অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

विजेमुळे घडणाऱ्या आगी…

आपण नेहमीच वर्तमानपत्रात वाचतो की अमूक ठिकाणी शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली व त्यामुळे इतके नुकसान झाले. काही वेळा जिवीतहानीसुद्धा होते. आजकाल सर्वच ठिकाणी वीज आल्यामुळे, लागलेली आग ही शॉर्ट सर्किटच असते, असा बहुतेक लोकांचा समज आहे.

वार्ताहर जणू काही आग लागताना प्रत्यक्ष हजर होते, अशा अविर्भावात व खात्रीने शॉर्ट सर्किटची ग्वाही देताना दिसतात. आग लागताच बहुदा अग्निशामक दलास पाचारण करण्यात येते. उपस्थित लोकांमार्फत सामान बाहेर काढणे व पाणी मारणे ह्या प्रक्रियेत जागेवर बरीच उलथापालथ होते. चौकशी अधिकाऱ्यास पुष्कळदा आगीच्या मुळ कारणापर्यंत पोहोचताना अडचण निर्माण होते.

आग जर बरीच लागली असेल तर आगीमुळे वायरिंग जळाली की वायरिंगच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली हेच कळण्यास मार्ग उरत नाही.
आगीची तक्रार विद्युत निरीक्षकाकडे आल्यास त्यांनी आगीचे नक्की कारण सांगण्यात अनभिज्ञता सांगितली की, लोकांना त्यांच्या ज्ञानाविषयी संशय येतो. पुष्कळदा आगीपासून झालेल्या नुकसानीचा संबंध विम्यापासून मिळणाऱ्या रकमेशी असतो. तेथे त्यांना आग खात्रीने शॉर्ट सर्किटने लागल्याबद्दलचे प्रमाणपत्र हवे असते. काही लोकांकडे आगीची घटना ठराविक कालावधीने होत असते. कधी ती वार्षिक, कधी पंचवार्षिक असते. कुंभमेळा एकवेळ त्याची वेळ बदलेल परंतु नियमित लागणारी आग वेळ बदलत नाही. कधी कधी आगीचा संबंध बॅलेन्स शिटशी तर नाही ना असे वाटते.

शॉर्ट सर्किटमुळे गाड्या पेटतात. मग ती खाजगी कार, बस किंवा रेल्वे राहू शकते. तेव्हा तर प्रश्न अत्यंत भावनिक होतो. हॉस्पिटलमधील आगीचा प्रश्न अत्यंत गंभीर, भावनिक असतो. त्यात पेशंट व त्यांचे नातेवाईक ह्यांचा जीवनमरणाचा प्रश्न असतो. ह्या सर्व घटनांचा सामाजिक जीवनावर फार परिणाम होतो. कोळसा झालेले, अवयव गमाविलेले जीव आपण बघतो. पण आग लागू नये यासाठी वायरिंग कशी असावी, त्यासाठी अजून काय सुरक्षा यंत्रणा बसवावी. याचा फारसा विचार आपण करीत नाही. घराच्या शोभेवर आपण खूप खर्च करतो. परंतु ती शोभा आगीत भस्मसात होवू नये याकडे लक्ष देत नाही.

आपण आता विजेच्या आगीच्या तांत्रिक बाबींची माहिती घेवूया

इलेक्ट्रिकल एनर्जी ए.सी. किंवा डी.सी. फॉर्ममध्ये असते. त्या दोन्हीमध्ये आग लागण्याची शक्यता असते. स्टॅटिक इलेक्ट्रीसिटी डी. सी. फॉर्मचा प्रकार आहे. त्यामुळेसुद्धा आगी लागल्या आहेत. पेट्रोल पंप, इतर स्फोटक/ज्वालाग्राही पदार्थ जसे बारूद, ज्वालाग्राही गॅस, अल्कोहोल इत्यादीच्या उत्पादनाच्या, संग्रहाच्या किंवा हाताळणाऱ्या जागी, अशा आगी लागू शकतात. तेथे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी तयार होणार नाही किंवा तयार झाली तर ती त्वरित जमिनीत जाईल. याची काळजी घ्यावी लागते. येथे कार्यक्षम अर्थिंगचे महत्व अनन्यसाधारण आहे.
आकाशातील विजेमुळेसुद्धा अशा आगी लागू शकतात. आकाशातील विजेचा लोळ वीज पुरवठा वितरण व्यवस्थेवर पडला किंवा त्याच्या बाजूने गेला तरी फार मोठ्या इंडक्शन व्होल्टेजमुळे अशा आगी लागल्याने ग्राहकाचे उपकरण खराब होण्याची उदाहरणे आहेत. जेव्हा फार मोठ्या प्रमाणात गडगडात होवून विजा आकाशात चमकत असतात, तेव्हा आपली वीज संचमांडणी थोड्या वेळासाठी वीज वितरण व्यवस्थेपासून वेगळी करावी, म्हणजे धोका टळू शकतो.

आगीची वीज संचमांडणीमध्ये प्रामुख्याने आढळलेली कारणे अशी

1. जीर्ण, वेष्टन निघालेली वायरिंग. लोखंडास बांधलेले वायर्स, पेंट/चुन्यामुळे खराब झालेल्या वायर्स.
2. उपकरणातील बिघाड व उपकरणाच्या बाजूला ज्वलनशील वस्तू.
3. जोड दिलेली वायरिंग, जोड दिलेली अर्थिंग तार, पुरेशी व भविष्यातील गरज ओळखून न केलेली वायरिंग, तसेच अपूरे प्लग सॉकेट, वाढत्या उपकरणांमुळे वाढलेला अनियंत्रीत भार.
4. नॉन आय.एस.आय. स्विचेस, प्लग सॉकेट्स, वायर्स, उपकरणे.
5. केसिंग/पाईपमध्ये मानकात ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा जास्त वायर्स टाकणे.
6. स्विच गिअर्स, स्विच बोर्डसमोर/खाली ज्वलनशील पदार्थ ठेवणे.
7. उपकरणास पुरेसे वायु वीजन न मिळाल्यामुळे तापमान वाढणे.
8. नॅशनल इलेक्ट्रिकल कोड, आय एस : 732 प्रमाणे वायरिंग न करणे. चुकीचा वायरिंग प्रकार निवडणे.
9. उपकरणाचा, स्विचगियर्सचा इन्ग्रेस फॅक्टर जागेवर वातावरणास आवश्यक असल्याप्रमाणे नसणे.
10. वायर्स उघड्या ठेवणे, ज्यामुळे उंदीर किंवा तत्सम प्राण्यांकडून वायरिंग कुरतडणे.
11. वायरिंगची नियमित तपासणी न करणे, सुरक्षा साधने जसे एम.सी.बी., ई.एल.सी.बी.
फ्युजेसचा योग्य व त्याच्या मर्यादा न समजून वापर, स्विच गियर्सचे आपापसातील समन्वय नसणे, रिले किंवा ब्रेकर, स्टार्टरचे चुकीचे सेटींग.
12. पॉवर व लायटिंग उपकरणांची वायरिंग एकाच पाईपमध्ये टाकणे.
13. योग्य संवेदनशिलता असलेली ई.एल.सी.बी. (अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर) व योग्य प्रकारच्या लोडनुसार (बी, सी, डी टाईप) एम सी बी चा वापर न करणे.
14. फ्युजची क्षमता आवश्यकतेपेक्षा / लोडपेक्षा फार जास्त ठेवणे, लुज कनेक्शन (प्लग सॉकेट, स्विचेस, मेन स्विचेस, होल्डर्स इत्यादी ठिकाणी) अचानक वाढलेले व्होल्टेज.
15. सर्वात महत्वाचे म्हणजे योग्य, कार्यक्षम अर्थिंग नसणे, कार्यक्षम अर्थिंग प्रत्येक व स्विच बोर्डात, प्रत्येक उपकरणास नसणे. योग्य क्षमतेची अर्थिंग तार/ वायर, वायरिंग व उपरी तारमार्ग वाहिनीमध्ये कंडक्टर वितरण व्यवस्थेत नसणे.

उपरीतार मार्गामध्ये झोल असलेल्या व एकमेकास स्पर्श होवू शकेल अश्या वायर्स, अकार्यक्षम किंवा नसलेले अर्थिंग नसलेले अर्थिग असे जास्त क्षमतेचे फ्युजेस, लुज जम्पर्स/कनेक्शन इत्यादी प्रामुख्याने कारणे आहेत. उपरीतार मार्गात काही वेळेस तार मार्गापासून काही अंतरावर जळाल्याच्या केसेस आढळलेल्या आहेत. काही वेळा हे अंतर इतके जास्त असते की, शॉर्ट सर्किटपेक्षा वेगळे काही कारण असावे, असा संशय येतो.

पुष्कळदा, खास करून जिनींग मिलमध्ये, कापसामध्ये दगड किंवा धातूची वस्तू नकळत जाते व जिनिंग मशिनमधील धातूच्या भागात तिचे घर्षण होवून ठिणग्या पडतात. जिनिंगमधील कापूस भुसभुशीत असल्याने एकदम आग पकडते व ती आग कोणाला कळण्याच्या आत एकदम अक्राळविक्राळ रूप धारण करते. वार्ताहर, लोक व मालकासाठी ही विजेमुळे लागलेली आग असते. बऱ्याचदा आगीचे कारण वेगळेच असते. मोटर टर्मिनल/स्टारर्टर/मेन स्विचमध्येसुद्धा कापसाची धूळ किंवा तंतू उडल्याने तेथील केबल टमिर्नल्स लुज असल्यास किंवा कॉन्टॅक्ट ठिक नसल्यास स्पार्किंग होवून आगी लागल्याचे निदर्शनास आले आहे.

बऱ्याचवेळी अपघात झाल्यावर निश्चित कारण शोधणे जिकिरीचे होते व पुष्कळदा ते शेवटपर्यंत कळतच नाही. त्यामुळे आगी लागूच नये यासाठी वीज संचमांडणी सर्व प्रकारे कशी व्यवस्थित राहील याचाच विचार करावा. कारण यात विजेचा काही दोष नसतो.

लेखक - विनय वसंत नागदेव,
विद्युत निरीक्षक, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, चंद्रपूर.

माहिती स्त्रोत : महान्युज

 

अंतिम सुधारित : 4/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate