অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बंधुभावाचं ‘मूर्ति’मंत प्रतीक

बंधुभावाचं ‘मूर्ति’मंत प्रतीक

वैश्विक बंधुभावाची संकल्पना रुजवण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील मांगीतुंगी पर्वतावर जैनांचे पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांची अखंड पाषाणातील जगातील सर्वात उंच मूर्ती साकारण्यात आली आहे. १८ फेब्रुवारीला तिचा महामस्तिकाभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. यानिमित्ताने ही मूर्ती कसी साकारत गेली, त्याचा घेतलेला वेध…

मनुष्य हा सतत झेपावणारी स्वप्नं पाहणारा आहे, ज्याला स्वत:च्या उंचीपेक्षा मोठे काही तरी करून दाखविण्याची जिद्द असते. आपल्या डोळ्यासमोर अशी प्रतिमा हवी असते, की जी पाहिल्यावर लाखोंच्या जनसमुदायाला प्रेरणा मिळेल. अशा प्रतिमेला धर्माची, जातीची चौकट नसते म्हणूनच ती कुणाचाही अंर्तबाह्य कब्जा घेते. अशी भव्य प्रतिमा-शिल्प पाहताना ना धर्म आठवतो, ना जात, ना वंश! तिचा भव्याकारच मनाचा ठाव घेतो! म्हणूनच जगभरात सर्वाधिक उंच असलेल्या, अमेरिकेतील स्वातंत्र्य देवतेची स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ३०५ फूट (९३ मीटर, वजन २२५), नेपाळमधील ४५ मीटर (१४३ फूट) कैलासनाथ महादेवाची मूर्ती, बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील १०५ फूट उंच अशी हनुमानाची मूर्ती, या विलोभनीय मूर्ती माणसाच्या मनावर अधिराज्य गाजविताना दिसतात. येत्या काळात चीनमध्ये तयार होत असलेली माओची १२० फूट (३६.६ मीटर) विशालकाय मूर्ती व जगभरातील सर्वाधिक उंचीची व धातूमध्ये साकारली जात असलेली गुजरातमधील वल्लभभाई पटेल यांची ५९७ फूट (१८२ मीटर) मूर्ती म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी भक्ती-शक्तीचे प्रतीक बनताना दिसतील. यापुढेही जगभरात अनेक मूर्ती आपल्या भव्यतेतून नवनवे उच्चांक कदाचित मोडीत काढतील. पण आजही जगाला भुरळ घालते ती अफगाणिस्तानातील बामियानमधील अखंड दगडातील सहाव्या शतकात कोरलेली १७४ फूट उंच बुद्ध मूर्ती! सहाव्या शतकात अखंड दगडात कोरलेल्या १७४ व १२४ फूट उंचीच्या दोन बुद्धमूर्ती तालिबानने २००१ मध्ये सुरूंग लावून उद्धवस्त केल्या. या घटनेने सारे जग हळहळले. या बुद्ध मूर्तींनंतर जगभरातील सर्वात उंच व अखंड (एकाश्म) दगडात कोरलेल्या मूर्तीचा बहुमान श्रवण बेळगोळा येथील गोमटेश्वर बाहुबलीच्या मूर्तीला जातो. इ. स. ९८३ मध्ये राजा राजमल्ल यांनी उभारलेली ही मूर्ती ५८ फूट (१७.८ मीटर) उंच आहे. मात्र लवकरच हा बहुमान नाशिकमधील मांगीतुंगी येथील ऋषभदेवांच्या १०८ फूट उंच मूर्तीला मिळणार आहे. अर्थात या मूर्तीच्या निर्मितीचा प्रवास थक्क करणारा आहे.

जैन समाजाच्या सर्वोच्च साध्वी गणिनिप्रमुख श्री ज्ञानमती माताजी यांच्या प्रयत्नांतून हे शिल्प साकारत आहे. जैन धर्मात मांगीतुंगीचं असलेलं महात्म्य लक्षात घेऊन श्रवण बेळगोळामधील बाहुबलीच्या ५८ फूट उंच मूर्तीपेक्षाही उंच १०८ फूटी मूर्ती मांगीतुंगीवर साकारण्याचा संकल्प त्यांनी १९९६ मध्ये सोडला होता. मात्र मांगीतुंगी वनखात्याच्या अखत्यारित असल्याने पाच वर्षांच्या पाठपुराव्यानंतर केंद्राने २००१ मध्ये या कामाला परवानगी दिली.

मांगीतुंगी सेलबारी-ढोलबारी पर्वत रांगेतील एक अनोखा पर्वत आहे. या पर्वतावर भारतात प्रसिद्ध असलेल्या दिगंबर जैन पंथीयांचे तीर्थक्षेत्र प्राचीन काळापासून आहे. साडेचार हजार पायऱ्या चढून गेल्यानंतर मांगीतुंगी पर्वतावर अत्यंत प्राचीन लेण्यांत गुरूप्रतिमा व शिलालेख पाहायला मिळतात. मांगी पहाड समुद्रसपाटीपासून चार हजार ३४३ फूट उंच असून, तुंगी पहाड चार हजार ३६६ फूट उंचीवर आहे.

भारतातील सर्वाधिक लेणी महाराष्ट्रात आहेत, त्या बेसाल्ट प्रकाराच्या दगडामुळे. महाराष्ट्रातील पर्वत हे बेसाल्ट प्रकारातील असल्याने हा दगड कठीण आणि नरम दगडांच्या थरांचा असल्याने या दगडांवर नक्ष‌ीकाम अथवा मूर्ती काम करणे सोपे जाते अन् ते ‌शेकडोवर्ष टिकतेही. मात्र १०८ फूट अखंड दगडातील मूर्तीसाठी तसा दगड शोधण्याचे काम सुरू झाल, तसेच एवढ्या मोठ्या मूर्तीचे काम महाराष्ट्रात झालेले नसल्याने यासाठी एका परदेशी कंपनीकडे काम देण्याचे ठरले. मात्र, त्या कंपनीने अखंड दगडाच्या शोधासाठी पर्वताचे स्कॅनिंग करण्यासाठी दोन ते चार कोटींचा खर्च सांगितल्यानंतर काम स्थान‌िक पातळीवर करण्याचे ठरले. यासाठी मांगीतुंगी ट्रस्ट व सांगलीतील अभियंता चंद्रकांत रायगोंडा पाटील(जैन) यांच्याकडे काम सोपवण्यात आले. चंद्रकांत पाटील यांचा गेली चाळीस वर्ष देशभरात जैन मूर्ती उभारण्यात हातखंडा आहे. मात्र अखंड पाषाणातील मूर्ती बनविणे हे त्यांच्यासाठीही आव्हानच होते. १०८ फूट मूर्ती व १३ फूटाचे कमळाचे व्यासपीठ अशा १२१ फूट मूर्तीसाठी त्यांनी अख्खा मांगीतुंगी पर्वत पालथा घातला. अखेर मांगी पर्वतावरील एका शिखरावर पाच लिटर रॉकेलने त्यांना मूर्तीसाठी महाकाय दगड शोधून दिला. अगदी दोनशे रुपयात त्यांनी दोन कोटींचे काम करून दाखविले ते त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर. एखाद्या दगडावर रॉकेल टाकल्यावर रॉकेल एकाच गतीने उडाले तर तो दगड मूर्तीसाठी पक्का असू शकतो, या त्यांच्या अनुभवी तंत्रज्ञानाने त्यांना मांगी पर्वताच्या एका कोपऱ्यावर सुमारे ४५० फूट लांबी आणि ५५ फूट व्यासाचा पाषाण हाती लागला. मात्र दगडाच्या शोधापासून त्याला मूर्तीचे रूप देण्यासाठी त्यांना १३ वर्षं लागली. या तेरा वर्षात फक्त मांगीतुंगीच्या चकरा अन् मूर्तीसाठी अखंड दगडाचा ध्यास अभियंता पाटील व त्यांच्या सहकार्यांच्या डोळ्यात व्यापला होता. अखंड दगड सापडला पण सुरूंगाने हा दगड पर्वतापासून वेगळा करणे धोक्याचे होते. त्यामुळे मूळ मूर्तीच्या दगडालाही तडे जाण्याची भीती होती अन् निसर्गासाठीही ते पोषक नव्हते. नेमके काय करायचे या शोधात असताना अभियंता पाटील यांना एकदा इंटरनेटवर दगड वायरने कापण्याची इटालियन पद्धत पाहायला मिळाली. खरंतर ही पद्धत भारतीय लेणी वास्तुशास्त्रातही वापरल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वत: या मुशनरी विकसित केल्या. धातू व हिऱ्याचा चुरा मिश्रित वायरने मांगी पर्वतापासून मूर्तीसाठी आवश्यक दगड त्यांनी वेगळा केला, तोपर्यंत २०१२ साल उजाडले होते. दगड फोडण्यासाठी सतत २५० हून अधिक कामगार व डझनभर अभियंते दिवसरात्र राबत होते. त्यात अनेक अभियंते अवघड कामात टिकत नसल्याने ही आव्हाने डोक्यावर घेऊन पर्वत चढणे सुरू झाले. मांगीची चढाई सोपी नव्हती. दररोज दोरीच्या साहाय्याने मांगीच्या शिखरावर जावे लागे. मशिनरी सोबत घेऊन जाण्यासाठी तिचे सुटे भाग करावे लागत व शिखरावर गेल्यावर पुन्हा जोडणी करून मूर्तीच्या दगडावर काम सुरू होई. येणाऱ्या प्रत्येक संकटाला दिवसागण‌िक उत्तरही मिळू लागल्याने ही लढाई जिंकणार असा विश्वास सर्वांमध्ये निर्माण झाला. त्यामुळे ही चढाई हळूहळू सोपी होऊ लागली. पायथ्यापासून मूर्तीच्या दगडापर्यंत साधनसामुग्री घेऊन जाण्यासाठी कच्चा रस्ता बनविण्यात आला; मात्र त्याची चढाई सर्वसामान्य वाहनांना शक्य नव्हती. त्यामुळे कठीण चढाई चढणारी विशेष मालवाहू वाहने तयार करण्यात आली. आता मूर्तीचे प्रत्यक्ष काम सुरू होण्यास प्रारंभ होणार तर ऋषभदेवांची मूर्ती कशी असेल याला आकार देणारे राजस्थानी मूर्तिकार सुरजमल नाहटा यांचा मृत्यू झाला. त्यांचे काम पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांचे पुत्र मूर्तिकार आशिषकुमार नाहटा (३४) यांनी जबाबदारी खांद्यांवर घेतली. दरम्यान, या कामात खंड पडू नये म्हणून देशविदेशातील अनेक संस्था, संघटना व जैन बांधवांनी अखंड मदत सुरू ठेवली. केंद्र व राज्य सरकारनेही यासाठी आवश्यक ती मदत देऊ केली. डिसेंबर २०१२ ला मूर्तीच्या दगडाला आकार देण्याचे काम सुरू झाले. अजंठा-वेरूळप्रमाणे आधी कळस मग पाया या तत्त्वानुसार ऋषभदेवांची मूर्ती आकार घेऊ लागली. मूर्ती कशी असावी याचे काही ठोकताळे ठरलेले होते. मूर्तीचे कान, नाक, डोळे, हात व पाय यांची लांबी रूंदी तसेच पायाच्या नखापासून केसांपर्यंत सर्वकाही ठरल्याप्रमाणे आकाराला येत होते. अगदी हजारो किलोचे दगड फुग्याच्या साहायाने म्हणजे घरगुती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वेगळे करण्याचा भीमपराक्रम अभियंत्यांनी कौशल्याने पार पाडला. या मूर्तीचे वजन ९ हजार टन आहे. इतक्या वजनाची जगातील ही एकमेव मूर्तीही ठरली आहे. डिसेंबर २०१५ ला तीन वर्षात मूर्तीचे काम पूर्ण झाले. त्यानंतर मूर्तीला पॉलिश करून ती गुळगुळीत करण्यात आली. या मूर्तीपर्यंत जाण्यासाठी साधारण दोन हजार पायऱ्या चढून गेल्यानंतर मूर्तीचे भव्य रूप अनुभवता येते.

१८ फेब्रुवारीला होणाऱ्या पंचकल्याणक महोत्सवात भगवान ऋषभदेव यांच्या मूर्तीचा महामस्तकाभिषेक व लोकार्पण सोहळा होणार आहे. ऋषभदेवांची ही मूर्ती भक्ती अन् शक्तीचे प्रतीक ठरणार असून, ही विश्वविक्रमी मूर्ती केवळ जैन धर्माचीच नसून, अखंड मानवतेला अखंडतेचे महत्त्व आणि बंधुभाव जपण्याचे आवाहन ती करत आहे. म्हणूनच असे म्हटले जाते की, बंधुभावाचा संदेश देणारी ऋषभदेवांची स्टॅच्यू ऑफ किनशीप नक्की वैश्विक ठरेल!

लेखक : रमेश पडवळ

rameshpadwal@gmail.com

contact no : 8380098107

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate