অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

व्यवसायाला रुपेरी किनार

व्यवसायाला रुपेरी किनार

बंजारा समाज हा मुळातच भटका समाज म्हणून ओळखला जातो. उदरनिर्वाहासाठी गुरे पाळणे, मिळेल ते काम करणे असा त्यांचा दिनक्रम. पोटाची खळगी भरण्यासाठी अख्खे कुटुंबच बाहेरगावी जातात. ऊसतोडीसाठी सर्व कुटूंबच बैलगाडीने प्रवास करुन जेथे काम मिळेल त्यासाठीची धावपळ करतात. या समाजाला खरा आधार मिळाला तो बचतगटाच्या माध्यमातूनच. महिलांना बचतगटाच्या माध्यमातून घरबसल्या रोजगार मिळाल्याने त्या महिला आज निर्भयपणे, आत्मविश्वासाने आपल्या संसाराचा गाढा ओढत आहेत. त्यांचे जीवनमान उंचावल्याने त्या आर्थिकदृष्टया स्वावलंबी झाल्या आहेत.

उमरगा तालुक्यातील मुरुमपासून 5 किलोमीटर अंतरारवर वसलेला नाईकनगर हा तांडा. बंजारा समाजाची जेमतेम पाचशे लेाकवस्ती येथे आहे. याठिकाणीच लक्ष्मीबाई महिला स्वयंसहायता महिला बचतगटाची स्थापना सन 2005 मध्ये झाली. या बचतगटात 12 महिला सदस्य आहेत. बचतगटाच्या अध्यक्ष रमकाबाई गोपा राठोड तर सचिव म्हणून सुनिता भेदन राठोड काम पाहतात.
शिक्षणापासून दूर असल्याने हा समाज तसा मुख्य प्रवाहापासून दूरच राहिला होता. बचत गट चळवळीने मात्र या समाजाचे पर्यायाने महिलांचे आयुष्यच पुरे बदलून टाकले. एकेकाळी कामासाठी करावी लागणारी वणवण आणि ओढाताण आता थांबली आहे. आठवडाभर काम केल्यानंतर तुटपुंजी मजूरी मिळायची. कधी सकाळी उठून अर्धेपोटी कामाला जावे लागे. व्यवसायाचे कोणतेच साधन नव्हते.

बचत गटाने मात्र नवी उभारी दिली. सुरुवातीला व्यवसाय करतो म्हटले, तरी त्यासाठी भांडवल नव्हते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून महिलांनी गट स्थापून व्यवसाय / धंदयासाठी कर्जाचे प्रस्ताव सादर केले. बँक ऑफ हैद्राबादने या गटास सुरुवातीस 3 लाखाचे कर्जही मंजूर केले. वर्ल्ड व्हिजन ऑफ इंडिया या संस्थेने पुढाकार घेवून नाईकनगर येथे बचत गटातील महिलांना 15 दिवसाचे व्यवसायासाठी लागणारे कौशल्य शिकवले.

शिवणकलेचे संपूर्ण प्रशिक्षण दिले. शिवणकाम यशस्वीरित्या करणाऱ्या महिलांना 5 शिलाई मशिनही त्यांनी घेऊन दिली. तांड्यावर राहूनच ड्रेस बनविणे, पारंपरिक पोशाखावर डिझाईन, कलाकुसरीच्या माध्यमातून बंजारा समाजाच्या पारंपरिक पेहरावाची ओळख त्यांनी बाजारपेठेला करुन दिली. घरच्या घरी रोजगार मिळाल्याने मुलाबाळांकडे लक्ष देण्यास वेळ मिळू लागला. एकाच जागी बऱ्यापैकी स्थिर झाल्याने मुलांना शाळेची गोडी लागली. घरबसल्या काम मिळाल्याने कुटुंबास आर्थीक आधार मिळाला.

या प्रवासाबद्दल गटाच्या सचिव सुनिता राठोड सांगतात, या व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल आम्ही हैद्राबाद, विजापूर, सोलापूर आदि ठिकाणाहून आणतो. गटातील सर्व महिला बंजारा दागीने, घागरा चोळी, ओढणी, बेल्ट, किचन, कवाईन हार, घुंगट, पॅचलेस, बाजुबंद, चुंबळ, अंगुठी, लेडीस पर्स, दाराचे तोरण, वॉलपीस, बांगडया, ब्रेसलेट, पायल, मोबाईल कव्हर्स आदि कलात्मक साहित्य तयार करतात. महिला बंजारा ड्रेस घरबसल्या शिलाई करतात.

नवरात्र महोत्सव, तांडीया महोत्सव, होळी महोत्सव, लग्न सराईमध्ये वधुसाठी ड्रेस खरेदीसाठी व्यापारी अगदी पुणे, सोलापूर, मुंबई येथील डिझायनर आमच्याकडे येतात, असे त्या अभिमानाने सांगतात. एक ड्रेस 8 ते 15 हजार रुपयापर्यंत विक्री करतो. दरवर्षी ड्रेस विक्रीतून आमच्या गटास 15 ते 20 लाखाची विक्री होते. निव्वळ नफा म्हणून 3 ते 4 लाख रुपये उत्पन्न मिळते. प्रत्येक सभासदास वर्षाकाठी किमान 30 ते 35 हजार रुपयाची मिळकत होते.

समाजातील महिलांना घरबल्या रोजगार मिळाल्याने रोजी रोटीचा प्रश्न मिटला. बचतगटाच्या माध्यमातून समाजातील अनिष्ठ रुढी, परंपरा, अंधश्रध्दा, बालविवाह, हुंडाबंदी अशा गोष्टींना छेद दिला. गावात दारुबंदी केली. पाणी आडवा-पाणी जिरवा, स्त्रीभ्रृण हत्या, निर्मल गाव, हागणदारीमुक्त गाव अशा विविध समाजापयोगी उपक्रम राबविल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. महिला बचत गटांतील बेरोजगार महिलांना घरबसल्या काम मिळाले.

आपल्या सुप्त कलागुणांना वाव मिळाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर आहे. शासनाने महिला बचत गट बळकट करुन महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास बळ दिले. यापुढेही शासनाने असेच उपक्रम वारंवार राबविल्यास समाजातील महिलांच्या आर्थिक उत्पन्नात निश्चितच वाढ होईल. शिवाय समाजाचा विकास होईल, हे त्या आवर्जून सांगतात.

स्वत:च्या कष्टातून उत्पादीत केलेल्या वस्तूला मिळालेली बाजारपेठ पाहून आणि वस्तू विक्री झाल्याने कष्टाचे मोल झाल्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसते.


लेखक : एस. जी. शेळके, दूरमुद्रणचालक, जिमाका, उस्मानाबाद

स्त्रोत : महान्यूज

अंतिम सुधारित : 2/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate