निळाशार समुद्र, लाटांचे आक्रमण परतवून लावत निर्धाराने सागरात पाय रोवून उभा असलेला मुरूड जंजिऱ्यासारखा किल्ला आणि असंख्य निर्झरांना अंगाखांद्यावर खेळवत चिंब भिजून गेलेल्या आणि हिरव्याकंच झालेल्या रानवाटा हा रायगडचा आकर्षणाचा भाग. त्यात घनदाट जंगलात वनपर्यटनाची साद घालणारं फणसाड अभयारण्य…
फणसाड हे रायगड जिल्ह्यातील मुरूड आणि रोहा तालुक्यात आहे. बारशिव, काशीद, चिकनी, सर्वा दांडा, नांदगाव, मजगाव वळास्ते, कोकबन, सुपेगाव या अडतीस गावांनी ते वेढले आहे.
पावसाळा सुरु झाला की आपोआप पाऊल वर्षा सहलीसाठी तिकडे वळायला लागतात… अगदी मनसोक्त भिजण्यासाठी… रानवाटांवरून भटकंती करण्यासाठी. मुंबई ते फणसाड अभयारण्याचं अंतर साधारणत: 175 कि.मी.चं. निसर्गानं या भागाला भरभरून दान दिलं आहे. पूर्वी मुरुड जंजिरा संस्थांनचे नवाब सिद्दी यांच्या मालकीचे हे क्षेत्र शिकारीसाठी उपयोगात आणले जायचं. त्यावेळी नवाबांनी जंगलामध्ये जांभा दगडाचे वर्तुळाकार ओटे बनविले होते. स्थानिक भाषेत त्यांना ‘बारी’ असे म्हणतात ते आजही पाहता येतात.
काशिदच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यापासून फक्त 12 कि.मी अंतरावर असलेले हे वन मिश्र सदाहरित वने, शुष्क पानगळीचे वने, सदाहरित वने याप्रकारात मोडते. या जंगलाचे जतन आणि संवर्धन व्हावे या हेतूने महाराष्ट्र शासनाने 25 फेब्रवारी 1986 रोजी या क्षेत्राला राखीव वनाचा दर्जा देत अभयारण्य म्हणून घोषित केले.
अभयारण्याचे क्षेत्रफळ 69.790 चौ.कि.मी. आहे. जंगलात सुमारे 700 प्रकारच्या वृक्ष प्रजाती आहेत. 17 प्रकारचे प्राणी, 90 हून अधिक जातीची रंगीबेरंगी फुलपाखरं आणि 17 प्रकारचे साप आहेत. दुपारनंतर वेली-झुडपांवर फुलपाखरांची बाग फुललेली असते. अभयारण्यात 30 पाणस्थळे आहेत. त्यांना स्थानिक भाषेत ‘गाण’ म्हणतात. सकाळी आणि सायंकाळी येथे पक्षी संमेलन भरते. फणसाड अभयारण्य हे पक्षांचं नंदनवन आहे निसर्गाचं स्वत:चं असं एक संगीत असतं. सूर्योदय आणि सुर्यास्तादरम्यान पक्षी निरीक्षणासाठी गेल्यास निसर्गाचं हे अनोखं संगीत आपल्याला इथे विनासायास ऐकायला मिळतं.
निलगिरीची रोपवने, ऐन, किंजळ, जांभूळ, कुडा, गेळा, अंजनी, कांचन, सावर, अर्जन यारख्या वृक्षांबरोबर सर्पगंधा, कुरडू, नरक्या, सीता अशोक सारखी उपयुक्त वनौषधीही इथे विपूल प्रमाणात आहे. गारंबीची वेल हे इथलं वैशिष्ट्य. या वेलीच्या शेंगांमधील गर हा शेकरूचा आवडता खाद्यपदार्थ. या वेलीची लांबी 100 मीटर पेक्षा जास्त असते. राज्य शासनाने ज्या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा दिला आहे ते ब्ल्यू मॉरमानही इथे आनंदाने विहरतांना दिसतं. इथं रानससा, सांबर, भेकर, पिसोरी, सांळींदर, तरस, रानडुक्कर, मुंगूस, कोल्हा, वानर, माकड, रानमांजर व बिबट्या आणि महाराष्ट्राचं आणखी एक मानचिन्ह असलेलं ‘शेकरु’ हमखास दृष्टीस पडते. पिसोरी हे जगातील सर्वात लहान पण अतिशय चपळ हरीण आपण येथे पाहू शकतो. नाग, फुरस, घोणस, मण्यार, वायपर अशा विषारी तर हरणटोळ, तस्कर साररख्या बिनविषारी सापाचा इथे वावर आहे.
