অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

त्र्यंबकेश्वर

वेशीवरच्या पाऊलखुणा : त्र्यंबकेश्वर

अद् भुत त्र्यंबकेश्वर !

सह्याद्रीचा एक मानबिंदू असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीत त्र्यंबकेश्वर वसले आहे.देशभरातील बारा ज्योत‌िर्लिंगांपैकी एक आणि भारतातील प्रमुख व प्राचीन तीर्थक्षेत्रांमध्ये त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राची गणना होते. दक्षिण गंगा म्हणून ओळख असलेल्या गोदावरीचे हे मूलस्थान, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या चार पवित्र स्थानांपैकी एक तीर्थक्षेत्र, नाथ पंथीयांचे पवित्रस्थान, निवृत्तीनाथांच्या संजीवन समाधीचे स्थान म्हणजे त्र्यंबक. एवढेच नाही तर त्र्यंबकेश्वर ऐतिहासिक बालेकिल्ला म्हणूनही ओळखला जातो. त्र्यंबकेश्वर खऱ्या अर्थाने बहरले ते छत्रपती शिवाजी महाराज व पेशवाईच्या काळात. स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी उठावांमुळेही हे गाव सर्वांच्या लक्षात रहाते. चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके व स्वातंत्र्यकवी गोविंद यांचे गाव म्हणूनही त्र्यंबकेश्वरची ख्याती आहे. त्यामुळेच त्र्यंबकेश्वर अद् भुत वाटते...

पेशवाईपूर्वीचे त्र्यंबकेश्वर

पेशवाईपूर्वी ‌त्र्यंबकेश्वर कसे होते याचे उत्तर पुराणांमधील विव‌िध अख्यायिकांमधून मिळते. साक्षात शिव शंकराचा येथे निवास असल्याचा उल्लेख पुराणांमध्ये आहे. याची साक्ष ब्रह्मगिरी पर्वत असल्याचेही म्हटले जाते. याच ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी आद्यज्योतर्लिंग त्र्यंबकेश्वराचे मंदिर आहे. आजचे भव्य मंदिर ही पेशवाईची देणगी आहे. नानासाहेब पेशव्यांनी या मंदिराची उभारणी केली. इ. स.१७५५ मध्ये मंदिराचे बांधकाम सुरू झाले ते १७८६ मध्ये सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात पूर्ण झाले. या पूर्वाभिमुखी मंदिराची रचना पंचदालनी आहे. पाच कळस असलेले अन् सुबक कलाकुसरींनी मढलेले हे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे. दिल्लीचा जामदारखाना जेव्हा पेशव्यांच्या हाती आला, तेव्हा मोगलांनी म्हैसूरमधून लुटलेला रत्नजडित मुकुट या जामदारखान्यात होता. पेशव्यांनी हा मुकुट त्र्यंबकेश्वरी आणून शिवाला अर्पण केला. दर सोमवारी त्र्यंबकेश्वराचा मुकुट कुशावर्त तीर्थावर मिरवणुकीने स्नानासाठी नेण्याची प्रथा आहे. मंदिराबाहेरील लाकडी रथ अन् पुरातन त्रिमूर्ती पहाण्यासारखी आहे. मंदिरातील पिंडीच्या शिवलिंगाच्या जागी असणाऱ्या खळग्यात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची बारा लिंगे असून, या पिंडीतून सतत गोदा वाहते. ही गोदा म्हणजे गौतम ऋषीच्या तपश्चर्येचे फळ होय. गोदावरी शंकराच्या जटेतून बाहेर येण्यास तयार नसल्याने शंकराने आपल्या जटा ब्रह्मगिरी पर्वतावर आपटल्याने गोदावरी प्रवाहित झाल्याची आख्यायिका आहे. आजही ब्रह्मगिरीवर याच्या खाणाखुणा पहायला मिळतात. दर्भाच्या कुशाने चौकोन रेखून गोदावरीला अडवले ते त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थ होय. कुशावर्त तीर्थचा मंडप असंख्य अप्रतिम मूर्तीनी सजविलेला आहे. तोही आवर्जून पाहण्यासारखा आहे. कश्यप ऋषींनी श्रीरामाला त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर जाऊन पितरांच्या मुक्तीसाठी श्राद्ध दिक कर्मे करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार श्रीरामाने इथे हे कर्म केले असाही उल्लेख स्कंद पुराणात आहे. मात्र याबाबत दोन मतप्रवाह आहेत.

सिंहस्थ

दर बारा वर्षांनी भरणारा सिंहस्थ त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थावर भरतो.नागा साधू हे त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे वैशिष्ट्य मानले जाते.त्र्यंबकेश्वरमध्ये आखाड्यांचे मठ व आश्रम आहेत. साधूमहंतांचा सहवास हे त्र्यंबकेश्वरचे वैभवच म्हटले पाहिजे. पापांतून मुक्ततेसाठी येथे अनेक विधी केले जातात. यासाठी नेहमीच देशविदेशातून भक्तांची मांदियाळी येथे पहायला मिळते. इ. स. तेराव्या शतकात ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत आपल्या मुलांना घेऊन त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी आले होते असेही म्हटले जाते. याभूमीला चक्रधरस्वामी, समर्थ रामदास, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताबाईंचा स्पर्श लाभला आहे. निवृत्तीनाथांच्या संजीवन समाधीमुळे त्र्यंबकेश्वरच्या स्थान माहात्म्यात आणखी भर पडली आहे. म्हणूनच वारकरी संप्रदायाचे ते श्रद्धास्थान म्हटले जाते.

इतिहास

छत्रपती शिवाजी महाराज बालपणी व नंतर सुरतेच्या स्वारी दरम्यान त्र्यंबकेश्वरी आल्याची नोंद मिळते. तीर्थोपाध्यायांचा वाद त्यांनी सोडविल्याची नोंदही मिळते. शिवकाळात व नंतर पेशवाईत त्र्यंबकेश्वरला स्थैर्य लाभले आणि उपजीविकेसाठी कोकण तसेच पश्चिम-दक्षिण महाराष्ट्रातून अनेक ब्राह्मण त्र्यंबकेश्वर व नाशिकला स्थिरावले. त्यामुळे त्र्यंबकेश्वरला ब्राह्मणांचे गाव असेही म्हटले जाते. श्रावणात त्र्यंबकेश्वराचे दर्शन आणि ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करण्याची परंपरा जुनी आहे. ब्रह्मगिरी, ब्रह्मगिरी-हरिहरगिरी व ब्रह्मगिरी-हरिहरगिरी-अंजनेरी असे प्रदक्षिणेचे तीन प्रकार आहेत. ब्रह्मगिरी हा सह्याद्रीच्या रांगेतील एक विशाल पर्वत अन् त्र्यंबकेश्वरची शान आहे. ब्रह्मगिरीतून वैतरणा, अहिल्या आणि गोदावरी या नद्यांचा उगम होतो.ब्रह्मगिरीवरचा त्र्यंबकगड हे त्या काळातील राजकीय घडामोडींचे केंद्र होते. इ. स.१२७१-१३०८ दरम्यान त्र्यंबकेश्वर गड आणि आजूबाजूच्या परिसरावर देवगिरीचा राजा रामचंद्र्रदेव यादव याच्या भावाची राजवट होती. मोगल इतिहासकार गडाचा उल्लेख नाशिक किल्ला असा करतात. पुढे बहामनी,अहमदनगरच्या निजामशहा त्यानंतर शहाजीराजे भोसले, छत्रपती शिवाजी महाराज, मोरोपंत पिंगळे यांच्या ताब्यात हा किल्ला होता. त्रिंबक सार्जी प्रभू यांनी हा गड जिंकून पेशवाईत दाखल केला. त्र्यंबकगड ताब्यात यावा म्हणून तिसरे पेशवे नानासाहेबांनी त्र्यंबकेश्वराला साकडे घातले होते. गड ताब्यात आल्यानंतर त्यांनी हा नवस फेडल्याची नोंद पेशवेकालीन कागदपत्रांमध्ये मिळते. पुढे पेशवाईच्या पतनानंतर हा गड ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. आज या गडाचे फक्त भग्नावशेष आढळतात. ब्रह्मगिरीच्या वाटेवर एक दगडी विश्रामगृह आवर्जुन पाहण्यासारखे आहे. हे फार कोणाच्या लक्षात येत नाही. पण दगडातील कोरीव कामाचा हा उत्कृष्ट नमुना आहे. इंग्रजांविरूद्धच्या बंडात त्र्यंबकेश्वरनेही वासुदेव भगवंत जोगळेकरांच्या पुढाकाराने मोठा लढा दिला. अखेर जोगळेकरांना त्र्यंबकमध्ये इंग्रजांनी फाशी दिली. यावरून त्र्यंबकेश्वरचा स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग स्पष्ट होतो. कवी गोविदांच्या स्वातंत्र्यकवितांनी तर सावकरकरांच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राण शिंपडले होते. मात्र आता कवी गोविंदांच्या आठवणीच फक्त पिंगा घालतात. त्र्यंबकेश्वरमध्ये कवी गोविंदांचे साधे स्मारकही दिसत नाही.

पेशवाईच्या काळात अनेक मातब्बर मंडळींनी त्र्यंबकेश्वरमधील मंदिरांचा, तीर्थांचा जीर्णोद्धार केला. त्र्यंबकेश्वरांचे मंदिर, कुशावर्ताजवळील केदारेश्वर मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, श्री गंगामंदिर, परशुराम मंदिर, श्रीराममंदिर, श्री लक्ष्मीनारायण मंदिर, ब्रह्म आणि सावित्रीचे दुर्मिळ मंदिरही त्र्यंबकेश्वरमध्ये पहायला मिळते. गंगासागर तलावाजवळ निवृत्तिनाथांचे मंदिर व समाधी सह असंख्य मंदिरे व त्र्यंबकेश्वरमध्ये अनेक तीर्थे आहेत. स्नान,दान, श्राद्ध करण्यासाठी कुशावर्त तीर्थ व इतरही असंख्य तीर्थे अत्यंत पवित्र स्थान मानले जातात. यात कनखळ तीर्थ, कंचन तीर्थ, गंगाद्वाराजवळ वराह तीर्थ, रामलक्ष्मण तीर्थ,बिल्व तीर्थ, प्रयाग तीर्थ, इंद्र तीर्थ, पल्लाळ तीर्थ, गंगालय इत्यादींचा समावेश होतो. मात्र या तीर्थांमध्ये भारताच्या चित्रपटसृष्टीला जन्म देणाऱ्या दादासाहेब फाळके नावाचे एकही तीर्थ त्र्यंबकेश्वरला भटकताना पहायला मिळत नाही. ज्या महापुरूषांची ख्याती त्र्यंबकेश्वर आपल्या उराशी मिरविते त्या चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके व स्वातंत्र्यकवी गोविंद यांचे स्मृतीस्थळ येथे नसावे हे पर्यटकांना चुकल्याचुकल्यासारखे वाटते. त्र्यंबकेश्वराचे आणि ब्रह्मगिरीचे नुकतेच समोर आलेले एक गुपित म्हणजे इतिहासकार म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतहून लुटलेल्या खजिन्याचा काही भाग त्र्यंबकेश्वर परिसरातील ब्रह्मगिरीवर लपविलेला आहे. याबाबत पुरातत्त्व विभागाने संशोधन करण्याची गरज आहे.

लेखक : रमेश पडवळ

rameshpadwal@gmail.com

contact no : 8380098107

अंतिम सुधारित : 7/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate