या पार्श्वभूमीवर गर्भपाताचा कायदा ही एक मोठीच सुधारणा आहे. तरीही सुरक्षित गर्भपात हा स्त्रीचा सहज अधिकार म्हणून या कायद्याने मान्य केलेला नाही. सहज अधिकार हे तत्त्व सोडून इतर अनेक 'कारणांवरून' या कायद्यात गर्भपात मान्य केलेला आहे. मात्र या कायद्यामुळे स्त्रियांसाठी गर्भपात सोपा झालेला आहे. वैद्यकीय गर्भपातासाठी आता कायद्याने पुरुषांच्या संमतीची आवश्यकता नसते. तसेच तज्ज्ञांकडून गर्भपात केल्याने यातला धोका अगदी कमी झाला आहे. सुधारित गर्भपात कायद्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे.
गर्भपातासाठी खालील कारणे मान्य करण्यात आली आहेत.
स्त्री मानसिक अपंग असल्यास गर्भपातासाठी हे कारण पुरते. मात्र नुकताच सुप्रीम कोर्टाने याविरुध्द निकाल दिला असल्याने याबाबतीत थोडा मतभेद निर्माण झाला आहे.
स्त्री मानसिकदृष्टया अपंग किंवा अज्ञान (तिचे वय अठरा वर्षाखाली असेल) तरच गर्भपातासाठी पालकांची संमती लागते. एरवी तिची स्वतःची संमती पुरते.
स्त्रीगर्भ हे गर्भपाताचे कारण होऊ शकत नाही. असे करणे गुन्हा आहे.
शासनमान्य केंद्रावरच गर्भपात करता येतो. या ठिकाणी पुरेशी तयारी व उपकरणे, सोयी आहेत हे पाहूनच मान्यता दिली जाते. प्रत्येक हॉस्पिटलला अशी मान्यता असतेच असे नाही. 12 आठवडयांपुढच्या गर्भपातासाठी पोटावर ऐनवेळी शस्त्रक्रिया करण्याची व रक्त देण्याची सोय असल्याशिवाय त्या हॉस्पिटलला मान्यता मिळू शकत नाही. बहुतेक गर्भपात केंद्रांना 12 आठवडयाच्या आतलाच गर्भपात करता येतो.
मान्यताप्राप्त केंद्रावर 'अधिकृत गर्भपात केंद्रा'ची पाटी असते.
आठ आठवडयांच्या आतला गर्भ लहान असतो. हा गर्भ निर्वात पंपाने ओढणे हे एक साधे तंत्र आता वापरतात. यानंतर सहसा क्युरेटिंग लागत नाही. या साध्या तंत्राला एम.व्ही.ए. (मॅन्युअल व्हॅक्युम ऍस्पिरेशन) असे म्हणतात. याला भूल लागत नाही.
बारा आठवडयांच्या आतल्या गर्भपातासाठी खालून म्हणजे योनीमार्गाने छोटी शस्त्रक्रिया असते. यात गर्भाशयात नळी सरकवून निर्वात पंपाने आतला गर्भ ओढून घेतात यानंतर गर्भपिशवी आतून खरवडून काढतात. गर्भाशयाच्या तोंडाशी असणा-या नसांपुरती भूल देऊन हे काम करता येते.
12 ते 20 आठवडयांपर्यंतचा गर्भ सलाईन किंवा विशिष्ट औषध (प्रोस्टा ग्लॅडिन) गर्भाशयात सोडून किंवा प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करून काढावा लागतो. यात जास्त धोका व त्रास असतो. रुग्णालयात राहावे लागते.
इंजेक्शनने गर्भपात होऊ शकत नाही
पाळी चुकून 15 दिवसच झाले असतील व गर्भ नको असेल तर ही पध्दत वापरतात. ही बाब गर्भपाताच्या कायद्याच्या कक्षेत येत नाही. यात एक प्लास्टिकची सिरींज वापरतात. नळीमार्फत गर्भाशयात जे काही असेल ते शोषून घेतले जाते व त्यानंतर पाळीचे चक्र नेहमीसारखे होते. म्हणून याला 'एम. आर.' किंवा 'पाळी सुरळीत करणे' असे म्हणतात. पण पाळी चुकून 15 दिवसांपेक्षा अधिक वेळ झाला असेल तर या पध्दतीचा उपयोग होत नाही.
एम. आर. व दहा-बारा आठवडयांपर्यंतच्या गर्भपातासाठी रुग्णालयात काही तास राहणे पुरते, मात्र त्यानंतरच्या गर्भपातासाठी वेगळी पध्दत असल्याने रुग्णालयात दोन-तीन किंवा अधिक दिवस राहावे लागते.
लैंगिक संबंध आल्यापासून 24 तासात, एकच गोळी घेऊन गर्भसंभव टाळण्याची सोय आता झाली आहे यात स्त्रीसंप्रेरकांचा एक मोठा डोस असतो. ही गोळी गर्भपातासाठी नाही.
गर्भपातासाठी २ गोळ्या असतात, पण त्यासाठी वैद्यकीय सल्ला घ्यावा.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 1/29/2020
गरोदरपण (गर्भारपण) आपोआपच नष्ट होणे ह्याला नैसर्ग...
असुरक्षित गर्भपात आणि त्यानंतर होणारा त्रास
एक म्हणजे नैसर्गिक गर्भपात जो आपोआप होतो आणि दुसरा...
गर्भपात किंवा 'अर्धेकच्चे पडणे' हा शब्द आपण ब-याच ...