অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

परशुरामची भूमी : गुहागर

गुहागर हे रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाचे तालुक्याचे शहर आहे. गुहागरला मुख्य रस्त्याच्या बाजूला व्याडेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. (वाड्यांचा देव तो व्याडेश्वर) या गावातील बहुसंख्येने असलेल्या वाड्यांचा देव म्हणून हे दैवत प्रसिद्ध होते. परशुरामची भूमी म्हणून गुहागरची ओळख आहे. जाणून घेऊया गुहागर तालुक्यातील प्रेक्षणीय स्थळे...दापोलीहून दाभोळखाडीमार्गे गुहागरला जाता येते. मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणच्या अलिकडे परशुराम घाट उतरल्यावर गुहागरकडे जाणारा मार्ग आहे.

महामार्गापासून गुहागर 45 किलोमीटर अंतरावर आहे. हा परिसर नारळ-पोफळीच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. गुहागरला यायचं ते दोन दिवस हाती राखूनच. त्याशिवाय इथल्या भटकंतीचा आनंद लुटता येत नाही. या परिसरात वड-पिंपळाचे विशाल वृक्ष पाहायला मिळतात.

गुहागर शहरात निवास-न्याहारी योजनेअंतर्गत अनेक ठिकाणी घरगुती निवास व्यवस्था उपलब्ध आहे. समुद्र किनारी अनेक रिसॉर्टदेखील आहेत. गुहागर तालुक्याच्या भटकंती करताना धार्मिक पर्यटनाचा आनंदही मिळतो. निसर्गरम्य परिसरात उभी असलेली अनेक देवस्थाने तालुक्यात आहेत. खाडीच्या भागात मासोळी बाजारालाही भेट देता येते.

मुंबई ते गुहागर 270 किलोमीटर अंतर आहे. तर पुणे-गुहागर 244 किलोमीटर अंतर आहे.गुहागर तालुक्यातील महत्वाची प्रेक्षणीय स्थळे...गोपाळगडगुहागरपासून 18 किलोमीटर अंतरावर गोपाळगड आहे. रत्नागिरी ऊर्जा प्रकल्पापासून अंजनवेल सहा किलोमीटर अंतरावर आहे. गावापासून गड दोन किलोमीटर अंतरावर आहे. अजूनही या गडाची तटबंदी मजबूत आहे. सात एकर परिसरात किल्ला पसरला आहे. वेलदूर येथून बोटीने जाऊनही किल्ला बघता येतो.

किल्ल्यापासून एक किलोमीटर अंतरावर अंजनवेलचे दिपगृहदेखील आहे. दुर्गादेवी मंदिर:वेलदूरच्या बाजूने गुहागरमध्ये प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस दुर्गादेवीचे प्राचीन मंदिर आहे. चिपळूणमार्गे आल्यास मुख्य रस्त्याच्या उजव्या बाजूस यावे लागते. मंदिर तेराव्या शतकातील असल्याची माहिती उपलब्ध आहे. मुळ हेमाडपंथी रचना असलेल्या या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याने त्याच्या सौंदर्यात भर पडली आहे.

मंदिरात येण्यापूर्वी बाजूला असलेल्या तळ्यातील विविधरंगी कमळाचे सौंदर्य कॅमेऱ्यात टिपण्याचा आनंद घेता येतो. मंदिराच्या गाभाऱ्यातील आदिमातेचे रुप नजरेत भरण्यासारखे आहे. गाभाऱ्यासमोरील भव्य सभामंडपातील शांतता आणि परिसरातील निसर्ग यामुळे काही क्षण इथे बसून थकवा घालविता येतो. बाजूलाच असलेल्या प्रसादालयात भाविकांसाठी चहा-नास्ता आणि जेवणाची सोय माफक दरात केली जाते. मंदिर परिसरात भक्तनिवासाची सोय आहे. (भक्तनिवासासाठी संपर्क-02359-240665)

उफरटा गणपती

दुर्गादेवीचे दर्शन घेतल्यानंतर समुद्र किनाऱ्याकडे जाताना रस्त्याच्या डावीकडील गणेशाचे सुंदर मंदिर आपले लक्ष वेधून घेते. मंदिरातील श्रीगणेशाची मुर्तीही तेवढीच सुंदर आहे. 300 वर्षांपूर्वी समुद्राचे पाणी वाढल्यावर गुहागर बुडुन जाईल, अशी भीती गावकऱ्यांना वाटल्याने त्यांनी पूर्वेकडील गणपतीचे तोंड पश्चिमेकडे फिरविले. तेव्हापासून यास 'उफरटा गणपती' म्हणून ओळखले जाऊ लागले. पांढऱ्याशुभ्र मुर्तीच्या हातातील परशु व त्रिशुळ शोभून दिसतो. निवांतपणे काही क्षण घालविण्याजोगा मंदिराचा परिसर आहे. गुहागरचा समुद्र किनारा: सूर्य थोडा डोक्यावर आल्यावर समुद्र स्नानाची मजा लुटता येते. मात्र समुद्रात जाताना गावकऱ्यांकडून माहिती घेऊन गेलेले केव्हाही बरे.

शुभ्र-रुपेरी वाळूचा तेवढाच स्वच्छ समुद्र किनारा पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. 5 किलोमीटरचा लांबीचा किनारा नारळी-पोफळी आणि सुरुच्या दाट झाडांनी सुशोभित आहे. वाळूवर फिरणारे सागरी जिवांचे निरीक्षण करताना मजा वाटते. किनाऱ्यावर उभे राहून समोर सह्याद्रीच्या रांगावर पसरलेल्या हिरव्या शालूचे सौंदर्यदेखील न्याहाळता येते.

समुद्र सफरीचा आनंद लुटल्यावर पोटातील भूक शमविण्यासाठी सोलकढी, उकडलेले मोदक, माशांचे विविध प्रकार, नारळाची आमटी, तांदळाची भाकरी अशा लज्जतदार कोकणी पदार्थांनी भरलेले ताट तयार असते. किनाऱ्याजवळच चांगली हॉटेल्स आणि घरगुती खानावळी आहेत.

श्री व्याडेश्वर

गुहागरला मुख्य रस्त्याच्या बाजूला व्याडेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. (वाड्यांचा देव तो व्याडेश्वर) या गावातील बहुसंख्येने असलेल्या वाड्यांचा देव म्हणून हे दैवत प्रसिद्ध होते.

परशुरामची भूमी म्हणून गुहागरची ओळख आहे. त्यांचे शिष्य असलेल्या व्याडमुनींनी याठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली. या स्थानाला 'व्याडेश्वर' संबोधले जाते, अशीही त्यामागची कथा आहे. मुख्य गाभाऱ्यात शिवलिंग असून समोरील भव्य सभामंडपात तेवढेच भव्य आकाराचे नंदीचे शिल्प आहे. मंदिराच्या चार कोपऱ्यात गणपती, दुर्गादेवी, लक्ष्मीनारायण आणि सुर्यनारायणाची सुंदर मंदिरे आहेत. मंदिर परिसरात पर्यटकांसाठी भक्तनिवासाची सुविधा आहे.(संपर्क-9421140506) आनंदीबाई पेशव्याचे

गाव-मळण

गुहागर परिसरात वृक्षराजींची श्रीमंती पाहायला मिळते. वटवृक्षांच्या रचनेतील सौंदर्य अनेक कलाकारांचा आकर्षणाचा विषय असतो. परिसरात भटकंती करताना आनंदीबाई पेशव्यांचे मुळ गाव असलेल्या मळण गावातील त्यांच्या वाड्याचा चौथरा आणि त्याकाळचे तळे पाहता येते. मळणला जाण्यासाठी शृंगारतळीहून मार्ग आहे. गुहागर ते मळण 15 किलोमीटर अंतर आहे.

वेळणेश्वर समुद्र किनारा

गुहागर येथून मोडका आगरमार्गे साधारण 20 किलोमीटर अंतरावर हा वेळणेश्वरचा निसर्गरम्य समुद्रकिनारा आहे. चंद्राच्या कोरीप्रमाणे असलेल्या या किनाऱ्यावर नारळाच्या वृक्षांचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे. किनाऱ्यावर वेळणेश्वराचे सुंदर देऊळ आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे येथे निवास व्यवस्था करण्यात आली आहे. उंचावर असलेल्या या ठिकाणाहून समुद्राचे विलोभनीय दृष्य पाहायला मिळते.

(एमटीडीसी वेळणेश्वर-02359-243282, कोकणी हट्स 10 नॉन एसी 5 एसी)

हेदवी

पेशवे काळातील हेदवी येथील गणपती मंदिर वेळणेश्वरापासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. श्रीगणेश मंदिराच्या निसर्गरम्य परिसरात गेल्यावर आल्हाददायक अनुभव येतो. मंदिर परिसरात सुंदर उद्यान निर्माण करण्यात आल्याने परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे. मंदिरातील मुर्ती 'श्री दशभुजा लक्ष्मीगणेश' नावाने ओळखली जाते. या ठिकाणी भक्त निवासाची सुविधादेखील करण्यात आली आहे.

बामणघळ

हेदवी येथील गणपती मंदिराच्या अलिकडे तीन किलोमीटर अंतरावर उजव्या बाजूस जाणारा उतार लागतो. या रस्त्याने गेल्यास बामणघळला निसर्गाचा सुंदर अविष्कार पाहता येतो. याठिकाणी समुद्र किनारा काळ्या कातळांनी व्यापलेला आहे. या काळ्या खडकांशी चाललेला फेसाळणाऱ्या लाटांचा खेळ पाहण्यासारखा असतो. थोडे अंतर चढून गेल्यावर एका ठिकाणी दहा ते पंधरा फुट उंचीची अरुंद नाळ आहे. या फटीतून भरतीच्या लाटेचे पाणी शिरून ते खडकावर आदळताना उंच जलस्तंभ तयार होतो. उडणाऱ्या तुषाराचे सुर्य प्रकाशातील सौंदर्य डोळ्यात साठविण्यासारखे असते. किनाऱ्यावर उमा महेश्वराचे मंदिर आहे. डोंगरावरून येणारी गोड्या पाण्याची धार मंदिरात असलेल्या कुंडात पडते. याच परिसरात उमराठ आणि नरवण येथील निसर्गरम्य परिसरात असलेल्या मंदिरांनाही भेट देता येते.

रोहिला

हेदवीपासनू सात किलोमीटर अंतरावर रोहिल्याच्या खाडीचा पूल लागतो. या पुलावरून डावीकडे सुंदर वाळूची पुळण आणि त्यापलिकडे सुरुबन आहे. उजवीकडे नारळाची झाडे दाटीवाटीने उभी आहेत. समोर विस्तारलेल्या खाडीपलिकडे डोंगरावर उभा असलेला जेएसडब्ल्यु प्रकल्प दिसतो. कॅमेऱ्यात साठविण्यासारखा परिसर असल्याने काही क्षण येथे घालविण्याचा मोह आवरत नाही.

तवसाळ

हेदवीपासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या तवसाळ गावात विजयगडची प्राचीन गढी आहे. या गढीचे अवशेष खाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला पाहता येतात. गावाला लागून जयगडची खाडी आहे. या खाडीतून सुर्यास्ताचे सौंदर्य अनुभवता येते. खाडीतून जयगड बंदरही दृष्टीपथास पडते. फेरीबोटीतून वाहनासह जयगडला जाता येते. जयगडहून गणपतीपुळेमार्गे रत्नागिरीला जाण्यासाठी मार्ग आहे.

 

माहिती स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate