অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

खुसखुशीत करंजी

खुसखुशीत करंजी

वेशीवरच्या पाऊलखुणा : खुसखुशीत करंजी

नाशिकच्या मातीला धैर्य अन्‌ शौर्याचा गंध आहे. म्हणून नाशिकला देवभूमी व तपोभूमीबरोबर वीरांची भूमीही म्हटले जाते. अनेक लढायांपासून लढ्यांचे साक्षीदार असलेली ही भूमी विकासभूमी म्हणूनही ओळखली गेली. या भूमीने अनेक घराण्यांना अडचणीच्या काळात समाजधुरीण राजे दिले. फक्त राजेच नाहीत तर त्या राजांच्या कारकिर्दीने नाशिकच्या शिरपेचात मोरपंख फुलविले. नाशिकच्या एका खेडेगावात जन्मलेला अन्‌ होळकर घराण्याच्या गादीवर बसलेल्या एका महाराजाने तर मध्य प्रदेशात रेल्वे विकसित करून विकासगंगा प्रवाहित केली अन्‌ होळकर घराण्याला वैभव मिळवून दिले. अशा ऐतिहासिक पैलूंनी सजलेले या महाराजांचे जन्मस्थान असलेली करंजी हे गाव पाहताना मनात वसलेली ही करंजी खुसखुशीत झाल्यासारखी वाटते.

नाशिकच्या प्रत्येक गावाचे काहीतरी वेगळेपण आहे अन् हाच वेगळेपणा पर्यटकांना त्या गावात जायला प्रेरीत करतो. नाशिक¬-औरंगाबाद रस्त्यावर तीस किलोमीटरवर चांदोरी फाट्याहून उजवीकडे सायखेडा हे गाव लागते. सायखेड्याहून साधारण २५ किलोमिटरवर गेल्यावर गोदाकाठी वसलेले करंजी खुर्द या गावात जाता येते. ज्ञात-अज्ञात अन् खुसखुशीत ऐतिहासिक पैलूंनी करंजी हे गाव ओळखले जाते. गावचे नाव करंजी कसे पडले हे ग्रामस्थांना माहीत नसले तरी ऐतिहासिक पाऊलखुणांनी करंजी खुसखुशीत झालेली दिसते. करंजीची एक वेगळी ओळख म्हणजे होळकरांची करंजी. करंजी हे अवघ्या दोनशे-अडीचशे उंबऱ्यांचे लहानसे गाव आहे. पण त्याचा इतिहास एका ऐतिहासिक घडामोडीशी जोडला गेला आहे.

१८ व्या शतकात होळकर घराण्याने पराक्रमाच्या जोरावर मराठा सैन्यात महत्त्वाचे स्थान मिळविले होते. त्यामुळे पेशव्यांनी त्यांना इंदूर येथील संस्थान बहाल केले. मल्हारराव होळकरांच्या पराक्रमांनी सुरू झालेली शौर्याची परंपरा पुढे फार कमी पहायला मिळाली. अहिल्याबाई होळकरांचा नाशिकशी जवळचा संबंध आला. होळकर राजघराण्याला पंधरा राज्यकर्ते मिळाले. काही अल्पायुषी तर काही फक्त नावापुरते राजे ठरले. यशवंतराव होळकरांनंतर त्यांची विधवा पत्नी कृष्णाबाईंना ऊर्फ केसरबाईंना होळकर घराणे पुढे घेऊन जाण्यासाठी दत्तक पुत्र हवा होता. तेव्हा त्यांनी नाशिकजवळच्या निफाड तालुक्यातील करंजी गावातील गंधारे-करंजीकर कुटुंबातील एक मुलगा होळकर घराण्यासाठी गादीवर बसण्यासाठी निवडला. हा मुलगा म्हणजे मल्हार (मल्हारराव होळकर नव्हे.). मल्हारचा जन्म करंजीत ३ मे १८३५ मध्ये झाला होता.

कृष्णाबाईंनी त्याचे नामकरण तुकोजीराजे (द्वितीय) असे केले. मल्हार वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत करंजीतच वाढला होता. गंधारे कुटुंब करंजीतील मोठे प्रस्थ असावे. कारण त्यांचा वाडा होता. यावरून गंधारे आणि होळकर कुटुंबात काहीतरी संबंध आला असावा. यामुळेच गंधारे कुटुंबीयांच्या ध्यानीमनी नसताना मल्हार म्हणजे तुकोजीराजे (द्वितीय) होळकर घराण्याचे अकरावे राजे म्हणून १७ जून १८४४ रोजी गादीवर बसले. यशवंतरावांनंतर सातवे मल्हारराव (द्वितीय), आठवे मार्तंडराव, नववे हरीराव व दहावे खंडेराव हे राजे अगदीच अल्पायुषी ठरले. तुकोजीरावांनी मात्र आपला राज्यकाळ सर्वांगीण गाजवला. विकासात्मक सुवर्णकाळ म्हणून होळकर घराण्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनंतर करंजीच्या तुकोजीराव होळकरांचे नाव घेतले जाते. मात्र त्यांच्या कामगिरीची ओळख फारशी करंजीकरांनाही नाही अन् नाशिककरांनाही नसल्याचे दिसते.

एका संस्मरणीय कारकिर्दीचा शिल्पकार असलेल्या तुकोजीराव होळकरांनी इंदूरची गादी बेचाळीस वर्ष उत्तम राज्य कारभार करीत विकासपुरूषाची कर्तव्ये पारपाडीत सांभाळली. इंग्रजांच्या वर्चस्वाच्या काळात तुकोजीरावांनी समतोल राखीत इंदूर तसेच मध्य प्रदेशात अनेक विकासकामे केली. यात मध्यप्रदेशात रेल्वेची सुविधा निर्माण केली. रोजगार निर्मितीसाठी कापडगिरण्या सुरू केल्या. टपाल व्यवस्था, आरोग्यकेंद, दवाखाने, इंजिनियरींग कॉलेजेस, तसेच वन व महसुल विभाग सुरू केले. त्यांनी वर्तमानपत्रही सुरू केले होते. तुकोजीरावांच्या नावाने त्यावेळी नाणीही होती. इंग्रजांना सतावत ठेवण्यासाठी त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या क्रांतीकारकांनाही मदत दिली. इंदूर संस्थानाचे राष्ट्रगीत म्हणण्याची प्रथा त्यांनी इंदूर संस्थानातंर्गत येणाऱ्या व्यवस्थेत रूढ केली. म्हणूनच तुकोजी (द्वितीय) यांचा कार्यकाळ होळकर घराण्यातला श्रेष्ठकाळ मानला जातो. वयाच्या ५१ व्या वर्षी १७ जून १८८६ मध्ये त्यांचे निधन झाले.

महाराज तुकोजीराव होळकरांच्या जन्मस्थानाचे स्मृतीत राहिलेले ते घर अजूनही करंजीकर उत्साहाने दाखवितात. मल्हार म्हणजेच तुकोजीरावांचे घर जेथे होते तेथे आता दगडी बांधणीचे एक महादेव मंदिर अन् दगडी बांधणीची धर्मशाळा तेवढी आहे. दोन्ही वास्तू सुंदर आहेत. तुकोजीराव होळकरांचा मुलगा शिवाजी होळकर वडिलांच्या निधनानंतर १९०२ मध्ये त्यांच्या जन्मगावी म्हणजे करंजीत आला होता, अशी आठवण आपल्या वाडवडिलांनी सांगितल्याचे करंजीकर सांगतात. तेव्हा त्याने तुकोजीरावांचा जुना पडका वाडा पाडून तेथे मंदिर व धर्मशाळा उभारली अन् या मंदिराचे नाव तुकेश्वर महादेव मंदिर असे ठेवले. उंच दगडी पाटावर बांधलेले हे मंदिर देखणे असून, मंदिराच्या दरवाजा जवळच्या लाकडी चौकटींवरचं सुंदर नक्षीकाम आहे. मंदिराला रंगकाम केल्याने ते अजूनही आकर्षक वाटते.

मंदिराच्या गाभाऱ्यात होळकर घराण्याचं दैवत म्हणजेच शिवशंकराची पिंड अन् भिंतीत गणपती मूर्ती आहे. येथे तुकोजींच्या जन्मदात्या आईवडिलांच्या सुंदर अशा संगमरवरी मूर्तीही आहेत. तुकोजींचे वडील गंधारे अगदी ऐटीत आपल्या पूर्ण पगडीपोशाखात हातात तलवार घेऊन बसलेली मूर्ती अन् आईच्या मांडीवर बसलेला बाळ मल्हार या मूर्ती पहायला मिळतात. या मूर्तीच्या वर मल्हारला दत्तक घेणाऱ्या कृष्णाबाईंची मूर्ती आहे. यातून करंजी अन् होळकर घराण्याचा इतिहास अख्यायिका स्वरूपात कायम जिवंत राहावा, असा प्रयत्न केलेला दिसतो. कारण ही माहिती देणारा एकही फलक अथवा करंजीकर मिळत नाही. परिसरातील मारूती, शनी, गोदा‌तीरावर स्वयंभू महादेव मंदिर आहेत.

तुकेश्वर मंदिराच्या देखभाल आणि पूजेसाठी इंदूरहून वर्षासन म्हणून ३०० रूपये यायचे. यातील ६० रूपये पूजापाठासाठी ब्राम्हणाला, ३० रूपये झाडझुड करण्यासाठी गुरवाला, उरलेली रक्कम महाशिवरा‌त्रीला गाव जेवणासाठी अशी या वर्षासनाची तरतूद असायची. मात्र गेल्या ४०-४५ वर्षांपासून इंदूर संस्थानाकडून वर्षासन येण्यास बंद झाल्याचे पुजारी विजय जोशी सांगतात. ही प्रथा बंद पडल्याने मंदिर परिसरही बकाल झाला आहे. मात्र तुकोजीराव यांची ३ मे रोजी जयंती व १७ जून रोजी पुण्यतिथी साजरी करायला ग्रामस्थ विसरत नाहीत. गावात मातीची जुनी घरे अन् लाकडीकाम पाहण्यासारखे आहे. ही घरेही आता कात टाकत आहेत. गोदातीरावर सजलेला दगडी चिऱ्यांचा घाट होळकरांची आठवण करून देतो.

होळकर घराण्याचा नाशिकशी जवळचा संबंध आला असून त्यात लक्षात राहते ती अहिल्यादेवी होळकर यांची कारकिर्द आणि तुकोजीराव होळकर (तृतीय) यांचा अंतरजातीय प्रेमविवाह. महाराजा तुकोजीराव होळकर (तिसरे) यांना नॅन्सी अॅन मिलर यांच्याशी प्रेमविवाह करायचा होता. या आंतरवांशिक विवाहाने जगभरातील प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधले. १३ मार्च १९२८ रोजी नाशिक येथे डॉ. कुर्तकोटी शंकराचार्य यांनी मिस मिलर यांना हिंदू धर्माची दीक्षा दिली व लंभाते कुटुंबीयांनी तिला दत्तक घेऊन त्यांना धनगर करून घेतले व त्या नॅन्सी अॅन मिलरच्या शर्मिष्ठादेवी होळकर बनल्या. पण यात तुकोजीराव होळकर (दुसरे) या नाशिककर असलेल्या होळकर राजाची कारकिर्द मात्र झाकोळली गेली. करंजीकर अजूनही होळकरांचे करंजी असे म्हणवून घ्यायला उत्सुक असतात अन् एका करंजीकराने इंदूरचे संस्थान चालविले हा अभिमानही उराशी बाळगतात. अशा खुसखुशीत इतिहासाने करंजी अधिक खुसखुशीत झालेली दिसते.

 

लेखक : रमेश पडवळ

 

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate