অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सौरऊर्जा काळाची गरज

खिडकीतून मिळवा घराला पुरणारी वीज!

कमी सूर्यप्रकाशही पुरेसा; सौरऊर्जा साठवण्याचीही सुविधा .....

महागाईचे चटके बसत असताना सौरऊर्जेमुळे महिन्याच्या वीजबिलाचे बजेट वाचणार असेल, तर असे तंत्रज्ञान कोणालाही हवेहवेसे वाटेल. घरासाठी बसवलेली सोलर पॅनेलच्या रूपातील एक छोटीशी खिडकी तुमच्या घरातील वीज उपकरणांच्या गरजेसाठी उपयुक्त ठरली, वीजबिलात कपात झाली आणि अशी वीज साठवून ठेवता आली, तर असे मॉडेल प्रत्येकालाच हवेहवेसे वाटेल ना? असेच नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित केले आहे दिनेश कदम या उद्योजकाने. 

सध्याच्या वाढत्या वीजदराच्या काळात अगदी घरातील विजेची उपकरणांची गरज असो किंवा शाळा, हॉस्पिटल किंवा एखादा उद्योग, त्यांच्या गरजेनुसार सौरऊर्जेवर आधारित उपकरणांचा हा पर्याय उपयुक्त ठरेल. एखाद्या इमारतीला संपूर्णपणे सौरऊर्जेचा पर्याय हवा असेल, तर त्यासाठी बिल्डिंग इंटिग्रेटेड फोटो व्होल्टाइक्‍स (बीआयपीव्ही) हे नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. त्यानुसार बांधकाम साहित्यासोबतच सोलर तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येतो. पारंपरिक बांधकाम साहित्य सोलर पॅनेलद्वारे बदलणारे असे हे तंत्रज्ञान आहे. 

स्कायलाइट, छत, भिंती किंवा खिडक्‍या अशा कोणत्याही ठिकाणी हे पॅनेल बसवता येतात. सोलर पॅनेलद्वारे सौरऊर्जा ही बॅटरीशिवाय थेट इनव्हर्टरच्या उपयोगाने थेट ग्रीडशी जोडता येते आणि घरातली उपकरणे चालवण्यासाठी वीज उपलब्ध होते, अशी या तंत्रज्ञानाची सुलभ रचना आहे. कोणत्याही अतिरिक्त वायरिंगची गरजही यासाठी नसल्याने खर्चही खूप कमी होतो. बॅटरीचा समावेश असलेल्या या तंत्रज्ञानात सौरऊर्जा साठवताही येते. त्यामुळे सौरप्रकाश नसला, तरी ही "साठवलेली' वीज रात्रीच्या वेळी वापरण्याची सुविधा आहे. 

बीआयपीव्ही तंत्रज्ञानासाठी मोनो, पॉली आणि एसआय पॅनेलचा उपयोग करण्यात आला आहे. या पॅनेलचे वैशिष्ट्य म्हणजे, कमी सूर्यप्रकाशातही पॅनेल कार्यरत राहिल्याने वीजनिर्मितीत अडथळा येत नाही. मार्केटमध्ये अनेक सोलर पॅनेल उपकरणांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या थ्री फेज ग्राहक लक्षात घेऊन उपकरणे तयार करतात. मात्र, घरगुती ग्राहकांचा विचार करून सिंगल फेज पॅनेल तयार करण्यात आम्ही यश मिळविले, असे सोव्हीन पॉवर प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश कदम सांगतात. 

येत्या काळात पायथागोरस पॅनेलच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून बाथरूमच्या खिडकीच्या कमी प्रकाशाच्या काचांमधूनही सौरऊर्जानिर्मितीचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या या तंत्रज्ञानावर काम सुरू असून, लवकरच ते मार्केटमध्ये दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर सोलर टाइल्सच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम करीत असल्याचे कदम म्हणाले.

अशी मिळेल वीज

- 147 चौरस मीटर पॅनेलच्या माध्यमातून 1 किलोवॅट वीजनिर्मिती 
- एका चार मजली इमारतीत "बीआयपीव्ही' तंत्रज्ञानाद्वारे आठ किलोवॅट ते 10 किलोवॅट वीजनिर्मिती 
- बॅटरीसह असलेल्या उपकरणाचा प्रत्येक किलोवॅटचा खर्च 1 लाख 80 हजार रुपये 
- घरगुती उपकरणांसाठी 40 हजारांपासून उपकरण -

 

स्त्रोत : marathiadda.com

संकलन : छाया निक्रड

अंतिम सुधारित : 5/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate