অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वडांगळी

वेशीवरच्या पाऊलखुणा : वडांगळी

लोकपरंपरांनी नटलेली वडांगळी

अनेक गावं आपल्याच धुंदीत रंगून गेलेली असतात. इतरांना ती जरा वेगळी, खुळी का वाटेनात पण, त्यांच्यातला वेगळेपणाच त्या गावाची शक्तीस्थळे असतात. म्हणूनच तेथील प्रथा, परंपरा, अख्यायिका,गावातील मंदिरांचा साज अन् ऐतिहासिक गोडवा जगाला भावतो. गावाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, पुरातन वास्तूंचा ठेवा, लोकगीतं, नाट्यपरंपरा,अध्यात्म‌िक वारसा सांभाळणारे दूत व ग्रामदैवतांना मनामनात जागविणारं सिन्नर तालुक्यातील वडांगळी हे गाव पाहिले की,लोकपरंपरांच्या वृक्षाला मोहर आल्याचा अनुभव येतो. वडांगळीकरांचे जगणेच एक उत्सव असल्याचे पहायला मिळते.

देवपूरमधील राणेखानाचा इतिहास अन् भागवत बाबांच्या अलौकिक कार्यामुळे देवपूरचा प्रवास वेगळा ठरतो. देवपूर अनुभवून पुढे पाच किलोमीटरवर असलेलं वडांगळी गाव आपल्याला प्रथा, परंपरा अन् अख्यायिकांच्या जगात घेऊन जातं. वडांगळी हे गाव सिन्नरपासून पूर्वेकडे २२ किलोमीटरवर देवनदीच्या काठावर वसलेले आहे. नाशिकमधील अनेक गावांची नावे कानडी नावाशी साधर्म्य दाखवितात, तसेच वडांगळीचेही आहे. कानडीतील वडांगळी म्हणजे वड अंगुली. गावातील पुरातन वडामुळे या गावाला वडांगळी नाव पडले असावे. हे वटवृक्ष आता नाही; मात्र या वृक्षाचा वंश ग्रामस्थांनी पुन्हा पुनर्जिवीत करून जपला आहे. वडवळ्ळी नावाचे सुब्रह्मण्य क्षेत्र तामिळनाडूत आहे, तर यादवांच्या भिल्लम राजाच्या वडंग नावावरून वडांगळी असे नाव गावाला पडले असावे, असेही सांगितले जाते. त्यामुळे वडांगळीबाबतचे गूढ अधिक गह‌िरे होते. मात्र गावात कानडी समाज असल्याने व गुरू गंगाधर शिवाचार्य महाराजांचा मठ असल्याने कानडीशी असलेल्या ऋणानुबंधांचा दुजोरा मिळतो. आंध्र प्रदेशातील श्री शैलम मठांच्या पाच महत्त्वाच्या मठांपैकी वडांगळीतील मठ एक आहे. त्यामुळे गावाचे महत्त्वही अधोरेखित होते, असे लोकपरंपरांचे अभ्यासक किरण भावसार सांगतात.

देवपूरकडून वडांगळीत जाताना देवनदीवरचा पूल ओलांडला की, आपण वडांगळीत एका उंचवट्यावर दाखल होतो. हा उंचवटा म्हणजे वेस. गावाच्या वेशी आता नाहीत. मात्र खालची वेस वरची वेस,असे आजही म्हटले जाते. गाव बाजारपेठेचे ठिकाण असल्याने नेहमी गजबजलेले दिसते. गावात प्रवेश करताना आजूबाजूला दिसणाऱ्या अनेक मंदिरांचा साज मनप्रसन्न करतो. पूर्वी गाव वडजाई मंदिरालगत वसलेले होते. तेथे अजूनही पांढरी टेकाडे जुन्या गावच्या पाऊलखुणा दाखवितात. वडजाई मंदिर उभारले जाते अन् पुन्हा पाडले जाते. यामागे एक रोचक अख्यायिका आहे. रात्रीतून हे मंदिर उभारणाऱ्या व्यक्तीला मंदिराखालील सात कढया भरलेले सोने मिळेल. मात्र अट अशी आहे की, यासाठी लागणारे पाणी हे तामसवाडीलगत गोदावरीतून बैलगाडीतून त्याच रात्री आणले गेले पाहिजे. सात कढया सोन्यासाठी आतापर्यंत अनेकदा हे मंदिर पाडण्यात आले अन्‌ रात्रीत उभे करण्याचा प्रयत्न झाला; मात्र ते कधीही पूर्ण होऊ शकले नाही. एकदा मंदिर उभारल्यावर मंदिराखाली असलेले सोने कसे मिळेल, ही एक गंमतच आहे. पण, ही अख्यायिका गावात भक्तीभावाने सांगितली जाते. तशीच अख्यायिका मोहमाई मंदिराची असून, मोहमाईला बळी देण्याची पूर्वी प्रथा होती, असेही रणजित खुळे व दीपक खुळे सांगतात.

अहिल्याबाईंची गढी

देवनदीलगत अहिल्याबाईंची गढी म्हणून ओळखली जाणारी पुरातन वास्तू आहे. या गढीचे आता फक्त काही अवशेष उरले आहेत. ही गढी त्यावेळी बांधल्यानंतर मूळ गाव येथे येऊन गढीभोवती वसले असावे. गढीत राहणारी होळकर घराण्यातील एक राणी महानुभाव पंथीय होती. त्यामुळे इंदूरमध्ये होळकरांनी महानुभावाचे मंदिर बांधल्याचे दिसते. मात्र हा इतिहास अज्ञात, अस्पष्ट अन्‌ विखुरलेला आहे. ती राणी कोण, ही गढी कोणी बांधली, असे अनेक प्रश्न सतावतात. ग्रामस्थ सांगतात की, दुसरे तुकोजीराव होळकर करंजीतून (ता. निफाड) होळकर घराण्यात दत्तक गेले. त्यांचा वडांगळीशी संबंध असल्याने देवपूर व वडांगळीतील लोक त्यांच्याबरोबर इंदूरला गेले अन्‌ इंदूरकर झाले. त्यामुळे या गावातील अनेकांचे नातेसंबंध इंदूरला आहेत. गावचा अज्ञात इतिहास गढीबरोबरच गावातील लहान मोठे वाडे व हवेल्याही सांगताना दिसतात. गावापासून साधारण दोन किलोमीटर अंतरावर असलेला अहिल्याबाईंच्या बारवेचा वारसा वडांगळीकरांनी लेकूरवाळीसारखा जपल्याचे पाहून समाधान वाटते. गावातील बाजार चौकात आल्यावर डाव्या हाताला शनीचिंचेकडे जाणारा रस्त्याला असलेली खुळ्यांची हवेली व मठ पाहण्यासारखा आहे. तसेच गावातील खालचा वाडा, वरचा वाडा,शिंप्याची हवेली देखील पाहण्यासारखी आहे. खुळ्यांच्या हवेलीचे वैभव वाडा संस्कृतीची आठवण करून देते. वडांगळीत बहुसंख्य लोक खुळे आडनावाची आहेत. त्यामुळे वडांगळीला खुळ्यांचं गाव अशीच ओळख आहे. खुळ्यांच्या हवेलीसमोरच गुरू गंगाधर शिवाचार्य महाराजांच्या मठाची वाडावजा इमारत व मठातील पंचधातूचा पंचमुखी मुखवटा, चाके असलेले लाकडी कासव पाहण्यासारखे आहेत. गावात मारूती मंदिर, शनी चौकात सुरेख नक्षीकामाचे कळस असलेली दोन मंदिरं आहेत. एक दत्ताचं, अन्‌ दुसरं शनीचं. शनीखालची चिंच म्हणून ओळखला जाणारा हा परिसर लोककथांचा गाभा मानला जातो. गावात कालिका, अश्‍वारूढ खंडोबा आदी लोकदैवतांची अनेक मंदिरे गावात आहेत. गावात फार पूर्वी मरण पावलेल्या एका वानराची समाधी आणि मूर्तीही आहे. याचीही अख्यायिका सांगितली जाते. मात्र लक्ष वेधून घेते ते गावाच्या पश्चिमेला सायखेडा रस्त्यालगत असलेले सतीदेवी-सामंतदादाचे मंदिर.

सतीदेवीची यात्रा

माघ पौर्णिमेला (फेब्रुवारीत) होणारी वडांगळीची सतीदेवीची यात्रा देशभरात प्रसिद्ध आहे. सतीदेवी सामतदादा हे बंजारा समाजाचे आराध्यदैवत. बंजारा समाज यात्रेला राज्यातील विविध भागातून तसेच परराज्यातून एकत्र येतो, असे अशोक चव्हाण सांगतात. बंजारा समाजातील अनेक प्रथा, परंपरा,लोकगीतांचा अनुभव वडांगळीकरांना या दरम्यान घेता येतो. बोकडबळी आणि त्या विरोधात होणारी आंदोलने यामुळे ती यात्रा दरवर्षी गाजते. वडांगळीकरही उत्साहाने या यात्रेत सहभागी होत पुरण पोळीचा नैवेद्य करतात. बंजारा समाजात यात्रा काळात देवीला जुने निशाण (झेंडा) वाहून नवे निशाण घरी घेऊन जाण्याची प्रथा आहे. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना त्यांनी सतीदेवीच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती. तेव्हापासून हे धार्मिक स्थळ प्रकाशात आले. सामतदादा हा बंजारा तांड्याचा नायक. त्याच्या मृत्यूनंतर त्याची ब्राह्मण पत्नी लिंबू झेलत तांड्यासोबत निघाली. ज्या ठिकाणी लिंबू जमिनीवर पडेल तेथे सती जाण्याचा तिचा निश्चय होता. लिंबू वडांगळी गावात पडला. त्या ठिकाणी सामतदादासोबत त्यांच्या बंजारा व ब्राह्मण अशा दोन्ही पत्नी सती गेल्या, अशी अख्यायिका ग्रामस्थ सांगतात. गावात सतीदेवी समोर बंजारा वेशभूषेतील अश्वारूढ सामंतदादाचे छोटे मंदिर आहे. सामतदादा नावाचा गाडीवान सतीदेवी भक्त होता. त्याने सतीदेवीबरोबरच स्वत:ची पत्नी जसमा हिच्यासह वडांगळीत प्राणत्याग केल्याची आणखी एक आख्यायिका ग्रामस्थ सांगतात. सतीदेवी मंदिरामागे सैंदर नावाचे दुर्मिळ वृक्ष आहे. मंदिर परिसरात वीरगळीही आहेत. वडांगळीतील प्रभाकर व शंकरराव म्हाळणकर यांनी सतीदेवीची कथा ओवीबद्ध करून हा मौखिक वारसा पुढे नेण्यासाठी शब्दबद्ध केला आहे. असा एक वारसा म्हणजे संत बाळाबुवा कबाडी यांची १९१२ मध्ये प्रकाशीत झालेली अंभगगाथा. तीही जपण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी केला आहे. तर इंग्रजांनी गावात १८६५ साली तीन खोल्यांमधून शाळा सुरू केली होती. ती दगडी शाळा अजूनही ग्रामस्थांनी जपली आहे.

शिमगा

वडांगळी गावचा शिमगा जावयाच्या धिंडीसाठी प्रसिद्ध आहे. शिमग्याच्या दिवशी वडांगळी गावात वीरांची मिरवणूक असते. होळीतील राखेने धुळवड खेळली जाते. मात्र खऱ्या अर्थाने शिमगा रंगतो तो जावयांच्या धिंडीने! वडांगळीचा हा सोहळा म्हणजे प्रथा परंपरेचा एक अजब पैलू आहे. लग्नात घोड्यावरून मिरवले गेलेल्या जावयाला गावात गाढवावरूनही तेवढ्या मानपानाने मिरव‌िले जाते. गावभर धिंड काढण्यापूर्वी जावयाच्या गळ्यात कांद्यांचा, खेटरांचा हार, लसणाच्या मुंडावळ्या आणि फाटक्‍या सुपाचे बाशिंग बांधले जाते. त्यांचे कपडेही फाडले जातात. धिंड गाढवावरची असली तरी प्रत्यक्षात गाढवीणीचा वापर होतो. हा सोहळा अनुभवण्यासाठी गाव लोटलेलं असतं. ही वेगळी परंपरा कधी अन्‌ कशी सुरू झाली यापेक्षाही लोकसंस्कृतीचे ऋणानुबंध घरातील नातेगोते फक्त घरापुरते नसतात तर गावही त्या ऋणानुबंधात गुंफले गेलेले असते हेच ही प्रथा दाखविते,असे वाटायला लागते. जावयाची धिंड काढली म्हणजे दुष्काळाचे सावट दूर होऊन पाऊसपाणी चांगला होतो, अशी गावकऱ्यांची समजूत आहे. त्यामुळे जावईही त्यांच्या प्रथेला साथ देतो अन् वडांगळीच्या रंगात रंगून जातो.

वडांगळीचा शिमगा फक्त रंगाने रंगत नाही तर लाकडी टिपर्‍यांच्या तालावर अन्‌ डफाच्या ठेक्यावर गायीला जाणाऱ्या‘टिप्‍परघाई’ नावाच्या लोकगीताने उत्सवात नवरंग भरले जातात. मारुती मंदिरासमोर गावची सामुदायिक होळी पेटविली जाते. या होळीभवती तरूण मंडळी दगडी गोटे खांद्यावर घेऊन होळीला प्रदक्षिणा घालत आपल्यातील रग दाखवितात. डफाच्या तालावर चांदीचे टाक घेतलेल्या बालवीरांना गावभर वाजतगाजत नाचत मिरवले जाते. ही मिरवणूक महादेव मंदिरासमोर येऊन थांबते. वीर महादेव मंदिराच्या पायऱ्यांवर ठाण मांडतात व सुरू होतो टिप्परघाईचा खेळ, असे सांगताना लोकपरंपरांचे अभ्यासक किरण भावसार एका वेगळ्याच रंगात रंगून गेलेले दिसतात.. असं वाटायला लागतं की डफाचा आवाज घुमू लागला आहे अन्‌ त्यांच्या तोंडून टिप्परघाई लोकगीत अलगद उतरू लागले आहे.…

वरल्या रानी नऊ नांगराची जाळीऽ ऽ
नांगरून दुणून केलीया काळी
जायजाच्या पोराहो टिप्परघाई खेळा ऽ टिप्परघाई खेळा ऽ

बोहाडे, आखाडीच्या माध्यमातून अनेक मौखिक लोकगीते कोकणातून देशावर आली अन्‌ ती आता स्थानिक झाली आहेत. याचा कर्ता कोण माहिती नसले तरी ही परंपरा कायम गावात राहावी म्हणून वडांगळीकरांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले असून, ते कौतुकास्पद आहेत. तर टिप्परघाईनंतर डसणडुक्करही प्रथाही वेगळेपण ठरते.

शेती हा मुख्य व्यवसाय असणाऱ्या वडांगळीकरांची शेती अन्‌ त्यांच्या जनावरांवर प्रचंड श्रद्धा आहे. ही श्रद्धा आषाढ व श्रावण महिन्यात मोढा पाळून ते दाखवितात. मोढा म्हणजे ग्रामदैवताना नैवेद्य करून शेतीची कामे बंद ठेवली जातात. या काळात प्रत्येक मंगळवारी गाई, बैलांना शेतकामापासून सुटी दिली जाते. यालाच मोढा पाळणे असे म्हणतात. वडांगळीची नाट्य परंपराही समृद्ध होती. पूर्वी गावातील कलावैभव व सरस्वती नाटक मंडळीने जिल्हा गाजविला आहे. जिल्हाभर नाटक सादर करून ही कला जोपासण्याचा त्यांचा प्रयत्न घराघरात टीव्ही दाखल झाल्यानंतर लयास गेला. ही परंपरा पुढे कायम राहावी म्हणून दिग्वविजय कला क्रीडा साहित्य केंद्राने चिकाटीने प्रयत्न केले अन्‌ त्याला काहीसे यशही आले. मात्र पुन्हा हा वारसा खंडित झाला आहे. नाट्यकलावंत कै. शिवाजी गोरे, कलाकार मस्तान मनियार, भागवत खुळे, सोमनाथ बोटेकर, शिवाजी खुळे आदी नावे सुपरिचित आहेत. लोकपरंपरा,अख्यायिका, प्रथा जपताना वडांगळीकरांनी आधुनिक विचारांची पेरणी व्हावी म्हणून वाचनालय चळवळही जोमाने सुरू केली आहे. कथा, कीर्तन व पोथ्यांच्या सहवासाबरोबरच व्याख्यानमालेची परंपराही नव्याने सुरू करून गावाला नवी दिशा दिली. प्रथा,परंपरा, अख्यायिका अन् पुरातन वास्तुंचा वटवृक्षासारखा भव्य वारसा सांभाळत वडांगळी आधुनिक विचारांच्या पारंब्या मनामनात रूजवित असल्याचे पाहून धन्य झाल्यासारखे वाटते.

लेखक : रमेश पडवळ

rameshpadwal@gmail.com

contact no : 8380098107

अंतिम सुधारित : 7/12/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate