অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मोहात पाडणारी मोहाडी !

वेशीवरच्या पाऊलखुणा : मोहात पाडणारी मोहाडी !

मोह वाईटच पण गावपण जपणारी जुनी घरे, तीनशे वर्षांहून अधिक काळापूर्वीचे मंदिर, अहिल्याबाईंनी गावाला बारव रूपाने दिलेला जपलेला वारसा, बोहाड्यासारखी अनोखी लोककला काळाच्या ओघातही टिकविण्याची इच्छाशक्ती अन्‌ अष्टबाहू गोपालकृष्णांच्या लिला हे मोहाडी गावाचे वेगळेपण अधोरेखित करते. गावावर कोणतेही संकट येऊ नये म्हणून मोहाडकर बाबा सज्ज असल्याची अनोखी अख्यायिका अन्‌ गावाला खेटून सज्ज झालेले अत्याधुनिक ओझर विमानतळ यामुळे मोहाडी हे टुमदार गाव येथे येणाऱ्या प्रत्येकाला मोहात पाडते.

पोचण्याचा मार्ग

मुंबई-आग्रा हायवेवरून नाशिकच्या ओझर विमानतळाकडे गेल्यास तेथून दोन किलोमीटरवर मोहाडी हे टुमदार गाव वसले आहे.

गावात प्रवेश करताना मोरीच्या समोर एकनाथ भाऊ जाधव यांच्या नावाने उभारलेली कमान आपले स्वागत करते. एकनाथ भाऊ जाधव हे गावाच्या सांस्कृत‌िक, शैक्षणिक आणि सामाजिक कार्यातील मोठी व्यक्ती. त्यांच्या कार्याची माहिती ग्रामस्थ आवर्जून देतात.

मोहाडीचा इतिहास

मोहाडी गाव तसे पुरातन आहे. अकराव्या शतकात मोहमल्ली म्हणून हे गाव वसले असे म्हटले जाते. याचा उल्लेख गोदानदी या पुस्तकात मिळतो. गावाला मोहाडी नाव कसे पडले याच्याही अनेक अख्यायिका सांगितल्या जातात. गाव परिसरात मोहाची खूप झाडे असल्याने गावाला मोहाडी असे नाव पडले असावे, तर अकराशेच्या सुमारास गावात मोहाड नावाचा मल्ल होता. हा मल्ल पेंढाऱ्यांपासून (लुटारूंपासून) ग्रामस्थांचे रक्षण करी म्हणून मोहाडमल्लाचे गाव म्हणूनही गावाला मोहाडी म्हणत असावे, अशीही अख्यायिका ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे गावात मोहाडमल्ल बाबांचे मं‌दिर असून हे ग्रामदेवत मानले जाते. मोहाडमल्ल बाबांमुळे गावावर आतापर्यंत कधीही संकट आले नाही, असे ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे दुसऱ्या अख्यायिका गावाच्या नावाबाबत खरी असावी असे वाटते. तर मोहाडमल्ल बाबांच्या मंदिरात त्यांची मुखवटा असलेली प्रतिमा असून या मूर्ती खाली एक शिळा आहे. ही शिळा दर बारावर्षांत मोठी होऊन पुन्हा लहान होते, असे भास्कर वामनराव जाधव सांगतात. मोहाडमल्ल बाबांचे मंदिर दोन मजली आहे. वरच्या मजल्यावर शाळा भरते. यामुळे हा परिसर ज्ञान अन् भक्ती गंगेत न्हाऊन निघालेला असतो. तेथून पुढेच मोहेश्वर महादेव मंदिर आहे. जुने मंदिर पडल्याने नवीन मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. मंदिराच्या शेजारीच अहिल्याबाईंनी बांधलेली मोठी बारव आहे. विशेष म्हणजे अहिल्याबाईंचा हा वारसा मोहाडीकरांनी आवर्जून जपला आहे. बारवाला अजूनही पाणी असून त्यांचा उपयोग केला जातो. या बारवेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही बारव दोन्ही बाजूंनी पायऱ्या असलेली आहे. अहिल्याबाईंनी बांधलेल्या अनेक बारव या एकाच बाजूने पायऱ्या असलेल्या आहेत. त्यामुळे या बारवेचे महत्त्व वाढते.

मोहेश्वर महादेव मंदिरापासून पुढे नागपंथीय गोसावीच्या लहान मोठ्या समाध्या आहेत. येथे दोन हेमाडपंथी बांधणीच्या मोठ्या समाध्या आणि एक शिलालेखही आहे. मात्र त्याचे वाचन झालेले नाही. या मंदिरांवरील कोरीव काम पाहण्यासारखे आहे. हा परिसर बकाल असून त्याची स्वच्छता केल्यास या वास्तू पाहण्यासाठी येणाऱ्यांची संख्या नक्की वाढेल.

अष्टबाहू गोपालकृष्ण मंदिर

मोहाडीचे मुख्य दैवत म्हणजे अष्टबाहू गोपालकृष्ण मंदिर. हे मंदिर पुरातन आहे. मोहाडी आधी वसली की हे मंदिर आधीपासून आहे हा मोहाडीकरांचा शोध पूर्ण झालेला नाही. मात्र मोहाडमल्लांनी मोहाडी वसवल्यानंतर व्यापारी व मूर्तीकार या गावात रात्री सुरक्ष‌ितता मिळेल म्हणून येऊ लागली असतील त्यामुळे मोहाडीचा विकास झाला असेल असे दिसते. याच काळात केव्हातरी एक मूर्तीकार कन्याकुमारीहून उज्जैनला जाण्यासाठी एका रात्री मोहाडीत थांबला होता. तेव्हा जम‌िनीवर ठेवलेली अष्टबाहू गोपालकृष्णाची मूर्ती सकाळी त्या मूर्तीकारांना उचलता येईना. मूर्तीकारांनी कुऱ्हाडीचा प्रहार करून मूर्ती हलविण्याचा प्रयत्न केला पण मूर्ती काही हलली नाही. तेव्हा मूर्तीकार ही मूर्ती गावातच सोडून गेले. आजही कुऱ्हाडीचा प्रहार मूर्तीच्या मागील बाजूस पहायला मिळतो, अशी माहिती मंदिराचे पुजारी दत्तात्रेय जोशी देतात. तेव्हापासून ही शाळीग्राम पाषाणातील अष्टबाहू गोपालकृष्ण मूर्ती मोहाडीचे मुख्य आकर्षण झाले. गोपालकृष्ण मूर्ती इतकी आकर्षक आहे की मूर्तीकडे पाहणारा भक्त मोहात पडतो. कृष्णाने एका हाताच्या करंगळीने गोवर्धन पर्वत उचलला आहे, दोन हाता मंत्रमुग्ध करणारी मुरली, इतर हातांमध्ये चक्र, गदा, शंखमाला, मोशृंग इत्यादी आयुधे आहेत. कमरेस लंगोट त्यावर घागऱ्यास दागीनापट्टा आहे. कृष्णाच्या अंगाभोवती असणाऱ्या कालियाचा विळखा अन् तो कृष्णाच्या कानाला दंश करतो आहे. चरणकमलाजवळ दोन गोपी असून, त्यापैकी एक मृदुंग वाजवीत आहे. तर दुसरी सनई वादन करीत आहे. शेजारी दोन सवत्स गाई गरूड पक्षासह उभ्या आहेत. हे अष्टबाहू कृष्णाचे रूप भारतात इतरत्र कोठेही पहायला मिळत नाही. उज्जैनला याच अज्ञात मूर्तीकाराने बनवलेली अशीच मूर्ती आहे मात्र ती चारबाहूंची आहे. त्यामुळे मोहाडीतील या दुर्मिळ कृष्णमूर्तीचे वैभव गावाला वेगळेपण मिळवून देते. गोपालकृष्ण मंदिराची तीन मजली इमारत काष्टशैलीचा उत्तम नमुना असून पाच खण रूंद व सात खण लांब असे हे मंदिर आहे. साधारण सत्तर वर्षांपूर्वी मोहाडीकरांनी लोकवर्गणीतून मंदिराचा जीर्णोद्धार केला. श्रीमंत पेशवे या मंदिराला वार्षिक १४४ रूपये दिवाबत्तीसाठी देत, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. मोहाडीतील कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव पाहण्यासारखा असतो. याच जन्माष्टमीत अनेक वर्षांपासून होत असलेली मोहाडीची श्रीकृष्ण व्याख्यानमाला ही एक आकर्षण असते. अनेक साहित्यिकाने ही व्याख्यानमाला गाजवल्या आहेत, अशी माहिती प्रवीणनाना जाधव यांनी दिली.

सोमवंशी वाडा

गोपालकृष्ण मंदिरापासून जवळच सोमवंशी यांचा वाडा आहे. पेशवाईकाळात उभा राहिलेला वाडा आता देह ठेवत आहे. मात्र आवर्जून पहावा असा हा वाडा अजूनही आपल्या वैभवाची साक्ष देतो. वाड्याचे प्रवेशद्वार अजूनही उभे असून त्याची भव्यता मोहात पाडते. हा वाडा चांदवडच्या रंगमाला इतका सुंदर होता, असे सोमवंशी यांचे वंशज शहाजी सोमवंशी सांगतात. तीन मजली सोमवंशी वाड्याच्या वैभवाच्या आठवणी सांगतात ते हरखून जातात. मात्र सोमवंशी घराण्याचा इतिहास संकलीत न केल्याने तो विस्मरणात गेला आहे.

गावात इतरही लहान मोठी जुनी घरे व वाडे पहायला मिळतात. मात्र तेही देह ठेवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई शिंदखेडच्या जाधव घराण्याच्या होत्या. त्यांचे वंशज जाधव मंडळी मोहाडीत येऊन वसले. त्यामुळे मोहाडी गावात जाधव आडनावांची कुटुंबे सर्वाधिक आहेत. त्यामुळे मोहाडीत जिजाबाईंचा जयंती उत्सव जल्लोषात साजरा केला जातो. सोमवंशी वाड्यासमोरून शिंपी गल्लीत जाता येते. शिंपी गल्ली म्हणजे मोहाडीची मुख्य बाजारपेठ. शिंपीगल्लीच्या रचनेवरून व तेथील इमारतीवरून मोहाडीची श्रीमंती लक्षात येते. गल्लीतील लक्ष्मीनारायण मंदिरही पाहण्यासारखे आहे. याचे कामही लाकडात करण्यात आले आहे. मोहाडीवर मोहाड बाबांमुळे व गोपालकृष्णामुळे कधीही संकट आलेले नाही मात्र चांगला पाऊस व्हावा शेती चांगली व्हावी म्हणून गावकरी पावसापूर्वी बोहाड्यांचा उत्सव करतात. उत्सव सात किंवा पाच दिवस चालतो. मोहाडीतील बोहाड्याचे खेळ अजूनही डोळ्यांचे पारणे फेडतात. अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण पैलूंमुळे मोहाडी मोहात पाडते अन् आमचे गाव पहायला या असे आमंत्रणही देते.

लेखक : रमेश पडवळ

rameshpadwal@gmail.com

contact no : 8380098107

अंतिम सुधारित : 9/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate