पश्र्चिम घाट, सह्य पर्वत. भारतीय व्दिपकल्पाच्या पश्चिम भागातील एक पर्वतश्रेणी. दख्खनच्या पठाराच्या पश्र्चिम कडेवर उत्तर-दक्षिण पसरलेल्या या पर्वतश्रेणीमुळे अरबी समुद्र किनाऱ्यावरील किनारपट्टीचे मैदान दख्खनच्या पठारापासून अलग झाले आहे.
उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत अरबी समुद्राला समांतर अशी ही श्रेणी पसरली आहे. सह्याद्रीची उत्तर-दक्षिण लांबी सु. १,६०० किमी. असून सस. पासून सरासरी उंची सु. १,२०० मी. आहे. पर्वताचा पश्र्चिम उतार तीव्र तर पूर्वेकडे पठारी भागाकडील उतार तुलनेने मंद आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ व तमिळनाडू या राज्यांतील सु. ६०,००० चौ. किमी. क्षेत्र सह्याद्रीच्या श्रेण्यांनी व्यापले आहे. पर्वताचा सर्वाधिक विस्तार कर्नाटक राज्यात आहे.
सह्याद्री हा खऱ्या अर्थाने पर्वत नसून ती दख्खनच्या पठाराची विभंग कडा आहे. त्यामुळे सह्याद्रीपेक्षा पश्र्चिम घाट हीच संज्ञा अधिक उचित ठरते. याला सह्य पर्वत असेही म्हणतात. महाराष्ट्रात मात्र सह्याद्री हेच नाव प्रचलित आहे. सु. १५० द.ल. वर्षांपूर्वी गोंडवनभूमी या महाखंडाचे विभाजन झाले. त्यावेळी दख्खनच्या पठाराचेही विभाजन झाले असावे. त्यामुळे आजच्या पश्र्चिम किनारपट्टीला समांतर अशी विभंगरेषा निर्माण झाली असावी. या विभंगरेषेच्या पश्चिमेकडील भाग खाली खचल्यामुळे पठाराच्या पश्र्चिम कडेला उंची प्राप्त झाली असावी. भारतीय व्दिपकल्प पठाराची ही पश्र्चिम कडा म्हणजेच पश्र्चिम घाट होय.
ही क्रिया अचानक घडली नसून मंद गतीने घडली असावी. मिआमी विदयापीठातील भूभौतिकीविज्ञ बॅरन व हॅरिसन यांच्या सिद्धांतानुसार सु. १०० ते ८० द.ल. वर्षांपूर्वीच्या दरम्यान मादागास्करपासून विभंगून भारताचा पश्र्चिम किनारा अस्तित्वात आला असावा. या पश्र्चिम किनाऱ्याचे विभंजन होऊन पश्चिम घाट ह्या १,००० मी. उंचीच्या उभ्या कडयाची आकस्मिक निर्मिती झाली असावी. सुमारे ६५ द.ल. वर्षांपूर्वी प्रचंड प्रमाणात भेगी प्रकारचे ज्वालामुखी उद्रेक होऊन दक्षिण ट्रॅप (डेक्कन ट्रॅप) ची निर्मिती झाली असावी. लाव्हारसापासून निर्माण झालेल्या बेसाल्ट खडकाचे विस्तृत व जाड थर असलेल्या या प्रदेशाने मध्य भारताचा फार मोठा भाग व्यापला आहे.
अशा ज्वालामुखी उद्रेकामुळे झालेल्या संचयनातून पश्र्चिम घाट प्रदेशाची ही भूरचना बनलेली आहे. पश्र्चिम घाटातील अशा बेसाल्ट खडकाच्या खालील खडकांचे थर सु. २०० द.ल. वर्षांपूर्वीचे जुने असावेत. पश्र्चिम घाटाचा उत्तरेकडील गोव्यापर्यंतचा भाग प्रामुख्याने बेसाल्ट खडकांपासून तर त्याच्या दक्षिणेकडील विभाग गॅनाइट व पट्टिताश्म खडकांपासून बनलेला आहे. भूकवचात बेसाल्ट खडकाचे थर साधारण ३ किमी. खोलीपर्यंत आढळतात. चर्नोकाइट, खोंडेलाइट, लेप्टिनाइट, रूपांतरित पट्टिताश्म, स्फटिकमय चुनखडक, लोहखनिज, डोलेराइट व अॅनॉर्थाइट हे खडकही या भागात आढळतात. दक्षिणेकडील टेकडयांमध्ये अवशिष्ट जांभा खडक व बॉक्साइट खनिज आढळते.
सह्याद्रीचे उत्तर सह्याद्री व दक्षिण सह्याद्री असे दोन भाग पडतात. उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेस निलगिरी पर्वत पुंजापर्यंतची श्रेणी उत्तर सह्याद्री व तेथून प्रामुख्याने पालघाट खिंडीपासूनची (खंड) दक्षिणेकडील पर्वतश्रेणी दक्षिण सह्याद्री म्हणून ओळखली जाते. पालघाट खिंडीमुळे सह्यादीची सलगता खंडित झाली आहे. उत्तर सह्याद्रीचा बराचसा भाग महाराष्ट्र राज्यात येतो. महाराष्ट्रातील या पर्वतश्रेणीमुळे कोकण व देश (पश्र्चिम महाराष्ट्र) हे दोन स्वाभाविक विभाग अलग झाले आहेत.
पर्वताचा पश्चिम उतार तीव्र असून तेथे लाव्हा खडकाच्या थरांचे काळे व उघडे कडे सर्वत्र दिसतात. पश्चिम उतारावर नदयांनी खोल दऱ्या निर्माण केल्या आहेत. याच उताराच्या पायथ्यालगत कोकणची किनारपट्टी आहे. पूर्वेकडील उतार मात्र बराच मंद असून तो पूर्वेकडील पठारात विलीन झालेला दिसतो. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून पूर्व किंवा आग्नेय दिशेकडे अनेक फाटे गेलेले आहेत. उत्तरेकडून दक्षिणेकडे अनुक्रमे सातमाळा-अजिंठा, हरिश्चंद्रगड-बालाघाट व महादेव डोंगररांगा हे प्रमुख फाटे आहेत. पठारावरील नदयांचे हे दुय्यम जलविभाजक आहेत. महाराष्ट्रातील सह्याद्रीची उंची सामान्यपणे ९१५ ते १,२२० मी. असून उत्तरेकडे ती अधिक तर दक्षिणेकडे कमी आढळते.
सह्याद्रीत काही ठिकाणी सपाट माथ्याचे, पठारासारखे भाग आढळतात, त्यांना घाटमाथा असे म्हणतात. येथपासून कोकण व देश यांना जोडणारे अनेक घाट सुरू होत असल्याने त्यांना ‘ घाटमाथा ’ असे संबोधले जात असावे. थळ घाट, अणेमाळशेज, बोर घाट, वरंधा, आंबेनळी (पार), कुंभार्ली, आंबा, फोंडा, बावडा, आंबोली इ. घाटांना देश व कोकण यांदरम्यानच्या वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टीने पूर्वीपासून विशेष महत्त्व आहे. सह्याद्री पर्वतश्रेणी बरीचशी सलग असली, तरी तिच्यात अधूनमधून अशा खिंडी व घाट आहेत.
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर भीमाशंकर, माथेरान, महाबळेश्वर, पाचगणी यांसारखी गिरिस्थाने वसली आहेत. कळसूबाई (१,६४६ मी.) हे महाराष्ट्रातील तसेच उत्तर सह्याद्रीतील सर्वोच्च शिखर आहे. त्याशिवाय साल्हेर (१,५६७ मी.), हरिश्चंद्रगड (१,४२४ मी.), सप्तशृंगी (१,४१६ मी.), त्र्यंबकेश्वर (१,३०४ मी.) ही इतर महत्त्वाची उंच ठिकाणे आहेत. सह्याद्री व त्याच्या वेगवेगळ्या डोंगररांगांच्या माथ्यावर ऐतिहासिकदृष्टया अत्यंत महत्त्वाचे ठरलेले शिवनेरी, राजगड, रायगड, प्रतापगड, विशाळगड यांसारखे अनेक डोंगरी किल्ले आहेत. महाराष्ट्र व कर्नाटक यांदरम्यान गोवा खंड आहे. वाघेरी (१,०८५ मी.), सोंसोगड (१,१८६ मी.), मोरलेगड (१,०५४ मी.) ही गोव्यातील प्रमुख शिखरे आहेत.
सह्याद्रीच्या १६° उत्तर अक्षांश ते निलगिरी पर्वतापर्यंतच्या पर्वतीय प्रदेशाचा समावेश मध्य सह्याद्रीमध्ये करता येतो. यातील बराचसा भाग कर्नाटक राज्यात आहे. सह्याद्रीचा हा भाग अरबी समुद्राच्या अगदी जवळ आहे. हा प्रदेश ओबडधोबड स्वरूपाचा असून घनदाट अरण्यांचा आहे. कर्नाटकातील सह्याद्रीची सरासरी उंची सु. ६०० ते १,००० मी. आहे. याचा पश्चिम उतार खडया चढणीचा व तुटलेल्या कडयांचा असून पूर्वेकडे गेलेले त्याचे फाटे म्हणजे अवशिष्ट पर्वताच्या रांगा आहेत.
म्हैसूरच्या आग्नेयीस बिलीगिरीरंजन श्रेणी असून ती शेवररॉय ( सेर्व्हरायन ) श्रेणीला मिळते. सह्याद्रीच्या येथील प्रमुख श्रेणीस काही स्थानिक नावे प्रचलित आहेत. पुष्पगिरी (१,७१४ मी.), ब्रह्मगिरी, व्हावूल माला (२,३३९मी.) ही येथील महत्त्वाची शिखरे आहेत. उंची व निसर्गसौंदर्य यांसाठी बाबा बुढण डोंगर (१,९२३ मी.), मल्लिआनिगिरी, कुद्रेमुख (१,८९४ मी.) प्रसिद्ध आहेत. नंदी व केमेनगुडी ही गिरीस्थाने आहेत. देवीमने, अगुंबे, शिराडी, चारमाडी इ. घाटमार्गांनी पठारी भाग किनारपट्टीशी जोडला गेला आहे. शरावती नदीवरील गिरसप्पा ( जोग ) धबधबा सह्याद्रीच्या याच भागात आहे.
तमिळनाडूच्या पश्चिम सीमेवर निलगिरी पर्वताचा अत्यंत जटिल असा प्रदेश आहे. निलगिरी पर्वतात उत्तर सह्याद्री, दक्षिण सह्याद्री व पूर्वघाट एकत्र येतात. या पर्वताची उंची २,००० मी.पेक्षा जास्त आहे. यातच दोडाबेट्टा (२,६३७ मी.) हे निलगिरीतील सर्वोच्च शिखर तर माकूर्ती (२,५५४ मी.) हे दुसरे प्रमुख शिखर आहे. ऊटकमंड हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण निलगिरी पर्वतातच आहे. निलगिरीच्या बहुतेक सर्व सीमा नैसर्गिक रीत्या भंग झालेल्या कडयांच्या आहेत.
पालघाट खिंडीमुळे पश्चिम घाटाची सलगता भंग पावली आहे. पालघाट खिंडीची रूंदी २४ किमी. व सस.पासून उंची ३०० मी. असून ही दोन समांतर विभंगांमधील खचदरी असावी. पालघाट खिंडीच्या दक्षिणेकडील सह्याद्रीचे पूर्व व पश्चिम हे दोन्ही उतार तीव्र व ओबडधोबड बनले आहेत. अन्नमलई ही दक्षिण सह्याद्रीतील प्रमुख पर्वतश्रेणी असून त्या श्रेणीतच अनाईमुडी (२,६९५ मी.) हे दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर आहे.
अनाईमुडी या शृंगबिंदूपासून उत्तरेस अन्नमलई ( उंची १,८०० ते २,००० मी.), ईशान्येस पलनी (९०० ते १,२०० मी.) व दक्षिणेस कार्डमम् (एलाचल) अशा तिन्ही दिशांना तीन डोंगररांगा-टेकडया गेलेल्या आहेत. कोडईकानल (२,१३५ मी.) हे प्रसिद्ध गिरिस्थान पलनी टेकडयांमध्ये आहे.
चेंबरा (२,१०० मी.), बांसुरा (२,०७३ मी.), वेल्लरीमाला (२,२०० मी.) व अगस्त्यमलई (१,८६८ मी.), महेंद्रगिरी ही केरळमधील प्रमुख शिखरे व मुन्नार, पानेमुडी, वेनाड ही थंड हवेची ठिकाणे आहेत. केरळ व तमिळनाडू यांदरम्यानच्या वाहतुकीच्या दृष्टीने शेनकोटा खिंड विशेष महत्त्वाची असून या खिंडीच्या दक्षिणेस असलेल्या महेंद्रगिरीने (१,६५४ मी.) दक्षिण सह्याद्रीचा शेवट झालेला आहे.
पश्र्चिम घाट व अरबी समुद्र यांदरम्यान अरूंद असे किनारपट्टीचे मैदान आहे. उत्तरेकडील प्रामुख्याने महाराष्ट्रातील किनारपट्टीला कोकण तर साधारणत: गोव्याच्या दक्षिणेकडील किनारपट्टीस मलबारचा किनारा असे म्हटले जाते. पश्र्चिम घाटाच्या पूर्वेकडील पायथ्यालगतच्या प्रदेशाला महाराष्ट्रात ‘ देश ’ तर कर्नाटकातील या प्रदेशास ‘ मलनाड ’ असे संबोधले जाते.
भारतातील प्रमुख तीन जलविभाजकांपैकी पश्र्चिम घाट हा एक असून बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या पूर्ववाहिनी व अरबी समुद्राला मिळणाऱ्या पश्चिम वाहिनी नदयांचा तो प्रमुख जलविभाजक आहे. तापी व नर्मदा या नदयांचा अपवाद वगळता भारतीय व्दिपकल्पावरून वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या बहुतेक सर्वच प्रमुख पूर्ववाहिनी नदया सह्याद्रीच्या घाटमाथा प्रदेशात उगम पावतात. ही उगमस्थाने अरबी समुद्र किनाऱ्यापासून केवळ ५० ते ८० किमी.वर आहेत.
सह्याद्रीत उगम पावणाऱ्या पूर्ववाहिनी नदयांमध्ये गोदावरी, भीमा, कृष्णा, कावेरी या प्रमुख नदया आहेत. याशिवाय इतर असंख्य पूर्ववाहिनी नदया सह्याद्रीच्या रांगांमध्ये तसेच त्यांच्या फाटयांमध्ये उगम पावून मुख्य नदयांना जाऊन मिळतात. सह्याद्रीचे पूर्वेकडे गेलेले फाटे दुय्यम जलविभाजक आहेत. महाराष्ट्र राज्यातून वाहणाऱ्या पांझरा, गिरणा, कादवा, दारणा, प्रवरा, मुळा, घोडनदी, नीरा, कोयना, वारणा, पंचगंगा इ. उपनदयांचा उगमही सह्याद्रीतच होतो.
कर्नाटक राज्यातून वाहणाऱ्या घटप्रभा, मलप्रभा, तुंगभद्रा या कृष्णेच्या प्रमुख उपनदयांचा उगम सह्याद्रीमध्येच आहे. घटप्रभेवरील गोकाकजवळील धबधबा सौंदर्य आणि विदयुत् निर्मितीकरिता प्रसिद्ध आहे. कावेरी नदीचा उगम कर्नाटक राज्यात पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी टेकडयांमध्ये तळकावेरी येथे झालेला आहे. शिम्शा, हेमवती, कब्बनी, भवानी या उपनदया सह्याद्रीत उगम पावतात. तमिळनाडू राज्यातून पूर्वेकडे वाहणाऱ्या वैगई, चित्तार व तामपर्णी या नदयांचे उगमही पश्र्चिम घाटातच आहेत.
पश्र्चिम घाटात उगम पावणाऱ्या आणि पश्चिम किनारपट्टीवरून थोडेच अंतर वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळणाऱ्या असंख्य पश्चिम वाहिनी नदया आहेत. पश्चिम वाहिनी नदया संख्येने बऱ्याच असल्या तरी प्रत्येकीचे खोरे तीव्र उताराचे पण मर्यादित आहे. पश्चिम किनारपट्टी अरूंद असल्याने येथील नदया लांबीने खूपच कमी आहेत. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरून वाहणाऱ्या दमणगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, उल्हास, कुंडलिका, काळ, सावित्री, वाशिष्ठी, शास्त्री, तेरेखोल या प्रमुख नदया आहेत. गोव्यातील यापोरा, मांडवी, जुवारी, कर्नाटकातील काळी, गंगावळी, शरावती, बेडती, ताद्री व नेत्रावती तर केरळमधील बेपोर, पोन्नानी, चलाकुडी, पेरियार, कल्लदा या मुख्य पश्र्चिम वाहिनी नदया आहेत. यांपैकी पेरियार ही सर्वांत लांब (२२४ किमी.) नदी आहे.
सह्याद्रीची प्रपाती भूरचना असल्यामुळे तीव्र उतारावरून वेगाने वाहताना अनेक नदया कडयांवरून खाली कोसळत असतात. त्यामुळे त्यांच्या मार्गात अनेक प्रेक्षणीय धबधबे निर्माण झाले आहेत. उदा., कर्नाटकात शरावती नदीवरील जगप्रसिद्ध गिरसप्पा ( जोग ) धबधबा ( उंची २५३ मी.) आणि कावेरी नदीवरील प्रसिद्ध शिवसमुद्रम् धबधबा (९७ मी.). तीव्र उतारावरून वेगाने वाहणाऱ्या नदयांमुळे पश्र्चिम घाटात जलविद्युत् निर्मिती प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने अनेक आदर्श ठिकाणे आढळतात. संपूर्ण घाट परिसरात सु. ५० मोठी धरणे बांधण्यात आली आहेत. महाराष्ट्रात खोपोली येथे १९०० मध्ये बांधलेले धरण हे पश्चिम घाटातील सर्वांत आधीचे धरण आहे. जलविदयुत् निर्मितीच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोयना, कर्नाटकातील तुंगभद्रा, लिंगनमक्की, केरळमधील पेरांबीकुलम् ही धरणे विशेष महत्त्वाची आहेत. गिरसप्पा व शिवसमुद्रम् हे धबधबेही त्यादृष्टीने महत्त्वाचे आहेत.
समुद्रसपाटीपासूनची उंची व समुद्रकिनाऱ्यापासूनचे अंतर यांनुसार पश्र्चिम घाटातील हवामानात तफावत आढळते. सामान्यपणे या भागातील हवामान आर्द्र व उष्णकटिबंधीय असून किनाऱ्याजवळ ते सौम्य स्वरूपाचे आढळते. उत्तरेकडील भागात १,५०० मी. उंचीपेक्षा अधिक तर दक्षिण भागात २,००० मी.पेक्षा अधिक उंचीच्या प्रदेशातील हवामान समशीतोष्ण कटिबंधीय प्रकारचे असते. आल्हाददायक हवामानामुळे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर अनेक थंड हवेची ठिकाणे निर्माण झाली आहेत. दक्षिण भागातील वार्षिक सरासरी तापमान २०° से. तर उत्तर भागात २४° से.च्या दरम्यान असते. हिवाळ्यात काही ठिकाणी तापमान गोठणबिंदूपर्यंत खाली जाते.
बाष्पयुक्त नैऋर्त्य मोसमी वाऱ्यांच्या मार्गात पश्र्चिम घाट येत असल्यामुळे त्या संपूर्ण प्रदेशात विशेषत: घाटमाथा आणि पश्र्चिम उतारावर प्रतिरोध प्रकारचा भरपूर पाऊस पडतो. या भागात घनदाट वने असल्यामुळे सांद्रीभवनास अनुकूल परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे पावसाचे प्रमाण अधिक आहे. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ३०० ते ४०० सेंमी. असून काही ठिकाणी ते ९०० सेंमी.पर्यंत आहे. महाराष्ट्रात घाटमाथ्यावर असलेल्या महाबळेश्वर येथे वार्षिक सरासरी पर्जन्यमान सु. ६२५ सेंमी. आहे. पश्र्चिम घाटाच्या पूर्वेकडील उतार मात्र पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत असल्याने तेथे पर्जन्यमान कमी कमी होत गेलेले आहे. दक्षिणेकडील पश्चिम घाट प्रदेशात पावसाळा दीर्घकाळ असतो.
पश्र्चिम घाट प्रदेशातील पर्जन्याच्या वितरणातील भिन्नतेनुसार विभिन्न प्रकारच्या वनस्पती आढळतात. २०० सेंमी.पेक्षा अधिक पर्जन्यमान असलेल्या पश्र्चिम घाटाच्या पश्र्चिम बाजूवर उष्णकटिबंधीय आर्द्र सदाहरित किंवा वर्षारण्ये, १५० ते २०० सेंमी. पर्जन्यमान असणाऱ्या पश्चिम घाटाच्या पश्र्चिम बाजूस प्रामुख्याने आर्द्र, सदाहरित अरण्यांच्या पश्र्चिमेस उष्णकटिबंधीय निम-सदाहरित वने, १०० ते १५० सेंमी. पर्जन्यमान असणाऱ्या पूर्व उतारावर सदाहरित अरण्यांच्या पूर्वेस उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने, तर पूर्वेकडील पायथ्यालगतच्या ७५ ते १२५ सेंमी. पर्जन्यमान असणाऱ्या प्रदेशात उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने आढळतात.
सस.पासून सु. ९०० ते १,८०० मी. उंचीच्या घाट प्रदेशात प्रामुख्याने महाबळेश्वर, निलगिरी व पलनी टेकडयांच्या परिसरात उपोष्ण कटिबंधीय रूंदपर्णी वने असून १,८०० मी.पेक्षा अधिक उंचीच्या प्रदेशात, प्रामुख्याने तमिळनाडू व केरळमधील पर्वतीय प्रदेशात, आर्द्र समशीतोष्ण कटिबंधीय वने आढळतात. केरळमधील सदाहरित वायनाड अरण्याचा प्रदेश म्हणजे उत्तरेकडील व दक्षिणेकडील घाट प्रदेशाचा संक्रमण भाग आहे.
दक्षिणेकडील भाग आर्द्र असल्याने तेथे वनस्पतींच्या असंख्य जाती आढळतात. केरळमध्ये या प्रदेशात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने तेथे दाट अरण्ये आहेत. ‘ सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान ’ हा भारतातील अतिशय महत्त्वाचा, विषुववृत्तीय सदाहरित अरण्यांचा प्रदेश आहे. वृक्षतोडीमुळे उघडया पडलेल्या प्रदेशात गवताळ प्रदेशांची निर्मिती झालेली दिसते. मुख्यत: कर्नाटकातील पश्र्चिम घाट प्रदेश व निलगिरी पर्वतीय प्रदेशात असे विस्तृत गवताळ प्रदेश आहेत.
पूर्वी पश्र्चिम घाट प्रदेशात घनदाट अरण्ये होती. जंगलात राहणाऱ्या आदिवासी जमातींना उदरनिर्वाहासाठी पुरेशा प्रमाणात फळे, कंदमुळे इ. सहज उपलब्ध होत असत. प्रदेशाच्या दुर्गमतेमुळे सखल भागातील लोकांना अशा अरण्यमय भागात येऊन शेती करणे किंवा वसाहती स्थापन करणे शक्य नव्हते. त्यामुळे जंगले सुरक्षित होती. परंतु ब्रिटिशांचे आगमन झाल्यानंतर प्रामुख्याने मळ्यांच्या लागवडीसाठी व त्यानंतर इतर कारणांसाठी मोठया प्रमाणावर जंगलतोड केली गेली.
पारिस्थितीकीयदृष्टया पश्र्चिम घाटाला विशेष महत्त्व आहे. जैवविविधतेच्या दृष्टीने हा संपूर्ण परिसर अतिशय समृद्ध आहे. अनेक जातींचे प्राणी, पक्षी व असंख्य प्रकारच्या वनस्पती येथे आढळतात. जगातील समृद्ध जैवविविधता असलेल्या प्रदेशात पश्चिम घाटाचा आठवा क्रमांक लागतो. पारिस्थितीकी वैज्ञानिक नॉर्मन मेअर्स यांच्या प्रयत्नांमुळे १९८८ मध्ये पश्र्चिम घाट परिसर पारिस्थितीकीयदृष्टया अतिसंवेदनशील प्रदेश म्हणून घोषित करण्यात आला.
भारताच्या क्षेत्रफळाच्या केवळ ५% भूमी या प्रदेशाने व्यापली असली तरी भारतातील उच्च दर्जाच्या २७% वनस्पती ( सु. ४,००० ते १५,००० जाती ) येथे आढळतात. त्यांपैकी १,८०० जातींच्या वनस्पती केवळ याच प्रदेशात पाहावयास मिळतात. त्यामुळे या वनस्पती म्हणजे या प्रदेशाची वैशिष्टये बनली आहेत. सुमारे पाच हजारांवर फुलझाडांच्या जाती पश्र्चिम घाट परिसरात असून त्यांपैकी सु. १,६०० फुलझाडांचे प्रकार जगात कोठेही आढळत नाहीत.
पश्र्चिम घाटातील पर्वतश्रेण्या म्हणजे असंख्य वन्य प्राण्यांची महत्त्वाची आश्रयस्थाने आहेत. या संपूर्ण परिसरात किमान १३९ सस्तन प्राण्यांच्या जाती, १७९ जल - स्थलचर ( उभयचर ) वर्गातील प्राण्यांच्या जाती व ५०८ पक्ष्यांच्या जाती आढळतात. त्यांपैकी सस्तन प्राण्यांच्या ७, उभयचर प्राण्यांच्या ८४ व पक्ष्यांच्या १६ जाती जगात अन्य कोठेही आढळत नाहीत. जगाच्या अन्य भागांतून नामशेष किंवा दुर्मिळ झालेल्या किमान ३२५ प्राण्यांच्या जाती येथे आढळतात. येथील मोठया ठिपक्यांचे जंगली कस्तुरी मांजर नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. येथे माकडांची संख्याही प्रचंड आहे. मोठया शेपटीच्या माकडांची संख्या सायलेंट व्हॅली व कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यानांत सर्वाधिक आहे. विविध जातींच्या गोगलगाई, सरपटणारे प्राणी, वटवाघुळे, फुलपाखरे यांची संख्या प्रचंड आहे. एकटया केरळमधील पश्चिम घाट परिसरात सु. ६,००० जातींचे कीटक आहेत. फुलपाखरांचे ३३४ प्रकार येथे आढळतात. येथील प्रवाहांमधून विविधरंगी मासे पाहावयास मिळतात.
निलगिरी पर्वतीय प्रदेशात हत्ती, गवा, हरिण, चित्ता, अस्वल, सांबर, रानडुक्कर, वाघ इ. पाणी आढळतात. त्यांच्यासाठी मदुमलाई येथे अभयारण्य राखून ठेवलेले आहे. निलगिरी पर्वतात हत्तींची संख्या सर्वाधिक आहे; तसेच बह्मगिरी व पुष्पगिरी वन्यप्राणी अभयारण्ये, बनेरघट्टा राष्ट्रीय उद्यान व अन्नेकल राखीव जंगलात हत्तींची संख्या पुष्कळ आहे.
कर्नाटकातील पश्चिम घाट प्रदेशात सु. सहा हजारांवर हत्ती व देशातील १०% दुर्मिळ जातींचे वाघ आहेत ( सन २००४). देशातील सुंदरबन व्यतिरिक्त वाघांची संख्या अधिक असणारा पश्चिम घाटातील सलग अरण्यांचा प्रदेश कर्नाटक, तमिळनाडू व केरळमध्ये पसरला आहे. पश्चिम घाटात गवे मोठया प्रमाणात आढळतात. कर्नाटकातील बंदीपूर राष्ट्रीय अभयारण्य व नागरहोळे या दोन प्रदेशांत सु. पाच हजारांवर गवे आहेत. महाराष्ट्रात दाजीपूर अभयारण्य गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. निलगिरी लंगूर मोठया संख्येने कोडगू जंगलात आढळतात. भारतीय मंटजॅक हरणे भद्रा वन्यप्राणी अभयारण्यात तसेच चिकमगळूरच्या राखीव व्याघ प्रकल्प प्रदेशात मोठया संख्येने आहेत.
ब्राझीलमधील रिओ दे जानेरो येथे झालेल्या ‘ जागतिक वसुंधरा ’ परिषदेमध्ये (१९९२) पश्र्चिम घाटाची गणना जगातील अठरा अतिसंवेदनशील ( हॉटस्पॉट ) अशा पर्यावरणीय क्षेत्रांमध्ये करण्यात आली आहे. भारत सरकारने येथील जैवविविधतेचे जतन व संवर्धन करण्यासाठी अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. त्यादृष्टीने दोन जीवावरणीय राखीव प्रदेश, १३ राष्ट्रीय उद्याने, अनेक वन्यप्राणी अभयारण्ये व राखीव जंगलांची घोषणा केली आहे.
निलगिरी जीवावरणीय राखीव प्रदेशाने सु. ५,५०० चौ. किमी. क्षेत्र व्यापले असून त्यात कर्नाटकातील नागरहोळे सदाहरित वने, पानझडी वनांची बंदीपूर व नुगू राष्ट्रीय उद्याने, केरळ व तमिळनाडूमधील वायनाड व मदुमलाई राष्ट्रीय उद्याने, हे पश्र्चिम घाटातील संरक्षित जंगलमय प्रदेश आहेत. पश्चिम घाटाचा संरक्षित ‘ वर्ल्ड हेरिटेज साइट ’मध्ये समावेश करावा अशी मागणी भारत सरकारने २००६ मध्ये ‘युनेस्को मॅब ’कडे केली आहे. अशा स्थळांमध्ये पुढीलप्रमाणे सात प्रमुख विभागांचा व त्यांतील वेगवेगळ्या उपविभागांचा समावेश असेल :
(१) अगस्त्यमलई विभाग : यात पुढील पाच उपविभागांचा समावेश असेल : तमिळनाडूमधील अगस्त्यमलई जीवावरणीय राखीव प्रदेश ( क्षेत्र ९०० चौ. किमी.); कालकाड मुदननुराई व्याघ राखीव प्रदेश (८०६ चौ. किमी.); केरळमधील नेय्यर, पेप्परा व शेंदूर्णे वन्यजीव अभयारण्य; त्यालगतचे आचेनकोइल, थेनमाला, कोन्नी, पुनालूर, तिरूअनंतपुरम् विभाग आणि अगस्त्य वनम् विशेष विभाग.
(२) पेरियार विभाग : यामध्ये सहा उपविभागांचा समावेश असेल : केरळमधील पेरियार राष्ट्रीय उद्यान व निसर्ग राखीव प्रदेश (७७७ चौ. किमी.), रन्नी, कोन्नी व आचनकोइल अरण्य विभाग. पूर्वेकडील पर्जन्यछायेच्या प्रदेशातील प्रामुख्याने शुष्क अरण्यमय प्रदेशातील श्रीविल्लिपुत्तूर वन्यजीव अभयारण्य आणि तिरूनेलवेली अरण्य विभागातील राखीव जंगलांचा प्रदेश.
(३) अन्नमलई विभाग : यात सात उपविभागांचा अंतर्भाव असेल : तमिळनाडूमधील चिन्नर वन्यजीव अभयारण्य, एर्नाकुलम् राष्ट्रीय उद्यान (९० चौ. किमी.), विस्तीर्ण अशा इंदिरा गांधी वन्यजीव अभयारण्य प्रदेशात (९५८ चौ. किमी.) समाविष्ट असणारी इंदिरा गांधी गास हिल्स व करिअन शोला राष्ट्रीय उद्याने, पलनी हिल्स राष्ट्रीय उद्यान (७३७ चौ. किमी.), केरळमधील पेरांबीकुलम् वन्यजीव अभयारण्य (२८५ चौ. किमी.).
(४) निलगिरी विभाग : हा विभाग सु. ६,००० चौ. किमी.पेक्षाही अधिक क्षेत्रात विस्तारला आहे. यात सहा उपविभाग समाविष्ट असतील : केरळमधील निलगिरी जीवावरणीय राखीव प्रदेश आणि करिम्पुझा राष्ट्रीय उद्यान (२३० चौ. किमी.), सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान (९० चौ. किमी.), वायनाड वन्यजीव अभयारण्य (३४४ चौ. किमी.), तमिळनाडूमधील बंदीपूर (८७४ चौ. किमी.), माकूर्ती (७८ चौ. किमी.) व मदुमलाई (३२१ चौ. किमी.) ही राष्ट्रीय उद्याने व न्यू अमरम्बलम् राखीव जंगल. हा विभाग अतिशय जटिल, सुरक्षित व जगातील एक वैशिष्टयपूर्ण अरण्यमय प्रदेश आहे. आशियाई हत्ती, वाघ, गवा व इतर अनेक दुर्मिळ प्राण्यांचे हे आश्रयस्थान आहे.
(५) तळकावेरी विभाग : यात सहा उपविभाग आहेत. कर्नाटकातील बह्मगिरी (१८१ चौ. किमी.), पुष्पगिरी (९३ चौ. किमी.) व तळकावेरी (१०५ चौ. किमी.) ही वन्यजीव अभयारण्ये, राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान ( नागरहोळे ३२१ चौ. किमी.) आणि केरळमधील अलाराम राखीव जंगल.
(६) कुद्रेमुख विभाग : यामध्ये कर्नाटकातील पाच उपविभाग येतात. कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान(६०० चौ. किमी.), सोमेश्र्वर वन्यजीव अभयारण्य व सभोवतालची सोमेश्वर, अगुंबे व बाळहळ्ळी राखीव जंगले.
(७) सह्याद्री विभाग : यात महाराष्ट्रातील चार उपविभाग येतात. आन्शीप (३४० चौ. किमी.) व चांदोली (३१८ चौ. किमी.) ही राष्ट्रीय उद्याने. कोयना व राधानगरी ही वन्यजीव अभयारण्ये.
सह्याद्री हा जैवविविधतेचा एक खजिना आहे. तेथील सु. २,००० जातींच्या वनस्पतींचा औषधांसाठी वापर केला जातो. ‘बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी ’ने केलेल्या एका अभ्यासानुसार महाराष्ट्र राज्यातील सह्याद्री प्रदेशात देवदेवतांच्या नावाने श्रद्धेने संरक्षित केलेल्या वनविभागांत १,६०० पेक्षा जास्त ‘देवराया ’ आहेत. सह्याद्रीमध्ये अनेक राष्ट्रीय उद्याने, वन्यप्राणी, अभयारण्ये, राखीव व संरक्षित वने निर्माण करणे शक्य झाले आहे. येथील पर्यटनाची अनेक ठिकाणे आर्थिक क्षेत्रे असल्याने पश्र्चिम घाट विकसित होत आहे.
सह्याद्रीमुळे पश्चिम किनारपट्टीवर पर्जन्यवृष्टी होते. त्यामुळे नदयांच्या खोऱ्यांत जलविद्युत्निर्मिती प्रकल्पांची निर्मिती सुलभ झाली आहे. येथील जंगलांतून लाकूड व इतर अनेक वनोत्पादने तसेच दक्षिण सह्याद्रीतून चहा, कॉफी, रबर, मसाल्याचे पदार्थ इ. उत्पादने मिळतात. वाहतूक व व्यापाराच्या दृष्टीने पश्र्चिम घाटातील खिंडी व घाट महत्त्वाचे ठरले आहेत. अनेक कवींनी व लेखकांनी सह्याद्रीचे सौंदर्य वर्णिले आहे.
लेखक - वसंत चौधरी
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/28/2020
खांगाई : मंगोलिया प्रजासत्ताकाच्या पश्चिममध्य भागा...
चलेन : नॉर्वे व स्वीडन यांच्या सीमेवरील पर्वतश्रेण...
कॉकेशस : यूरोप व आशिया खंडांमधील पारंपारिक नैसर्गि...
अॅपालॅचिअन पर्वत : उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनार्...