याचा, त्यासोबत गरम भाजलेलं मक्याचं कणिस खाण्याचा आनंद काय सांगावा ? तुम्हाला माहितीच आहे ? ताम्हिणी अभयारण्यात सस्तन प्राण्यांच्या 28 प्रजाती आहेत. स्थानिक पक्षांच्या 12 प्रजातींसह येथे 150 प्रकारचे पक्षी आपण पाहू शकतो. हे मोहमयी फुलपाखरांचंही निवासस्थान आहे. इथं 72 प्रकारची फुलपाखरं आहेत. 18 प्रकारचे सरपटणारे प्राणी आणि 33 प्रकारच्या दुर्मिळ वनस्पती देखील आहेत. वनांमधील श्रद्धेचा भाग म्हणून ज्या देवरायांकडे पाहिलं जातं अशा अनेक देवराया ताम्हिणी अभयारण्यात दिसून येतात. विशेष उल्लेखनीय म्हणजे येथील वरदानी आणि काळकाई देवराई. ताम्हिणी गावातच विंझाई ग्रामदेवतेचे भव्य मंदिर आहे. विपूल वनसंपदा आणि देवरायांमुळे ताम्हिणी केवळ पर्यटकांचच नाही तर अभ्यासक, संशोधक आणि गिर्यारोहकांचेही हक्काचे पर्यटनस्थळ बनले आहे.

शेकरू, पिसोरी, भेकर, सांबर, खवल्या मांजर, उदमांजर, जावडी मांजर, वाघाटी, बिबट्या रानमांजर, साळींदर रानडुक्कर आणि वानर हे वन्यजीव आपल्याला या अभयारण्यात पहायला भेटतात. अजगर, नाग, घोणस, चापडा, हरणटोळ, खापरखवल्या, दिवड, धामण, सापसुरळी, घोरपडीचा या अभयारण्यात वावर आहे. जमिनीवर, झाडावर आणि पाण्यात आढळणारे अनेक जातीचे बेडूक व भेग आपण इथे पाहू शकतो. नाना, भोमा, उंब, पारजांभूळ, अंजनी, रान जायफळ, काटेकुंबळ, पळस, गेळा, आंबा, काटेसावर, हिरडा, बेहडा, ऐन, कुंभा, उडाळी, बोक, घोळ, वारस यासारख्या वृक्ष प्रजातींबरोबर कारवी, करवंद, धायटी, रामेठा, दिंडा, फापट, भंडार, देवनाळ ही झुडप प्रजाती आणि वाटोळी, ओंबळ, गारंबी, ऐरण, पहाडवेल, घोटवेल, कडुकारंदा, पेंडकुळ, आंबगुळी, तोरण, कुसर, खरपूडी, बेडकीचा पाला, करटुली अशा अनेक वेली या परिसरात आहेत. सोनकी, निचुरडी, काळीमुसळी, भुई आमरी, पांगळी, खुळखुळा, कचोरा, पानतेरडा, पंद बृम्बी, यासह अत्यंत दुर्मिळ अशी शिंदळ माकोडी ही वानसे येथे आढळून येतात.

इतर वनस्पतींबरोबर शेवाळ, कवक, दगडफुलं व नेच्यांच्या अनेक जाती विपुल प्रमाणात दिसून येतात. पर्वत कस्तूर, रानकस्तूर, स्वर्गीय नर्तक, पाचुकवडा, हळद्या, कुरटुक, निखार, नारद बुलबूल, कोतवाल, शमा, नवरंग, सर्पगरूड, गिधाड, माळखरूचि, रातवा, धनेश टकाचोर, श्रृंगी घूबड असे अनेक पक्षी आणि प्राणी या अभयारण्यात आहेत. महाराष्ट्र शासनाने राज्य फुलपाखरु म्हणून घोषित केलेले  'ब्ल्यू मॉरमॉन' हे फुलपाखरू आपल्याला येथे पाहाता येते.

आसमंत दरवळून टाकणारा मृदगंध, विविध वनस्पतींचे दर्प, डोंगररांगा आणि रानवाटांचे थ्रील अनुभवायाचे असेल, कोसळणाऱ्या अनेक मोठमोठ्या धबधब्यांचे पाणी अंगावर झेलायचे असेल तर माळशेज घाटा इतकाच सुंदर असलेला हा घाट आणि या घाटातल्या ताम्हिणी अभयारण्याला एकदा भेट द्यायलाच हवी. मुळशी धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याने पुढे गेल की आपली पळसे येथील मोठ्या धबधब्याची भेट होते. कुंडलिका नदीच्या पाण्यात डुबता येतं. शुभ्र फेसाळणाऱ्या तिच्या पाण्यात साहसी खेळाचा अनुभव घेता येतो.

जाल कसे ?

जवळचे विमानतळ व रेल्वेस्टेशन : पुणे

मुळशी धरण तलावानजिक तसेच कोलाड येथे विश्रांतीगृह

मुंबईपासूनचे अंतर 140 कि.मी.

लेखिका: डॉ. सुरेखा म. मुळे

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate