विजापूर
कर्नाटक राज्यातील इस्लामी वास्तूशैलीसाठी ख्यातनाम असलेले इतिहासप्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि त्याच नावाच्या जिल्हयाचे मुख्यालय. लोकसंख्या १,८६, ९३९ (१९९१). ते दक्षिण रेल्वेच्या मुंबई-बंगलोर रूंदमापी मार्गावर, मुंबईच्या आग्नेयीस सु.४०२ किमी.आणि सोलापूरच्या दक्षिणेस सु. ८१ किमी. वर वसले आहे. ते रस्त्याने पंढरपूर, सोलापूर, सांगली इ. महाराष्ट्रातील शहरांशी तसेच आंध्रप्रदेशातील हैदराबाद व कर्नाटकातील इंडी, बादामी इ. गावांशी जोडले आहे.