অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

काचेच्या घराने केले उष्ण तापमान कमी

अतिउष्ण किंवा वाळवंटी प्रदेशातही शेती हिरवीगार करणे शक्‍य होईल का? ग्लोबल वार्मिंगची समस्या काही प्रमाणात कमी करता येईल का? हवे ते पीक, हव्या त्या वातावरणात घेता येईल का? अशा विविध प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न वाशीम जिल्ह्यातील आशिष कडू यांनी केला. एखाद्या खोलीतील तापमान बाहेरील तापमानापेक्षा कमी किंवा नियंत्रित ठेवणारे हीट इन्सुलेटिंग उपकरण (डिव्हाईस) त्यांनी तयार केले आहे. ग्रीनहाऊस, शहरी शेती किंवा टेरेस फार्मिंग किंवा तापमान नियंत्रित ठेवण्यासाठीच्या कोणत्याही गोष्टीसाठी या तंत्राचा वापर करता येईल. 
गणेश फुंदे 

वाशीम जिल्ह्यात जऊळका रेल्वे येथे आशिष रामभाऊ कडू राहतात, त्यांचा मूळचा फर्निचर निर्मितीचा व्यवसाय होता; मात्र तंत्रनिर्मितीचा छंद जोपासला असल्याने या व्यवसायापेक्षा नवीन काही तंत्र शोधून काढण्यामध्येच त्यांचा अधिक रस आहे, त्यासाठीच ते आपला अधिक वेळ खर्च करतात. सध्या जागतिक तापमानवाढ ही मोठी समस्या आहे. उन्हाळ्यात तर अनेक ठिकाणी पारा ४० अंशांचा आकडाही पार करू लागला आहे. अशा परिस्थितीत आपण विकसित केलेले 'हीट इन्सुलेटिंग डिव्हाईस' विविध क्षेत्रांत उपयोगी ठरू शकते, असा असा कडू यांचा दावा आहे. उष्णता आणि आर्द्रता या दोन्ही गोष्टींवर योग्यरीत्या नियंत्रण ठेवण्याची गरज त्यांना वाटते, त्यादृष्टीने त्यांचे कार्य सुरू आहे.

कृषिक्षेत्राला फायदेशीर

या उपकरणाचा फायदा शेतीक्षेत्रात ग्रीनहाऊसमध्ये करणे शक्‍य आहे, त्याचबरोबर आजकाल शहरांमधूनही छोटेखानी स्वरूपात अर्बन फार्मिंग, टेरेस फार्मिंगमध्ये याचा उपयोग करणे शक्‍य आहे. हवे ते पीक हव्या त्या वातावरणात घेता येणे शक्‍य होऊ शकते. रेफ्रिजरेटर, एसी आदी सुविधांचा उपयोग कृषिक्षेत्रात चांगल्या प्रकारे होतो, तेथेही या तंत्राचा वापर करता येईल.

काय आहे हे तंत्रज्ञान?

कडू यांनी १५ बाय १० फूट क्षेत्रफळाची एक आयताकृती खोली तयार केली आहे, त्याला काचेचे घर वा ग्लासरूम म्हणता येईल. त्याच्या चार कडेच्या व वरची अशा पाच बाजू पारदर्शक म्हणजे काचेच्या आहेत. काचही साधीच वापरली आहे. मात्र यात काचेच्या दोन पातळ्या (लेअर) आहेत, त्या सिलिकॉनयुक्त घटकांनी जोडल्या आहेत. या दोन लेअरमध्ये नळ्यांच्या साह्याने पाणी सोडले जाते.

पाण्यासाठी प्लॅस्टिकचा बॅरेल आहे, त्यातून हे पाणी नळ्यांमधून वाहत राहते. काचांमध्ये निर्माण झालेली बाहेरील उष्णता या पाण्याद्वारे शोषली जाते. हे पाणी सतत वाहते असल्याने ते पुढे पुढे सरकत राहते. परिणामी उष्णतेचे नियंत्रण केले जाते. सुरवातीला वरील बाजू व त्यानंतर एकामागोमाग एक नळ्यांमधून हे पाणी वाहून अखेर आऊटलेट मधून बाहेर येते. हे पाणी संकलित करून पुन्हा वापरले जाऊ शकते. दिवसभरात सुमारे दोनशे लिटर पाणी प्रयोगातील क्षेत्रफळाच्या ग्लासरूमसाठी लागत असल्याचे कडू म्हणाले.
उष्णता पाण्याद्वारे सुलभ व सहजरीत्या नियंत्रित झाल्याने बाहेरील तापमानापेक्षा काचेच्या घरातील तापमान चार ते दहा अंश सेल्सिअसने कमी करणे यातून शक्‍य झाले आहे. तापमान मोजणीसाठी इलेक्‍ट्रॉनिक हीट सेन्सरसह थर्मामीटरचा वापरही नोंदणीसाठी (रीडिंग) कडू यांनी केला आहे. भाजीपाला पिकांच्या रोपांची वाढ त्यांनी या प्रयोगात करून त्याचे निरीक्षणही केले आहे. 

या उपकरणाचे मिळू शकणारे फायदे

1) इमारतींना उष्णतेपासून नैसर्गिकरीत्या संरक्षण मिळणार 
2) अतिउष्ण वा वाळवंटी प्रदेशात शेती उत्पादन वा पीकबदल शक्‍य 
3) ग्रीनहाऊसमधील तापमान नियंत्रित करण्यास वाव 
4) अर्बन वा टेरेस फार्मिंग करणे शक्‍य
विज्ञान खऱ्या अर्थाने लोकाभिमुख होऊ शकेल का, याची प्रचिती पाहण्यासाठी मोठ्या जिद्दीने अभ्यास व संशोधन सुरू केले. सध्या मी थोड्या क्षेत्रफळावरील ग्लासरूममध्ये प्रयोग केले आहेत. मात्र, माझ्या तंत्रज्ञानात अजून काही सुधारणा होऊ शकतात, त्यातून या तंत्राचा विकास अजूनही गरजेनुसार करता येईल, त्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चाचे व सुलभ तंत्र उपलब्ध होऊ शकते. 
आशिष कडू,
कडू यांनी आपल्या संशोधनाचा अहवालही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. शेगाव येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयानेही कडू यांच्या प्रयोगाचे परीक्षण करून त्याप्रमाणे अहवालही दिला आहे. 
महाविद्यालयाच्या यंत्र अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रा. एस. आर. वाघ यांनी त्यात असे म्हटले आहे की :
  • या उपकरणात तापमानाला रोधण्याचा गुणधर्म चांगला आहे, त्यामुळे तापमान किमान मर्यादेपर्यंत आणणे शक्‍य आहे.
  • पारदर्शक आणि कमी वजनाच्या घटकांचा (मटेरिअल) वापर करून हे उपकरण तयार करण्यात आले आहे.
  • माफक दरात हे उपकरण उपलब्ध होऊ शकते.
  • पर्यावरणाला ते प्रदूषणकारी नाही.
  • त्याच्या वापरासाठी कमीत कमी विजेची गरज भासते.
  • घरगुती तसेच औद्योगिक वापर यांच्यासोबत शेतीक्षेत्रातही त्याचा वापर उपयोगाचा ठरू शकतो
वाशीम येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागाने कडू यांनी विकसित केलेल्या उपकरणाची चाचणी घेतली आहे, त्यांनीही या उपकरणाचे निष्कर्ष समाधानकारक असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. 
या उपकरणाची क्षमता चांगली असून अत्यंत उष्ण तापमान रोखण्याच्या दृष्टीने ते कार्य करू शकते, असे त्यात म्हटले आहे. 

संपर्क : श्री. आशिष कडू : 9850416877

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate