प्रशासकीय सेवेत येण्यासाठी सध्या विविध शहरांमध्ये ॲकडमी, क्लासेस यांच्या माध्यमातून मार्गदर्शन वर्ग भरवले जातात. पण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्थापनेपासून आतापर्यंत विविध परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षांमध्ये त्या परीक्षेच्या अभ्यासक्रमाबाहेरील कोणतेच प्रश्न विचारले नाहीत. सध्या प्रशासकीय सेवेत येण्याची स्पर्धा वाढत आहे. यास्पर्धेत यश मिळविण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन जीवनापासून तयारी केली तरी निश्चितच यश मिळविता येते. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे प्रशासकीय सेवेत येण्याचा महामार्ग आहे. आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा व त्याची माहिती आणि अभ्यासक्रम याविषयी थोडक्यात माहिती देत आहोत
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यातील विविध प्रशासकीय विभागात वर्ग-3 पासून वर्ग-1 पर्यंतच्या अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया पूर्ण केली जाते. ‘मागणी तसा पुरवठा’ यानुसार प्रत्येक विभागाच्या मागणीनुसार व शासनाच्या मान्यतेनुसार त्या त्या पदाच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात येवून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात. आयोगाच्या www.mpsc.gov.in व https://mahampsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर जाहिराती, ऑनलाईन अर्ज करण्याची माहिती, सर्व परीक्षांचे अभ्यासक्रम, निकाल, वेळापत्रक, आयोगाचे वेळोवेळी घोषित करण्यात आलेल्या घोषणा आदी दालनातून माहिती देण्यात येते.
भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 नुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. आयोगाच्यावतीने स्पर्धा परीक्षा, विभागीय स्पर्धा परीक्षा, सरळसेवा परीक्षा, मर्यादित विभागीय परीक्षा आयोजित केल्या जातात. आयोगामार्फत स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून राज्य सेवा परीक्षा, विक्रीकर निरीक्षक परीक्षा (STI), पोलिस उपनिरीक्षक परीक्षा (PSI), मंत्रालयीन सहायक (Assistant), महाराष्ट्र वन सेवा परीक्षा, महाराष्ट्र अभियंत्रिकी सेवा परीक्षा, महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा, न्यायलयीन सेवा परीक्षा, मोटर वाहन निरीक्षक परीक्षा, लिपीक-टंकलेखक परीक्षा आदी व सरळ सेवेतून विविध पदाच्या परीक्षा सामान्य राज्य सेवा चाचणी परीक्षा घेतली जाते. तसेच प्रशासकीय सेवेतील विभागांतर्गत परीक्षा घेतल्या जातात.
आयोगाच्या वतीने राज्यसेवा परीक्षेमधून अधिकारी होण्याकरिता पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तीन टप्प्यातून यावे लागते. राज्यसेवा परीक्षेतून राज्य शासनाच्या सेवेतील अतांत्रिक राजपत्रित गट-अ व ब या संवर्गातील पुढील पदे शासनाच्या मागणीनुसार व पदांच्या उपलब्धेनुसार भरण्यात येतात.
राज्यसेवेतील पदे
उपजिल्हाधिकारी गट-अ, पोलिस उपअधीक्षक/सहायक पोलिस आयुक्त गट-अ, सहायक विक्रीकर आयुक्त गट-अ, उपनिबंधक सहकारी संस्था गट-अ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी/गट विकास अधिकारी गट-अ, सहायक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ, मुख्याधिकारी नगरपालिका/नगरपरिषद गट-अ, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट-अ, तहसीलदार गट-अ, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट-ब, लेखा अधिकारी महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-ब, कक्षाधिकारी (मंत्रालय) गट-ब, गट विकास अधिकारी गट-ब, मुख्याधिकारी नगरपालिका/परिषद गट-ब, सहायक निबंधक सहकारी संस्था ग-ब, उप अधीक्षक भूमी अभिलेखा गट-ब, उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट-ब, सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट-ब, नायब तहसीलदार गट-ब इत्यादी
राज्यसेवा परीक्षेची थोडक्यात माहिती पुढील प्रमाणे
या परीक्षेचे तीन टप्पे आहेत. 1) पूर्व परीक्षा (400 गुण) 2) मुख्य परीक्षा (800 गुण) आणि 3) मुलाखत (100 गुण) शैक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही विद्याशाखेतील पदवी.
राज्यसेवा पूर्व परीक्षा - अभ्यासक्रम
या परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाने निश्चित केला आहे. हा पॅटर्न बऱ्याच अंशी यूपीएससीसारखा आहे. अभ्यासक्रम आणि त्याचे स्वरूप- पूर्व परीक्षेसाठी प्रत्येकी २०० गुणांच्या दोन प्रश्नपत्रिका असतील. दोन तास वेळ असेल. या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (मराठी व इंग्रजीत) असतील.
पेपर- एक (गुण २००-दोन तास)
राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण चालू घडामोडी. भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ.
महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भूगोल- भौतिक, सामाजिक आणि आर्थिक.
महाराष्ट्र व भारत- राज्यव्यवस्था आणि शासन- राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायती राज, शहरी प्रशासन, शासकीय धोरणं, हक्कविषयक घडामोडी आदी
आर्थिक आणि सामाजिक विकास- शाश्वत विकास, गरिबी, समावेशन, लोकसंख्याविषयक मुद्दे, सामाजिक धोरणे इत्यादी पर्यावरणीय परिस्थिती, जैव विविधता, हवामान बदल यामधील सर्वसामान्य मुद्दे, सामान्य विज्ञान (रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र)
पेपर- दोन (गुण २००- दोन तास)
इंटरपर्सनल स्किल्स (कम्युनिकेशन स्किलसह) : तर्कशुद्ध युक्तिवाद आणि मीमांसा/पृथ:करण क्षमता (लॉजिकल रिझनिंग आणि अॅनालिटिकल अॅबिलिटी), निर्णय क्षमता व प्रश्नांची उकल (डिसिजन मेकींग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग), सामान्य बुद्धिमापन क्षमता (जनरल मेंटल एबिलिटी), बेसिक न्यूमरसी, डेटा इंटरप्रिटेशन (चार्ट, ग्राफ, टेबल्स) (दहावीचा स्तर असेल), इंग्रजी व मराठी भाषा आकलन क्षमता- कॉम्प्रिहेन्शन स्किल (दहावीस्तर)
कॉम्प्रिहेन्शन
यात आकलन क्षमतेची परीक्षा घेतली जाते. उताऱ्यावरील प्रश्न, पॅराग्राफ उलटेसुलटे करुन त्याची संगती लावणे, वाक्यरचना ओळखणे, योग्य शब्दाची निवड करणे, समानार्थी-विरुद्धार्थी शब्द लिहीणे अशा अनेक गोष्टी त्यात येतात.
लॉजिकल रिझनिंग आणि अॅनॅलॅटिकल अॅबिलिटी
यामध्ये एखाद्या गोष्टीचा तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता जोखली जाते. दोन विधानांचा परस्परसंबंध, त्यावरचे अनुमान काढावे लागतात.
डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग
प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना सतत विविध प्रश्नांना-समस्यांना सामोरे जावे लागते. त्यावेळी समस्येचा सर्वांगीण विचार करून योग्य, अधिकाधिक जनतेला उपयोगी ठरेल, असा निर्णय घ्यावा लागतो. यातील काही प्रश्न हे क्षमतेची चाचपणी करणारे असतील.
जनरल मेंटल एबिलिटी
आत्तापर्यंत सामान्य अध्ययनाच्या पेपरमध्ये या घटकाचा समावेश असे. आता नवीन पेपर (पेपर दोन) मध्ये याचा समावेश आहे. यामध्ये काळ, काम, वेग, गुणोत्तर, कोडिंग, डिकोडिंग, प्रोबॅबिलिटी, घड्याळ, कॅलेंडर, दिशा आदींवर आधारित प्रश्न असतात.
बेसिक न्यूमरसी आणि डेटा इंटरप्रिटेशन
यात आकड्यांमधील संबंध ओळखून क्रम किंवा रिक्त स्थानं भरणे, लसावि/मसाविवर आधारित प्रश्न, सरासरी, वयांचे गुणोत्तर नफा-तोटा, क्षेत्रफळ, आकारमान, प्रोबॅबिलिटी आदींवर आधारित प्रश्नांचा समावेश होतो. तर डेटा इंटरप्रिटेशनमध्ये आकृती, ग्राफ, टेबल्स याचे आकलन करणे अपेक्षित असते. कॉम्प्रिहेन्शन तसेच न्यूमरसीचे प्रश्न हे दहावीस्तराचे असणार आहेत. त्यामुळे त्याचा नियमित सराव हमखास यश देऊ शकेल.
इंटरपर्सनल स्किल्स
सरकारी नोकरीत उच्चपदावर काम करत असताना अनेक व्यक्ती, संस्था, राजकारणी, अधिकारी, कर्मचारी आदींशी नियमित संपर्क येत असतो. त्यावेळी तुमची इंटरपर्सनल स्किल्स आणि कम्युनिकेशन स्किल्स कामाला येतात.
-गजानन पाटील, प्रतिवेदक, महान्यूज.
(संदर्भ-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे संकेतस्थळ)