राकट देशा... कणखर देशा...दगडांच्या देशा... असे वर्णन असलेल्या आपल्या महाराष्ट्राला मिळालेल्या अनेक निसर्गाच्या वरदानापैकी पर्यटनासाठी उपयुक्त असा निसर्ग हेही एक महत्वाचे वर्णन लाभलेले आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये प्रामुख्याने पर्यटनासाठी जाण्यास अनेकजण आपले प्लॅन आखतात. काहीजण दीर्घ तर काही कमी दिवसाची आखणी करतात. मुंबईपासून लगत असलेल्या रायगड जिल्ह्यात सहजतेने दोन दिवसांची आखणी करुन पर्यटनाचा आनंद घेता येऊ शकतो.
तर मग चला पर्यटनाला...रायगडला... अभयारण्य, लेणी अन् माथेरान पहायला...
महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पसरलेला रायगड जिल्हा कोकणाचा एक प्रमुख भाग आहे. राजधानी मुंबई पासून 120 कि.मी.अंतरावर असलेला रायगड जिल्हा कोकण विभागीय महसूल क्षेत्रात येतो. जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 7162 चौ.किमी आहे. उत्तरेला ठाणे व वायव्येला मुंबई हे जिल्हे आहेत. जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र असून दक्षिणेस असलेल्या सावित्री नदीने रत्नागिरीपासून रायगड जिल्ह्याची दक्षिण सीमा निश्चित केली आहे. जिल्ह्याची पूर्वेकडील सीमा सह्याद्री पर्वताच्या लहान मोठ्या रांगांनी वेढलेली असून त्याला लागून पुणे जिल्ह्याची हद्द सुरु आहे. पोलादपूर, महाड, श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, रोहा, तळा, मुरुड, अलिबाग, पेण, सुधागड-पाली, खालापूर, कर्जत पनवेल, उरण अशा पंधरा तालुक्यांचा हा जिल्हा आहे.
कोकण रेल्वेमुळे रायगडच्या आर्थिक प्रगतीला अधिक वेग आला. अलिबाग येथील आरसीएफ कंपनी, पनवेल व महाड येथील औद्योगिक वसाहत, पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू प्रकल्प अशा मोठ्या प्रकल्पांमुळे येथील अर्थकारणाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. रायगड जिल्ह्यातून मासे आणि कोळंबी, गणपतीच्या मूर्ती परराज्यातही जातात. पेण तालुक्यात गणपतीच्या मूर्ती बनविण्याचा उद्योग विकसित होत आहेत. नव्या पिढीचा कल सामूहिक शेतीकडे असल्याने कृषी क्षेत्रातील आधुनिक प्रकारचे प्रयोग जिल्ह्यात केले जात आहेत. मात्र पर्यटन हा जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख भाग आहे. गेल्या काही वर्षात पर्यटन व्यवसाय वेगाने विस्तारला आहे. हा विस्तार लक्षात घेता शासनातर्फे पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. पर्यटकांना आकर्षित करणारा हा जिल्हा निसर्गाशी असलेले नाते अधिक दृढ करीत प्रगतीच्या वाटेवर वेगाने पुढे जाण्यास सज्ज झाला आहे. तर पाहुयात रायगड जिल्ह्यातील काही पर्यटनस्थळे...
महाड तालुका
महाड तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेला किल्ले रायगड मोठ्या दिमाखाने उभा आहे. याखेरीज अन्यही काही पर्यटनस्थळे आहेत.
चवदार तळे
महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह इतिहासात प्रसिद्ध आहे. तळ्याचे पाणी सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला. या लढ्याची आठवण तसेच 'समतेचे प्रतिक' म्हणून पर्यटक या तळ्याला भेट देतात. या परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळाही उभारण्यात आला आहे.
वाळण कुंड
हे महाड तालुक्यातील आगळेवेगळे आणि प्रेक्षणीय स्थळ आहे. महाडच्या ईशान्येस 19.31 कि.मी. अंतरावर एस.टी. मार्गावर वाळण बुद्रुक गावाच्या पुढे आहे. कुंडात लहान मोठ्या आकाराचे देव मासे असतात. हा डोह 91 मी. लांब व 10 मी. रुंद आहे. हे कुंड पवित्र मानले जाते. येथील लोकांच्या अनुभवातून माशांचा नाश करता येत नाही.
शिवथरघळ
समर्थ रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथ जेथे लिहिला ते एक निवांत आणि निसर्गरम्य स्थळ म्हणजे शिवथरघळ. शिवथरघळीतच रामदासांनी दासबोधसारख्या पवित्र ग्रंथाची निर्मिती केली. शिवथरघळ हे महाडच्या पूर्वेस 34 किमी अंतरावर आहे. घनदाट वनश्री, डोंगर माथ्यावरुन वाहणारे झरे तेथील सुंदर मठ ही प्रेक्षणीय स्थळे आहेत. सर्व बाजूंनी उंच पर्वत आहेत. वाघजाई दरीच्या कुशीत हे रमणिय ठिकाण आहे. भगवान श्रीधरस्वामी आणि समर्थ रामदास यांच्या मूर्ती येथे आहेत.
कर्जत तालुका
माथेरान
माथेरानला जाताना 'टॉय ट्रेनने' होणारा दोन तासाचा प्रवास स्मरणीय असतो. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या या स्थानाला भेट देताना विविध पक्षी, माकडे आणि हिरव्यागार डोंगरांची समृद्धी सभोवती असल्याने हा प्रवास संपूच नये असे वाटते. सोबत पॅनोरमा, गॅरवॅट अलेक्झांडर, वनट्री हील असे विविध पॉईंट पर्यटकांना आकर्षित करतात. मुंबई किंवा पुण्याहून माथेरानला जाताना कर्जतपर्यंत रेल्वे अथवा लोकलने जावून तेथून नेरळला लोकलने जावे लागते. नेरळपर्यंत एसटी बसेसचीदेखील सोय आहे. नेरळहून 'टॉय ट्रेन' अथवा खाजगी टॅक्सीने जाता येते. खाजगी वाहन मात्र केवळ 'दस्तुरी पॉईंट' पर्यंत नेता येते. त्यानंतर घोड्यावर बसून अथवा पायी भटकंती करावी लागते. हा अनुभवदेखील स्मरणीय असाच असतो. ऑक्टोबर ते मे हा कालावधी भेट देण्यासाठी अत्यंत योग्य असा असतो.
उरण तालुका
घारापूरची लेणी
मुंबईहून सात किलोमीटर अंतरावर असलेले उरण तालुक्यातील घारापूरी बेट 'एलेफंटा केव्हज्' म्हणून प्रसिद्ध आहे. दगडात कोरलेल्या या गुंफा सातव्या शतकातील आहेत. या गुंफांना जागतिक हेरिटेजचा दर्जा मिळाला आहे. गुहेत निर्माता, रक्षक आणि संहारकाचे प्रतिक असलेले शिवशंकराचे त्रिमूर्ती शिल्प आहे. इतरही शिल्पे प्रेक्षणीय आहेत. येथे जाण्यासाठी मुंबई येथील अपोलो बंदर आणि गेट वे ऑफ इंडिया येथून बोटींची सुविधा आहे.
पनवेल तालुका
कर्नाळा अभयारण्य
मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलपासून 10 किलोमीटर अंतरावर असणारा कर्नाळा किल्ल्याचा 12 किलोमीटरचा परिसर पक्षी अभयारण्य म्हणून परिचित आहे. अभयारण्याच्या दाट झाडींमधून ऐकू येणारी पक्ष्यांची किलबिल पर्यटकांना भुरळ पाडते. सव्वाशेपेक्षा जास्त प्रकारचे पक्षी आणि पंचवीसपेक्षा जास्त स्थलांतर करणारे पक्षी अभयारण्यात आढळतात.
अलिबाग तालुका
अलिबाग
बेन अलि नामक व्यक्तीने या परिसरात विहिरी खोदून आंबा आणि नारळाच्या बागा लावल्या म्हणून या शहराला 'अलिबाग' नावाने ओळखले जाते. हे सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात सरखेल कान्होजी आंग्रे यांनी शहर विकसित केले. शहरालगत सुंदर समुद्र किनारा असून समुद्रात कुलाबा किल्ला आहे. होडीने किल्ल्याला भेट देता येते.
अलिबागपासून जवळच असलेल्या चौल गावाला ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व आहे. या निसर्गसंपन्न गावातील डोंगरावर श्री दत्तात्रयाचे मंदिर आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेला याठिकाणी जत्रा भरते. याच परिसरातील नागाव, मांडवा आणि किहीम समुद्र किनारा सागरी पर्यटनासाठी अत्यंत उत्तम आहे. अलिबागजवळच असलेल्या मापगाव येथील 370 मीटर उंच डोंगरावर कनकेश्वराचे मंदिर आहे. तपोभूमी म्हणून प्रसिद्ध असलेले कनकेश्वर कान्होजी आंग्रे यांचे कुलदैवत असल्याने येथील शिवमंदिराला अनेक भाविक भेट देतात.
अलिबाग-रोहा मार्गावर अलिबागपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या साळाव गावातील डोंगरावर मंदिर उभारण्यात आले आहे. हे मंदिर 'बिर्ला मंदिर' म्हणून ओळखले जाते. शुभ्र संगमरवरी दगडातील अप्रतिम वास्तू आणि मंदिराचा रम्य परिसर प्रवासातील थकवा घालविणारा आहे. मंदिराला सकाळी 6 ते 11 आणि दुपारी 4.30 ते 9 या वेळेत भेट देता येते.
अष्टविनायक
महाडचा श्री वरदविनायक
अष्टविनायकापैकी एक असलेले महाडच्या श्री वरदविनायकाचे देवस्थान पुणे-खोपोली रस्त्यावर शीळ फाट्यापासून जवळच आहे. हे मंदिर श्रीमंत पेशव्यांनी बांधले आहे. खोपोलीपर्यंत लोकल रेल्वेने जाण्याची सोय आहे. (खोपोली-महाड- 8 किमी)
पालीचा श्री बल्लाळेश्वर
कल्याण श्रेष्ठी यांचे पूत्र बल्लाळ यांच्या तपश्चर्येमुळे हा गणपती प्रकट झाल्याची कथा असल्याने त्यास 'श्री बल्लाळेश्वर' नावाने ओळखले जाते. श्री गणेशाची मूर्ती 3 फूट उंच असून या मंदिराच्या मागील बाजूस 'धुंडी विनायकाचे' मंदिर आहे. पेशव्यांनी येथे पोर्तुगीज बनावटीची घंटा बसविली आहे. पालीजवळच सुधागड येथे गरम पाण्याचा झरा आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठाणे येथून पाली गाव 13 किलोमीटर अंतरावर आहे.(खोपोली-13 किमी)
मुरुड-जंजिरा
जंजिऱ्याच्या सिद्दीची राजधानी म्हणून मुरुडची ओळख आहे. प्राचीन किल्ल्यासोबतच किनाऱ्यावरील नारळी-पोफळीची झाडे परिसराच्या सौंदर्यात भर घालतात. समुद्र लाटांचा सामना करीत मजबुतीने उभी असणारी 40 फूट उंचीची किल्ल्याची तटबंदी खास आकर्षण आहे. किल्ल्यातील गोड्या पाण्याचे तलाव, मजबूत बुरूज, तोफा, पाहता येतात. मुरुड किंवा राजापुरी येथून बोटीने किल्ल्यात जाता येते. जवळच असलेल्या नांदगाव आणि काशीदच्या शांत आणि रम्य समुद्र किनाऱ्यालाही भेट देता येते. नांदगावला श्रीगणेशाचे प्रसिद्ध मंदिरदेखील आहे.
श्री क्षेत्र हरिहरेश्वर
दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेले श्री क्षेत्र हरिहरेश्वर मुंबई-गोवा महामार्गावरील माणगावपासून अंदाजे 30 किलोमीटर अंतरावर आहे. हरिहरेश्वर येथील कालभैरव मंदिरासोबतच सुंदर समुद्र किनारा पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. येथे महाशिवरात्री, कार्तिक शुद्ध एकादशी ते पौर्णिमा आणि कालाष्टमी अशी वर्षांतून तीनवेळा येथे यात्रा होते. माणगावकडून महाडकडे येताना सावित्री नदीच्या किनाऱ्यालगत उष्ण पाण्याच्या कुंडांना भेट देता येते.
संकलन- जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग.
माहिती स्रोत: महान्यूज, शनिवार, ३० मे, २०१५