ब्राह्मणी घार, घुबड, तुरेवाला, सर्पगरुड, ससाणा, सफेद पाठीची गिधाडे यासारखे शिकारी पक्षी तर सातभाई, बुलबुल, रातवा, रानकोंबड्या, धनेश, कोतवाल यासह वेडाराघू, हळद्या, तांबट, खंड्या, खाटीक, सुभग, नीलपंख, स्वर्गीय नर्तक, सुतार, महाराष्ट्राचे मानचिन्ह असलेले हरीयाल, कोकीळ यासारखे गाणारे आणि आपल्या मोहमयी दुनियेत घेऊन जाणारे पक्षी आपलं अस्तित्त्वं विसरायला भाग पाडतात. या जंगलातील आणखी एक आकर्षक पक्षी म्हणजे धनेश. हा पक्षी याच्या वैशिष्ट्यपूर्ण चोचीमुळे सहज ओळखता येतो. रुबाबदार बिबट्याचं हमखास दर्शन ज्याला घ्यायचं त्याने इथे जरूर यावं.
सुपेगावचे वन विभागाचे व्हाईट हाऊस तंबू तुमच्या निवासाची सुंदर व्यवस्था करतात. सर्व गरजांनी परिपूर्ण असलेल्या या तंबूत राहणं ही एक आनंददायी गोष्ट आहे. शिवाय खाजगी निवास व्यवस्थाही आहेतच. बचतगटांमधील महिलांच्या हातचे जेवण तुम्हाला घरच्या जेवणाची उणीव भासू देत नाही. प्लास्टिक वापराला बंदी असल्याने परिसरात स्वच्छता आणि शांतता दोन्ही हातात हात घालून नांदतांना दिसतात. वन विभागाचे निसर्ग परिचय केंद्र आपली वनांबद्दलची माहिती परिपूर्ण करते. इथलं आणखी एक आकर्षणाचे ठिकाण म्हणजे फणसाड धबधबा. अलिबाग-मुरुड रोडवर बोर्ली येथे उतरायचे. तिथून तीन ते साडेतीन कि.मी.अंतरावर फणसाड धबधबा आहे. निसर्गाच्या कुशीत फेसाळत कोसळणारा हा पाण्याचा पांढरा शुभ्र प्रपात पाहणं खूपच उत्साहवर्धक ठरतं.
जवळचं रेल्वे स्टेशन रोहा आहे. जे सुपेगांव पासून 39 कि.मी वर आहे.
जवळचं बसस्थानक – तळेखार, सुपेगाव, असरोली.
मुरूड-अलिबाग-रेवदंडामार्गे फणसाडला जाता येतं. रोहा-मुरूड-रेवदंडामार्गे बसनं तळेखार किंवा असरोली फाट्यावर उतरायचं. तळेखारपासून ५ किमीवर अभयारण्य आहे. रेवदंड्याहून मुरूडला जाणाऱ्या बसनंही येथे जाता येतं. अभयारण्यात काही खाण्यास मिळत नाही. त्यामुळे बरोबर खाद्यपदार्थ घेऊन जाणं सोयीच ठरतं. मुंबईकरांना, ज्यांचा श्वास सिमेंटच्या जंगलात कोंडतो त्यांना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानानंतर कर्नाळा, तुंगारेश्वर, तानसा अभयारण्याला जसे जाता येते तसेच आणखी थोड्या अंतरावर असलेल्या फणसाड अभयारण्यालाही सहजपणे भेट देता येईल. फणसाडगाण, चिखलगाण, धरणगाण असे इथले प्रमुख पाणवठे आहेत. या पाणवठ्याच्या आजुबाजूला वन्यजीवन अगदी सहजतने बघायला मिळतात. फणसाडच्या जंगलात गेलो आणि नवीन काही बघितले नाही असे होत नाही. त्यामुळे वेळ मिळताच कधीही जा आणि जंगल भ्रमंतीचा मनमुराद आनंद लुटा...
लेखिका: डॉ. सुरेखा म. मुळे
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 3/30/2020
ताम्हिणी अभयारण्य विषयक माहिती.
रायगड किल्ला पर्यटन विकास माहिती.
राकट देशा... कणखर देशा...दगडांच्या देशा... असे वर्...