অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रत्नागिरी जिल्ह्याचे वैभव ‘गुहागर’

रत्नागिरी जिल्ह्याचे वैभव ‘गुहागर’

महाराष्ट्रातील जवळजवळ सगळेच समुद्रकिनारे हे सुंदर, शांत, स्वच्छ आणि निसर्ग रमणीय आहेत. गुहागरचा समुद्रकिनारा सुद्धा याला अपवाद नाही. खरंतर गुहागर म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याचे वैभवच म्हणावे लागेल. वासिष्ठी आणि जयगड खाड्यांच्यामध्ये वसलेले गुहागर हे अत्यंत टुमदार असे छोटेसे गाव असून त्याला लाभलेला सुंदर निसर्गरम्य किनारा आणि पांढरीशुभ्र पुळण हे इथे वारंवार यावेसे वाटणारे आकर्षण नक्कीच आहे.

मुंबईपासून 280 कि.मी. असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरला सुरुचे बन असलेला अत्यंत सलग आणि सुरेख असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्याचबरोबर श्री व्याडेश्वर आणि श्री दुर्गादेवीची नितांत रमणीय मंदिरे या परिसराची शोभा अजूनच वाढवतात. इथे मिळणारे अगदी खास कोकणी पद्धतीचे पदार्थ पर्यटकांना या प्रदेशाची भुरळ पाडतात. समुद्रकिनाऱ्याला समांतर जाणारा एकमेव रस्ता या गावाला लाभलेला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या घरांची अंगणे विविध रांगोळ्यांनी सजवलेली असतात. व्याडेश्वराचे पुरातन मंदिर गावाच्या अगदी मधोमध वसले असून त्यामुळे गावचे भौगोलिकदृष्ट्या दोन भाग पडतात. एक म्हणजे खालचा पाट आणि दुसरा वरचा पाट.

गुहागर हे आंबा, फणस, काजू, सुपारी आणि नारळ या फळांसाठी सुप्रसिद्ध आहे. गुहागरच्या उत्तरेकडे असलेल्या अंजनवेल या गावाशी दाभोळ हे गाव फेरी बोटीने जोडले गेल्यामुळे गुहागरचे महत्त्व अजून वाढलेले दिसते. तसेच दक्षिण दिशेला हेदवीवरून जयगड हे गावसुद्धा फेरी बोटीने जोडल्यामुळे गुहागर हे रत्नागिरी तालुक्याशी जोडले गेलेले आहे. गुहागरला आल्यावर समुद्रात होणारा सूर्यास्त पाहणे यासारखी दुसरी रमणीय गोष्ट नाही. हा नयनरम्य सूर्यास्त पाहणे सुखकर व्हावे म्हणून स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना बसण्यासाठी उत्तम सोय किनाऱ्यावर केलेली आहे.

गुहागरचा पेशवे घराण्याशी फार पूर्वीपासून संबंध आलेला आहे. थोरले माधवराव पेशव्यांचे काका राघोबादादा यांची पत्नी आनंदीबाईचे माहेर या गुहागरचेच. इथून १५ कि.मी. वर असलेल्या कोतुळक या गावी असलेल्या ओक घराण्यात आनंदीबाईचा जन्म झाला होता.

दगडी बांधणीचे व्याडेश्वर हे शिवमंदिर गुहागरचे ग्रामदैवत होय. अनेक चित्पावन ब्राह्मण कुटुंबियांचे हे कुलदैवत आहे. त्याचप्रमाणे नुकताच जीर्णोद्धार झालेले दुर्गादेवीचे मंदिरसुद्धा अत्यंत रमणीय ठिकाणी वसलेले आहे. गुहागरमध्ये अजून एक प्राचीन मंदिर असून ते उफराटा गणपतीचे आहे. इथे गणपतीचे तोंड पश्चिम दिशेला केलेले आढळते.

कसे जावे : गुहागर हे रत्नागिरी, पुणे आणि मुंबईशी रस्त्याने जोडले गेलेले असल्याने राज्य परिवहन मंडळाच्या बसेसने गुहागरला जाता येते. तसेच कोकण रेल्वेवरील चिपळूण या रेल्वे स्थानकावर उतरुन परिवहनच्या किंवा खाजगी बसेसनी गुहागरला जाता येते.

 

 

संकलन - विलास सागवेकर, उपसंपादक

माहिती स्रोत: महान्यूज

 

अंतिम सुधारित : 7/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate