पाच वर्षाखालील (विशेषतः दोन वर्षाखालील) मुलांना होणारा हा एक गंभीर आजार आहे. संसर्गानंतर 1-2 आठवडयात आजार सुरु होतो. एकदा सुरू झाल्यावर यावर औषध फारसे चालत नाही. पण याची लस टोचल्यावर हा आजार होत नाही. एकदा सुरू झाला,की डांग्या खोकला अनेक महिने टिकतो.
त्रिगुणी लसटोचणी सुरू झाल्यापासून या रोगाचे प्रमाण घटले आहे.
एक प्रकारच्या सूक्ष्म जंतूंमुळे हा आजार होतो. हे जंतू श्वासावाटे एकमेकांकडे हा आजार पसरवतात. या रोगाची लागण लहान मुलांत (विशेषतः दोन वर्षाखालील) सुरू होते. तीन वर्षानंतर याचे प्रमाण खूपच कमी होते.
या आजारात सूक्ष्मजंतूंमुळे श्वसनसंस्था, फुप्फुसे यांचा दाह होऊन खोकला येत राहतो.
सुरुवातीस 1-2 आठवडे फक्त नाक गळणे, सौम्य ताप आणि खोकला असतो. यानंतर खोकल्याची उबळ सुरु होते. हा त्रास 2 ते 6 आठवडेपर्यंत राहतो. यानंतर 1-2 आठवडयात लक्षणे कमी होतात.
खोकला एकदा सुरू झाला की त्याची उबळ 10-15 मिनिटांपर्यंत टिकून राहते. कित्येक वेळा मुलाचा श्वास कोंडतो व मूल काळेनिळे पडते. उबळीमध्ये मूल दगावू शकते. उबळ संपल्यावर कोंडलेला दम सुटतो व हवा वेगाने आत ओढली जाते. यामुळे 'हूप' असा शिट्टीसारखा आवाज येतो.
या उबळीमुळे अनेक धोके संभवतात. निरनिराळया अवयवात रक्तस्राव होऊ शकतो. (घोळणा फुटणे, डोळयात रक्त साकळणे), हर्निया, गुदाशय बाहेर पडणे, झटके, इ. दुष्परिणाम संभवतात.
सतत खोकल्याने भूक कमी होऊन मूल खंगते. हा आजार 6 ते 8 आठवडे चालतो. जुना टी.बी.चा आजार बळावू शकतो.
डांग्या खोकल्याची उबळ व टिकून राहणारा खोकला ह्याच रोगनिदानाच्या सर्वात महत्त्वाच्या खुणा आहेत.
उपचारासाठी डॉक्टरकडेच पाठवावे.
- इरिथ्रोमायसिन ने आजार थोडा कमी पडतो, पण पूर्ण बरा होत नाही.
- खोकला दाबण्यासाठी कोडीनयुक्त औषध मिळते. (कोडीन-लिंक्टस) याचा काही प्रमाणात उपयोग होऊ शकेल. परंतु हा आजार एकदा झाल्यावर काही आठवडे,महिने टिकून राहतो, औषधोपचारांनी विशेष फरक पडत नाही.
हा आजार होऊच नये म्हणून वेळीच मुलांना त्रिगुणी लस टोचून घ्यावी.
अडुळशाची 10-15 पाने वाफवून रस काढावा. 10-15 मिली. रस मधासोबत द्यावा.
सितोपलादी चूर्ण + ज्येष्ठमधपावडर मधासोबत द्यावे. लहान मुलांसाठी एका वेळी 250मि.ग्रॅ ते 500मि.ग्रॅ दिवसभरात 3-4 वेळेस द्यावे. मोठया माणसांसाठी अर्धा ते एक ग्रॅम3-4 वेळेस द्यावे.
- न्यूमोनिया : डांग्या खोकल्यामुळे दगावणा-या मुलांमध्ये मृत्यूचे कारण बहुधा (90% वेळा) न्यूमोनिया हे असते.
- श्वासनलिकादाह : डांग्या खोकल्यामुळे खूप चिकट घट्ट असा बेडका तयार होतो. हा बेडका मुलाला खोकून काढता आला नाही तर तो अडकून बसतो. त्यामुळे जंतुदोष होण्याची शक्यता असते.
- कान फुटण्याचा प्रकार कानाघ नळीतला दाब वाढल्यामुळे आणि जंतुदोषाने होतो.
- सुप्तावस्थेतील क्षयरोग (क्षयरोगाचे पहिले घर) बळावतो.
- गुदमरल्यामुळे इतर परिणाम होतातः उदा. झटके येणे,
- हर्निया, डोळयांमध्ये रक्त साकळणे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 6/5/2020
रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दा...
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...
महिलांमध्ये त्वचेवर गांधी उठण्याची तक्रार मोठ्या प...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...