(संश्लेषीजन रोग). संयोजी (जोडणाऱ्या) ऊतकाच्या (समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहाच्या) आधारद्रव्यामध्ये आणि संश्लेषीजन (त्वचा, कूर्चा व हाडे यांमधील मुख्य आधारभूत प्रथिनाच्या) तंतूंमध्ये विकृती निर्माण झाल्यामुळे होणाऱ्या रोगांना कोलॅजेन रोग किंवा संश्लेषीजन रोग असे म्हणतात. या सर्व रोगांचे मूळ कारण अजून अज्ञात आहे.
आधारद्रव्य व संयोजी ऊतक शरीरातील सर्व अवयवांत असल्यामुळे या रोगात अनेक अवयवांत उत्पन्न होणारी विविध लक्षणे दिसतात.
या सर्व रोगांत समान विकृती दिसून येतात. संश्लेषीजन तंतू आणि आधारद्रव्याच्या उत्पत्तीत वाढ, त्यांचे निक्षेपण (साचून राहणे) आणि निक्षेपित तंतूंचा व आधारद्रव्याचा अपकर्ष (ऱ्हास) अशी विकृती समान दिसते. तसेच जंतुविषासंबंधी अधिहर्षता (अॅलर्जी) हा समान गुणही या सर्व रोगांत दिसतो. रक्तात अप्राकृत (नेहमीपेक्षा निराळी) प्रतिपिंडे व ग्लोब्युलिनांचे (विशिष्ट प्रथिनांचे) प्रमाण वाढलेले दिसते. त्यावरून या सर्व रोगांत प्रतिजन [ज्या पदार्थाच्या संपर्कामुळे विशिष्ट प्रतिपिंडे तयार होतात असे पदार्थ, → प्रतिजन] प्रतिपिंड प्रतिक्रियेमध्ये काही बिघाड होत असावा अशी कल्पना आहे. अशी समान विकृती जरी या सर्व रोगांत दिसून येत असली, तरी त्यांची मूळ कारणे एकच असतील असे म्हणता येत नाही. याबद्दलचे ज्ञान अजून स्पष्ट झालेले नाही.
संश्लेषीजन रोगांत खालील रोगांचा अंतर्भाव करण्यात येतो : (१) संधिवात, (२) संधिवाताभ संधिशोथ (संधिवातासारखी सांध्यांची दाहयुक्त सूज), (३) आरक्त चर्मक्षय(४) पर्विल बहुरोहिणीशोथ (अनेक रक्तवाहिन्यांना एकाच वेळी सूज येऊन ताप व इतर लक्षणे असणारा रोग), (५) सार्वदेहिक चर्मकाठिण्य व (६) त्वक्स्नायुशोथ (कातडी, त्याखालील ऊतक व स्नायू यांची दाहयुक्त सूज). यांपैकी पहिल्या तीन रोगांचे वर्णन अन्यत्र केलेले आहे.
(पॉलिआर्टेरिटीस नोडोझा). रोहिण्यांच्या भित्तीमधील संयोजी ऊतकाचा अपकर्ष झाल्यामुळे तंत्रिका तंत्र (मज्जासंस्था), हृदय, वृक्क (मूत्रपिंड), फुप्फुसे आणि इतर अंतस्त्ये (पोट व छातीच्या पोकळीतील इंद्रिये) यांच्या कार्यात बिघाड होतो. या रोगाला पर्विल बहुरोहिणीशोथ वा ‘गाठाळ परिरोहिणीशोथ’ म्हणतात.
हा रोग मुख्यतः २० ते ३० वर्षांच्या पुरुषांमध्ये आढळतो. अनियमित ज्वर, बहुतंत्रिकाशोथ, रक्तस्राव, दमा, संधिशोथ वगैरे अनेकविध लक्षणे या रोगात दिसत असल्यामुळे त्याचे निदान करणे फार कठीण आहे. त्वचेखाली जाड गाठी होतात. अशी गाठ सूक्ष्मदर्शकाने तपासली तरच निदान शक्य होते.
या रोगाची लक्षणे मधूनमधून आपोआप कमी होतात; परंतु हळूहळू हा विकार शरीरातील सर्व रोहिण्यांमध्ये पसरत गेल्यामुळे वेळीच उपाय न झाल्यास वृक्कपात (मूत्रपिंडाचे कार्य थांबणे), रक्तस्राराव अथवा हृद्विकार होऊन मृत्यू येतो.
अलीकडे कॉर्टिसोन हे औषध निघाल्यापासून या रोगाची लक्षणे पुष्कळशी आटोक्यात येऊ शकतात. परंतु कॉर्टिसोन हे सततच द्यावे लागते त्यामुळे क्वचित त्या औषधापासूनही अपाय संभवतो.
या रोगामध्ये लक्षणांचा भर त्वचेवर अधिक असतो. त्वचा आणि अधित्वचा (त्वचेचा वरचा थर) यांतील ऊतकांत विकृती झाल्यामुळे त्वचा जाड आणि राठ होते. हृदय, फुप्फुसे आणि इतर अंतस्त्यांतही पर्विल बहुरोहिणीशोथाप्रमाणेच इतर लक्षणे दिसू लागतात.
हा रोग ३० ते ५० वर्षांच्या स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात दिसतो. सुरुवातीस बोटे, हात, चेहरा या ठिकाणची त्वचा जाड, रखरखीत आणि राठ होते. त्वचा जाड झाल्यामुळे व चेहऱ्यातील स्नायूंची हालचाल कमी झाल्यामुळे चेहरा भावनाहीन दिसतो. हातांची बोटे फिक्कट निळसर दिसतात. प्रथम त्वचा सुजल्यासारखी जाड होते पण पुढे ती राठ आणि टणक होऊन तिचा लवचिकपणा नष्ट होतो. प्रगतावस्थेत सर्वच त्वचेखाली तंत्वात्मक ऊतकांची वाढ झाल्यामुळे, विशेषत: हातांची बोटे जाड होऊन त्यांची हालचाल कमी होत जाते. बोटांच्या टोकांशी व्रण (जखमा) उत्पन्न होतात.
या रोगातही कॉर्टिसोन या औषधाचा उपयोग रोगाची प्रगती मंद करण्यापुरताच होतो.
या रोगातही कॉर्टिसोन या औषधाचा उपयोग रोगाची प्रगती मंद करण्यापुरताच होतो.
संदर्भ : Boyd, W. Textbook of Pathology : Structure and Function in Diseases, Philadelphia, 1961.
लेखक : वा. रा. ढमढेरे
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 4/21/2020
अमिबिक यकृत फोड हा आंतड्यातील परजीवी एन्टामिबा हिस...
डाळिंब पिकामध्ये बॅक्टेरिअल ब्लाइट, मर (फ्युजॅरिय...
अॅडिसन रोग : (बाह्यकज-प्रवर्तक-न्यूनता). अधिवृक्क...
ढगाळ हवामानामुळे मावा किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची...